पारंपरिक ऊर्जास्त्रोत हे कधी तरी संपणारे आणि प्रदुषण निर्माण करणारे आहेत. त्यामुळे प्रदुषणाची पातळी ही वाढलेली आहे. त्याला पर्याय म्हणून सौरऊर्जा, पवन ऊर्जा, तसेच बायोगॅस हे पर्याय आपल्यासमोर आहेत. जागतिक पातळीवर देखील या ऊर्जास्त्रोतांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. आपल्या देशातही याचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून शासनाबरोबर स्वयंसेवी संस्थादेखील प्रयत्न करीत आहेत. बायोगॅसचा वापर नागरिकांनी करावा म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून अनुदानही दिले जाते. गुरांच्या शेणापासून ऊर्जा निर्माण करून जो गॅस तयार होतो त्याला बायोगॅस म्हणतात.
बायोगॅस हा जैविक प्रक्रियामधून बाहेर पडणारा वायू आहे. जर जैविक प्रक्रिया ऑक्सिजन विरहित वातावरणात झाली तर बायोगॅसची निर्मिती होते. बायोगॅसमध्ये साधारणत 55 ते 60 टक्के मिथेनचे प्रमाण असते तर उर्वरित भाग कॉर्बनडॉयऑक्साईडचा असतो. मिथेन हा ज्वलनशील असतो. बहुतांश कुजणाऱ्या प्रक्रियामध्ये बायोगॅसची निर्मिती होते. या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. हेच तत्व गोबरगॅस प्रकल्पालाही वापरतात. त्यामुळेच बायोगॅसचा अपारंपरिक ऊर्जास्त्रोतात गणना होते. तसेच कचरा निर्मुलन व सांडपाणी शुद्धीकरणामध्ये बायोगॅस हे उत्पादन म्हणून तयार होते. त्यामुळे दुहेरी उपयोगामुळे जग बायोगॅसकडे प्रभावी इंधन म्हणून पाहत आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित वाहने, रेल्वेगाड्या तसेच वीजनिर्मिती संच, शेगड्या इत्यादीमध्ये इंधन म्हणून वापर व्हावा यासाठी संशोधन चालू आहे. बायोगॅसची निर्मिती ही ऑक्सिजन विरहित वातावरणात होते. याकामी ॲनारोविक जीवाणूंचा उपयोग होतो. गायी-म्हशीच्या मोठ्या आतड्यात हे जीवाणू सहज आढळतात. त्यामुळेच गायी, म्हशीचे शेण हे बायोगॅस प्रकल्प चालू करण्यास महत्त्वाचे मानले जाते.
ग्रामीण भागात रोजच्या स्वयंपाकासाठी व शेतात चांगल्या प्रकारचे खत मिळावे म्हणून बायोगॅस खूप फायदेशीर आहे. ग्रामीण भागात यशस्वी ठरलेला बायोगॅसचा वापर शहरी भागात होत असल्याचे आशादायी चित्र दिसून येत आहे. बायोगॅस प्रकल्पाचा वापर चाळीसगाव शहरातील नागरिक करीत आहेत. चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील राजू नांदणकर यांनी मोठ्या कल्पकतेने 16 वर्षांपूर्वी बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली. त्यातून निर्माण होणाऱ्या गॅसचा वापर ते आपला दैनंदिन स्वयंपाक तयार करण्यासाठी व आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी करत आहेत. त्यांनी बायोगॅसची टाकी जमिनीत केली असून शोष खड्डाही तयार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शौचालयातील मैला साठविण्यासाठी टाकी तयार केलेली नाही. मैला जमिनीखाली असलेल्या बायोगॅसच्या टाकीत आउटलेटद्वारे सोडला आहे. टाकीचे सपाटीकरण करून आतमधून जमिनीबाहेर पाइप काढला आहे. याच पाईपमध्ये ते बायोगॅस तयार करण्यासाठी उपयुक्त वस्तू टाकतात. खालच्या बाजूने त्यात मैलाही पडतो. कुटुंबियात पाच सदस्य आहेत. त्या सर्वांचा सर्व स्वयंपाक, पाणी तापवणे बायोगॅसवरच करीत असल्याने वर्षाला फक्त चार सिलेंडर बाहेरून त्यांना घ्यावे लागते. शौचालयाच्या टाकीला लागूनच बायोगॅसची टाकी तयार केली आहे. 16 वर्षांत एकदाही बायोगॅसची टाकी साफ करावी लागली नाही. याशिवाय कधीच दुर्गंधी आलेली नाही. बायोगॅस प्रकल्पातून तयार होणारा गॅस हा प्रदुषणमुक्त व शुद्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.
चार ते पाच सदस्यांच्या कुटुंबियासाठी लागणाऱ्या बायोगॅससाठी दोन घनमीटर आकारचा बायोगॅस प्रकल्प पुरेसा ठरतो. बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीसाठी केवळ चार हजारपर्यंत खर्च येतो. बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती तीन टप्प्यात केली जाते. इनलेट चेंबर, गॅस चेबर व आऊटलेट चेंबरमध्ये विभागणी केली जाते. सुरुवातीला इनलेट चेंबरमध्ये दोन हजार किलो शेण टाकावे लागते तसेच दोन हजार लिटर पाणीही टाकावे लागते. गॅस चेंबरमध्ये शेणावर प्रक्रिया होऊन 5 ते 6 दिवसांनी गॅसची निर्मिती होते. तो गॅस नळीद्वारे स्वयंपाक घरातील शेगडीपर्यंत पोहोचविला जातो. त्यानंतर रोजच्या वापरासाठी सुमारे 50 किलो शेण व 50 लिटर पाणी इनलेट चेंबरमध्ये टाकावे लागते. त्यातून निर्माण होणारा गॅस सकाळी 1 तास तर संध्याकाळी सुमारे 1 तास पुरेल इतका असतो. गॅस चेंबरमधून आऊटलेटच्या माध्यमातून बाहेर आलेले शेण हे चांगल्या प्रकारे कुजलेले असल्यामुळे शेतात खत म्हणून त्यांचा अधिक चांगला फायदा होतो. तसेच त्यापासून गांडूळ खत व कंपोस्ट खत देखील बनविले जाते. स्वयंपाकाबरोबर चांगल्या खतासाठीही बायोगॅसचा उपयोग होतो. चला तर मग….बायोगॅस उभारूया…धरतीवरील प्रदुषण घालवूया…
लेखक : निलेश किसन परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव.
स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 10/7/2020
या माहितीपटात उर्जेचे स्त्रोत कोणते व त्यांचे प्रक...
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...
देशातील विविध विकास कामांसाठी लागणारी उर्जा, वाढत्...
महाऊर्जातर्फे ऊर्जा संवर्धनासाठी विविध योजना राबवि...