অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’चा आधार

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘बार्टी’चा आधार

राज्य शासनाच्या समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभागाच्या शासन निर्णयानुसार 22 डिसेंबर 1978मध्ये स्थापना करण्यात आली. संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज 12 मार्च 1979 ला सुरू करण्यात आले. संस्थेला मुंबई येथे कार्यालयासाठी योग्य जागा न मिळाल्याने संस्थेचा पाहिजे तसा विस्तार होवू शकला नाही. ही बाब तसेच संस्थेचे उद्दिष्ट विचारात घेऊन ही संस्था मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित करून महात्मा गांधी प्रशिक्षण केंद्र या संस्थेशी 16 फेब्रुवारी 1987 पासून सलग्न करण्यात आली.

डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती. या संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि दैनंदिन कामात स्वायतत्ता यावी व काम जलद गतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 30 एप्रिल 2008 च्या निर्णयानुसार ही संस्था स्वायत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेची नोंदणी प्रक्रिया ही यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे या संस्थेच्या धर्तीवर करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील नियामक मंडळ स्थापन करून संस्थेचे काम सुरू आहे. 

या संस्थेमार्फत केंद्र सरकार पुरस्कृत अनुसूचित जातीच्या वंचित घटकांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण सुरू केले. अनुसूचित जातीच्या उमेदवारांना कौशल्य विकासचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,डॉ. बाबासाहेभ आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. 

29 ऑगस्ट 2012 अन्वये राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीसाठीही या संस्थेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या 15 विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांशी समन्वय साधून समित्यांनी साधलेल्या प्रगतीबाबत कामाचा आढावा घेणे व त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे या कामासाठी ‘मुख्य समन्वयक जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या’ (Chief Co-Ordinator Caste Validity Scrutiny Committee) म्हणून बार्टीच्या महासंचालकांना नियुक्त करण्यात आले आहे.

सामाजिक समता या विषयावर सखोल अभ्यास, संशोधन, प्रशिक्षणाचे भरीव कार्य व्हावे यासाठी उद्दिष्टे व कामे निर्धारीत केली असून त्यामध्ये खाली नमूद केलेली उद्दिष्टे व कामांचा समावेश आहे.

बार्टी संस्थेची प्रमुख उद्दिष्टे

  1. सामाजिक समता व न्याय या विषयाशी सुसंगत बाबींशी निगडीत संशोधनात्मक उपक्रम हाती घेणे.
  2. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचे मूल्यमापन करणे.
  3. संस्थेच्या उद्दिष्टपूर्तिसाठी व शैक्षणिक उपक्रमासाठी संमेलने, व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करणे.
  4. संस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असे वाचन साहित्य, संशोधनात्मक अहवाल, निबंध, नियतकालिक व पुस्तके प्रकाशित करणे.
  5. संस्थेच्या कामासाठी निधी जमा करण्यासाठी उपक्रम राबविणे.
  6. सामाजिक न्याय विभागाच्या विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमता वृद्धीसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविणे.
  7. संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे.
  8. विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली ‘सामाजिक समता’ याविषयी संशोधन करुन सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल, याबाबत संशोधन करणे.
  9. सामाजिक समता याविषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान व अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुणांना सुविधा उपलब्ध करुन देणे.
  10. त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशात्राच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण वाढ होईल, असे प्रशिक्षण देणे.
  11. समाजातील विविध स्तरामध्ये ‘सामाजिक समता’ या तत्वप्रणालीवर आधारीत सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अधिक संशोधन करणे, त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करण्याबाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करुन ‘सामाजिक समता’ या कार्यास उचलून धरणे.
  12. महाराष्ट्रामध्ये योग्य ठिकाणी ‘सामाजिक समता’ तत्व प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी शाखांची स्थापना करणे.
  13. ‘सामाजिक समता’ या विषयासंबंधीत समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन केंद्रांची स्थापना करुन चालविणे.
  14. संस्थेच्या उद्दिष्टांनुसार प्रस्तावित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करून त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे.
  15. समाजाच्या पुन:सरण उद्दिष्टानुसार पारितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्यावेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करणे.

संस्थेमार्फत राबविण्यात येणारे कार्यक्रम


  1. महाड, जि. रायगड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा विकास व देखभाल.
  2. अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत जाणीव जागृतीसाठी कार्यशाळा.
  3. अनुसूचित जातीतील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद सदस्यांचे प्रशिक्षण.
  4. समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन.
  5. संस्थेमध्ये अभ्यासिका, वाचनालय सुरू करणे.
यामुळे अनुसूचित जातीमधील पदाधिकारी, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांना बार्टीचा आधार वाटतोय.

 

संकलन - धोंडिराम अर्जुन
स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate