पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. त्यापार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. यापद्धतीनुसार प्रत्येक विभागांना कामे नेमून दिलेली असतात. त्याप्रमाणे त्यांनी आपापली कामे आपत्तीपूर्व काळात, आपत्तीच्या काळात आणि आपत्ती नंतरच्या काळात करावयाची असतात. त्यामुळे सर्व विभागात समन्वय राखला जाऊन तात्काळ दिलासा मिळतो.
पावसास सुरुवात होण्याआधीच जळगाव जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करुन आपली सज्जता केली आहे. जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात 5 शासकीय बोटी व 12 खाजगी बोटी तर 43 होड्याही आहेत. पुरात पोहू शकतील अशा 893 पट्टीच्या पोहणाऱ्यांची माहिती कक्षाकडे आहे. शिवाय 746 होमगार्ड पथके उपलब्ध आहेत. या शिवाय संपूर्ण शासकीय यंत्रणा ही प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करुन आपत्तीच्या प्रसंगांसाठी सज्ज आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपत्तीच्या प्रसंगी आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे व विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. याप्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात तर सहअध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग हे सदस्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी किंवा निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काम पहावयाचे असते. या प्राधिकरणासाठी महानगरपालिका आयुक्त व जिल्हा समादेशक होमगार्डस हे विशेष निमंत्रित सदस्य असतात.
मंडळनिहाय पर्जन्यमापक यंत्र आपल्या जिल्ह्यात प्रामुख्याने पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असते. त्यासाठी पर्जन्यमानाचे सातत्याने निरीक्षणासाठी जिल्ह्यात एकूण मॅन्युअल पद्धतीचे 86 पर्जन्यमापक यंत्रे मंडळस्तरावर बसविण्यात आली आहेत. प्रमाणित कार्यपद्धतीनुसार विभागनिहाय कार्यप्रणाली प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करताना आपत्तीच्या प्रसंगी व नंतर प्रत्येक विभागाने करावयाची कामे व त्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. विभागनिहाय कार्यपद्धती याप्रमाणे-
पुराचा धोका असणारी गावे निश्चित करणे, हवामान खात्याशी संपर्क साधून व स्थानिक पोलीस पाटबंधारे विभागाच्या सहाय्याने पूर व अतिवृष्टीची माहिती त्वरीत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे, आपत्तीसंबंधी माहितीचे संकलन व वितरण योग्य प्रकारे होण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 0257-2217193/2223180 असा आहे. या शिवाय 1077 हा टोल फ्री क्रमांक सुद्धा आहे.
प्रत्येक तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करणे, पुरग्रस्तांच्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्थेचा आराखडा तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करावा. ज्या भागात पुरामुळे संपर्क तुटण्याचा संभव आहे तसे भाग निश्चित करुन ठेवणे व अशा भागात पूर परिस्थिती असे पर्यंत अन्नधान्य व इतर आवश्यक सामुग्रीचा पुरवठा करण्याची व्यवस्था तहसीलदारांनी करणे, पुराचा धोका असलेल्या भागात, रेडीओ किंवा दंवडीद्वारे धोक्याच्या सूचना देण्याची कार्यवाही करणे, आपत्ती निवारणार्थ व आपदग्रस्तांना मदत वाटप करण्याच्या व्यवस्थेचे सनियंत्रण उपविभागीय अधिकारी करतील.
पर्याप्त वाहने उपलब्ध करुन ठेवणे, पुररेषेच्या आत अनधिकृत अतिक्रमण करुन राहणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावून धोक्याची पूर्वसूचना देणे, मोठ्या गावात उपलब्ध वाहनांचे नंबर प्राप्त करुन त्यांच्या मालकांची नावे दुरध्वनी क्रमांक याची अद्यावत माहिती तयार ठेवणे, आपत्तीच्या वेळी गरज पडल्यास ही वाहने ताबडतोब अधिग्रहीत करुन मदत वाटपाची कार्यवाही करणे.
सर्व गटारे/ ड्रेनेज मोकळे करावे, अतिवृष्टी कालीन पाणी वाहून जाण्यास अटकाव करणारी नदी नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करणे, पुररेषेतील लोकांना व तटावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देणे, अग्निशमन विभाग दक्ष ठेवणे. तटावर पोहणारे कर्मचारी व अग्निशमन कर्मचारी तैनात करणे, पूर पाहावयास गर्दी करणाऱ्या लोकांना मज्जाव करण्यासाठी व्यवस्था करणे.
पुराचे पाणी धरणातुन सुटल्यानंतर तात्काळ पूर रेषेतील गावांशी संपर्क साधून व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाला (दूरध्वनी क्रमांक 2217193) देणे. पूर रेषेतील गावात पूर पाहावयास जाणाऱ्या लोकांना प्रतिबंध करणे, लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी गावस्तरावर यंत्रणेचा सहभाग घेऊन कार्यवाही करणे, आपदग्रस्त क्षेत्रातील वाहतूक सुरळीत राहील याची व्यवस्था करणे.
पट्टीच्या पोहणाऱ्यांची तालुकानिहाय यादी तयार करणे, नियंत्रण कक्ष स्थापन करणे, महत्त्वाच्या धरणांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविणे, जिल्हाधिकारी जे आदेश देतील त्याप्रमाणे तातडीने कार्यवाही करणे, स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना सूचित करणे, दळणवळण व वाहतुकीवर सनियंत्रण करणे.
पूररेषेतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना देणे, पुरात कोणीही सापडणार नाही याची खात्री करणे, आपदग्रस्त भागातील वाहतूक सुरळीत राखणे.
आपदग्रस्त भागात तात्काळ प्रथमोपचार केंद्र उभारणे व कार्यान्वीत करणे व त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास देणे. आपदग्रस्त उपचारकेंद्रात नियंत्रणकक्ष उघडून त्यात दूरसंचार व्यवस्था कार्यान्वित करावी. आवश्यक औषधीसाठा उपलब्ध करणे, आणीबाणीच्या काळात स्थानिक डॉक्टर व स्वयंसेवक यांना संघटीत करुन त्यांची मदत घेण्यात यावी. रोगराई पसरु नये यासाठी फवारणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, गंभीर रुग्णांना आवश्यक उपचारासाठी उचीत ठिकाणी हलवण्याची कार्यवाही करणे. पुराचा धोका असणाऱ्या गावाना खास आरोग्य पथके नेमणे, जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी वैद्यकीय मदत पुरविणे, पुरेसा औषधीसाठा करणे, पुरग्रस्त भागात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये याची दक्षता घेणे, शुध्द पाणी पुरवठ्यासाठी टी.सी.एल.पावडर उपलब्ध करुन देणे.
बाधीत भागातील पॉवर स्टेशन, सब स्टेशन, फिडर्स, ट्रान्सफार्मर इ.चा. विद्युत प्रवाह तात्काळ खंडीत करणे, महत्त्वाच्या ठिकाणाच्या उदा. विद्युत गृह, दवाखाने, बसस्थानक यांचा विद्युत प्रवाह अबाधीत ठेवणे. आपदग्रस्त भागातील धोकादायक ट्रान्सफार्मर पॉवर स्टेशन इत्यादींना धोक्याची आगाऊ सूचना देणे व विद्युत प्रवाह तात्काळ खंडीत करण्याची कार्यवाही करणे. आपदग्रस्त भागातील विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या खात्रीनंतर तात्काळ सुरळीत करणे.
आपादग्रस्त भागात दूरध्वनी सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने निर्माण होणारे अडथळे दूर करणे, आपदग्रस्त भागातील आरोग्य शिबीर व उत्तर शिबीर यामध्ये दुरध्वनी संपर्क व्यवस्था करणे. महत्त्वाच्या विभागांचा संपर्क अबाधित राखणे.
धोकादायक गावातील उपलब्ध यंत्रणेस त्वरीत कार्यवाहीचे आदेश देणे, आपादग्रस्त भागातील रस्ते, पूल, धरणे, सार्वजनिक सोयी पुरविणारी साधने इ. ची तात्काळ दुरुस्ती करण्याची कार्यवाही करणे. गावातील रस्ते व आपत्कालीन रस्ते यांची माहिती व नकाशे उपलब्ध ठेवावेत, बाधीत होणाऱ्या गावांना विभागाकडील उपलब्ध साधने (डंफर, टँकर, अर्थमुव्हर, बुलडोजर, जे.सी.बी. इ.) उपलब्ध करुन देणे. आपत्तीमुळे रस्त्यांना क्षती पोहचून दळणवळण बंद पडल्यास रस्ते दुरुस्तीचे कामे युध्द पातळीवर करणे, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणे, पुरग्रस्तांचे स्थलांतर करणे भाग पडल्यास महसूल व पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून वाहनांची व्यवस्था व स्थलांतराची व्यवस्था करणे, तात्पुरत्या निवाऱ्याची आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकारी यांचे आदेशाप्रमाणे निवारे उभारणे, चक्री वादळाच्या वेळी मोठ - मोठी झाडे पडून रस्त्यात अडथळे निर्माण होतात त्यासाठी खास पथके नेमून आवश्यक त्या यंत्र सामुग्रीच्या सहाय्याने दळणवळण व्यवस्थीत सुरु करणे.
बाधीत होणाऱ्या गावातील जलसिंचनाच्या स्त्रोतांची व जेथे पाणी साचू शकते अशा खोल पृष्ठभागांची माहिती उपलब्ध करुन देणे, आपदग्रस्त भागातील उपलब्ध मनुष्यबळाचे मदत कार्यासाठी सहकार्य घ्यावे, पिकांच्या हानीचा व झिज झालेल्या जमीन क्षेत्रांचा प्राथमिक अहवाल तयार करणे व जिल्हा नियंत्रण कक्षात पाठविणे. पुनर्वसनासाठी सहकार्य करणे.
आपत्कालीन भागातील पशुधनास सुरक्षित स्थळी हलविणे. पशुधन केंद्र व उपचार केंद्र यांची स्थापना करणे व उपचार सुरु करणे. पशुंसाठी आवश्यक ती औषधे वरीष्ठ स्तरावरुन मागवून साठवणे, चारा व पाणी यांची व्यवस्था करणे.
आपदग्रस्त गावांच्या जवळ बसेस उपलब्ध करणे, उपलब्ध बसेसच्या ठिकाणी दूरध्वनीची व्यवस्था करणे, 24 तास चालक उपलब्ध करुन देणे, पर्यायी रस्त्याची माहिती चालकांना देणे.
धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसाची व धरणसाठ्याची दर तासास नोंद घेणे व त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास देणे, धरणातुन पाणी सोडण्याची आवश्यकता असल्यास त्याची माहिती किमान तीन तास अगोदर नियंत्रण कक्षास देणे, दर तासास विसर्ग केलेल्या प्रवाहाची माहिती व बाधित होणाऱ्या गावांची माहिती नियंत्रण कक्षास देणे व एक ते तीन तास आधी बाधीत होणाऱ्या गावांच्या सरपंच / तलाठी / ग्राम सेवक / पोलीस यंत्रणेस माहिती देणे, धरण क्षेत्रात 24 तास उपस्थित राहणे व लिकेजची तपासणी करणे व त्याचा रिपोर्ट नियंत्रण कक्षास देणे.
बाधित होणाऱ्या गावांना विभागाकडील बचाव साधने उपलब्ध करुन ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी. तापी व गिरणा काठावरील पूराचा धोका असणारी गावे निश्चित करणे, धरणाच्या बॅक वॉटरमुळे ज्या गावांना पाण्याचा धोका संभवतो ती गावे निश्चित करणे, पाटबंधारे विभागाचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करणे, मोठ्या धरणावर बिनतारी संदेश यंत्रणा चालू करणे, शासकीय व खाजगी बोटींची अद्ययावत माहिती ठेवणे, पूर परिस्थितीबाबत आकाशवाणी केंद्राद्वारे जनतेस माहिती देण्याची व्यवस्था करणे, पुररेषेच्या आत अनाधिकृतरित्या अतिक्रमण करुन राहत असलेल्या इसमांना नोटीस बजावून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याबाबत सूचना देणे.
पुरग्रस्तांचे स्थलांतर करण्यासाठी व इतर उपाययोजनांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी वाहनांची व्यवस्था करणे व पोलीय विभागास वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक ती मदत करणे.
सर्व तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी आपत्तीच्या परिस्थितीत मुख्यालयात थांबतील व नियंत्रण कक्षाकडून येणाऱ्या सुचनांप्रमाणे साधन सामुग्री, वाहने व कर्मचारी यांची मदत उपलब्ध करुन देतील. त्या त्या विभागाने नैसर्गिक आपत्ती निवारणात करावयाच्या कार्यवाहीचा आकस्मिक आराखडा (Contingency Plan) तयार करणे. -संकलन, जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
माहिती स्रोत: महान्यूज, शनिवार, ०६ जून, २०१५
अंतिम सुधारित : 10/7/2020
दिल्ली शहराला १७२० सालापासून पाचवेळा पाच रिश्टर क्...
आपण वृत्तपत्रात नेहमी वाचतो. अतिवृष्टी झाली, पुर आ...