অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आता महावितरणचेही ‘डिजीटल’ पाऊल

आता महावितरणचेही ‘डिजीटल’ पाऊल

आता महावितरणचेही ‘डिजीटल’ पाऊल महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने वीज ग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल ॲपचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. मुंबईचा काही भाग वगळता महाराष्ट्रातील प्रत्येक घरात, दुकानात महावितरणची वीज आहे. त्यामुळे ज्याचा विजेशी संबंध आहे, अशा प्रत्येकासाठी हे मोबाईल ॲप उपयुक्त ठरत असून जवळपास 4 लाख ग्राहकांनी हे ॲप्स डाऊनलोड केले आहे. ग्राहकांना या सुविधेची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून महावितरणने होर्डींग, पोस्टर्स, पॉम्पलेट्स, रेडीओवरुन प्रसारित होणारे जिंगल्स तसेच ग्राहकांशी थेट संवाद साधून याविषयी जागरुकता निर्माण करीत आहे.

या ॲप्सविषयी थोडेसे... मराठी व इंग्रजी या दोंन्ही भाषेत उपलब्ध असलेल्या ॲपमुळे आपण आपले वीजबिल कोठेही पाहू शकतो, भरु शकतो. नव्हे तर वीजसेवा व त्यासंबंधीच्या विविध तक्रारीही याच मोबाईल ॲपवरुन नोंदवता येतात. त्यामुळे आता वीजबिल भरण्यासाठी तासनतास रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. ॲन्ड्राईड, विंडोज व ब्लॅकबेरी ऑपरेटींग सीस्टीमच्या मोबाईलधारकांना व लॅपटॉप व संगणकावरदेखील हे ॲप डाऊनलोड करता येते. त्यासाठीच्या सूचना महावितरणच्या www.mahadiscom.in वर दिलेल्या आहेत. गुगल प्ले स्टोअरवर mahavitaran नावाने ॲप शोधल्यास महावितरणच्या लोगोचे ॲप आपण आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल करु शकता.

हे ॲप डाऊनलोड करता येते. मोबाईल ॲप डाऊनलोड झाल्यावर जे वीज ग्राहक महावितरणचे wss (web self services) पोर्टलचा वापर करत होते व त्यांचे wss वर user ID व Password, आहे, त्यांना ॲपवर वेगळा ID तयार करण्याची गरज नाही ते थेट login करु शकतात. ज्यांचे wss वर खाते नाही अशा विजग्राहकांना Tap here to Sign up ऑप्शनवर क्लिक करुन नवीन खाते उघडता येते. त्यात प्रामुख्याने खालील बाबी नमुद करणे महत्वाचे आहे. Consumer No. विज बिलावर 12 अंकी ग्राहक क्रमांक, Billing Unit (BU) जिथे विजबिल तयार होते त्या उपविभागाचा चार अंकी कोड, तो विज बिलावर छापलेला असतो Date of Birth स्वत:ची जन्मतारीख, स्वत:चा वापरात असलेला मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, पोस्टल पिनकोड, User name इथे लक्षात राहील असा यूजरनेम टाकावा. Password पासवर्ड 6 ते 20 अक्षरांचा असावा.

ज्यामध्ये एखादे अक्षर कॅपीटल, काही स्मॉल काही अंक व काही विशेष चिन्ह याचा समावेश करावा. उदा. Abcde@123 इत्यादी पासवर्ड Confirm करुन Submit केल्यास होम स्क्रीनवर View and pay Bills, Register Compliant, Add Connection, Customer Care आदी ऑप्शन येतील. View and pay Bills वर क्लिक केल्यावर समोर येणाऱ्या नाव/ग्राहक/क्रमांकावर क्लिक करा. संबंधीत क्रमांकाचे चालू महिन्याचे बील, बील भरण्याची शेवटची तारीख इ. नोंदी समोर दिसतील. खाली लाल रंगात pay bill नावाने बटन येईल. पैसे भरल्यास त्यावर क्लिक करा. येणाऱ्या अटींवर I Agree म्हणून क्लिक करा. आपले बील कार्डद्वारे भरायचे आहे की नेटबँकिंग त्यापैकीचा पर्याय निवडा. नेटबँकिंग पर्याय सर्वोत्तम आहे. तक्रार नोंदविण्यासाठी Register Compliant पर्यायावर क्लिक करा. तक्रारींचा प्रकार निवडा ज्यामध्ये Power failure, High Bill, Change of Name, New Connection, Transformer Failure, Bill not Received आदी तक्रारीचा समावेश आहे. तक्रारीचा प्रकार निवडल्यानंतर गाव/शहराचे नाव, घराजवळची खूण, मोबाईल क्रमांक व थोडक्यात तक्रारीचे स्वरुप लक्षात ठेवा.

जिथे लाल रंगाने तारांकित केले आहे त्या नोंदी भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर तक्रार Submit करा. आपल्याला तक्रारींचा क्रमांक लगेच समोर येईल किंवा तक्रारीसाठी Customer Care वर क्लिक करा. महावितरणचे 1800 233 3334 व 1800 200 3435 हे दोन टोल फ्री क्रमांक समोर दिसतील. त्यापैकी एकावर क्लिक करुन फोन लावा. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. फोन उचलल्यास भाषेचा पर्याय विचारला जाईल. मराठीसाठी 1 दाबा आणि प्रतिनिधीला बोलायचे असेल तर 6 दाबा. आपला कॉल थेट ग्राहक प्रतिनिधीकडे हस्तांतरीत केला जातो.

तक्रार नोंदविताच तक्रारीचा क्रमांक संबंधिताला लागलीच देण्यात येतो. ॲपद्वारे किंवा फोनवरुन कोणत्याही प्रकारे तक्रार नोंदविता येते. तक्रार नोंदविताच संगणकीय प्रणालीमधून तक्रार संबंधित जनमित्र व अभियंत्यांपर्यंत मोबाईलच्या माध्यमातून पोहोचविली जाते. त्या SMS मध्ये ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, जवळची खूण, रोहित्राचा क्रमांक कर्मचाऱ्याला ‍मिळतो. त्यामुळे शोधण्यात वेळ जात नाही. विशेष म्हणजे नोंदलेल्या तक्रारीची कंपनीकडून फेरतपासणी होते. त्यामुळे तक्रारीचा निपटारा वेळेत होण्यास मदत होत आहे.

मोबाईल ॲपमध्ये Add Connection पर्यायातून एकापेक्षा जास्त कनेक्शन यात समाविष्ट करता येत असल्याने ज्यांच्याकडे घर, दुकान, शेती आदी व अनेक विज जोडण्या आहेत. त्या सर्वाची माहिती त्यांना आता एकाच ॲपमधून मिळणार आहे. मोबाईल ॲपमध्ये महावितरणच्या सेवेबाबत ग्राहकांना फिडबॅक देण्याचा पर्याय आपण दिला आहे. त्यामुळे ग्राहक फिडबॅकच्या माध्यमातून सेवेचा दर्जा उंचविता येणार असून त्यानुसार आवश्यक सुधारणा करण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. वीज ग्राहकांच्या मोबाईल ॲपमधून उच्च व लघुदाब विज जोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे.

चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॉलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय आहे. भरलेल्या पावतीचा तपशील मिळणार आहे. विजसेवेबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्काची व तक्रार करण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांचा एकाच खात्यातून स्वत:च्या अनेक वीज जोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्ययावत करण्याची सोय आहे.

मिटर रिडींग न घेतलेल्या वीज जोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएसएसद्वारे लिंक पाठविण्यात येणार असून संबंधित ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील ॲपद्वारे मिटर रिडींग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय आहे. सोबतच ब्रेकडाऊन किंवा देखभाल दुरुस्तीमुळे ज्या वाहिनीवरील वीज पुरवठा खंडीत होईल तो पूर्ववत होण्याचा कालावधी वीज ग्राहकांना यापुढे एसएसएसद्वारे लवकरच कळविला जाणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही निवडक भागामध्ये मोबाईल ॲपच्या नवीन माध्यमातून वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर 24 तासांत विज जोडणी मिळत आहे. अशा प्रकारे महावितरण 2 कोटी 40 लाख वीज ग्राहकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तत्पर व पारदर्शक सेवा देण्यासाठी सज्ज असून ग्राहकांनी सुद्धा बोटाच्या एका क्लिकवर असलेल्या या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

लेखक - विकास आढे, जनसंपर्क अधिकारी,

महावितरण अकोला परिमंडळ, अकोला.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 12/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate