অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शाश्वत उपाय - जलफेरभरण

पाणी, जमीन, हवा, सुर्यप्रकाश, मनुष्यबळ या साधन सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला आपला भारत जगाच्या पाठीवर एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. मात्र अस असतांना आम्ही मात्र त्याची जोपासना करण्याच्या बाबतीत कपाळ करंटे तर ठरत नाही ना ? हा आपल्या समोरील मोठा प्रश्न आहे.
"India is rich country but Indians are poor' किंवा 'जन्म झाला कुबेराघरी मात्र आम्ही नांदतोय सुदामा घरी' या म्हणीप्रमाणे आमची अवस्था झाली आहेOperation is success but patient is dead या उक्तीनुसार शस्त्रक्रिया ताशे बडविण्याच्या नादात आम्हाला रोगी दगावल्याचे काडीचेही सोयरसुतक वाचत नाही. पाणी या मुलभूत घटकाबद्दल आम्ही पूर्वापार जी उदासीनता दाखवत आलो आहोत त्याला वरील म्हणी चपखलपणे लागू पडतात.

पाणी आपण निर्माण करू शकत नाही, ते आयातही करू शकत नाही, व पाण्याला अन्य कुठलाही पर्याय नाही. म्हणूनच जीवन असे संबोधण्यात येणाऱ्या पाण्याचे सर्वागीण व्यवस्थापन हाच एकमेव पर्याय आपणासमोर उपलब्ध आहे. पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आजतागायत 16000 कोटी रूपये खर्च केले परंतु अजूनही 20000 खेड्यांना प्रतिवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो यासारखी लाजिरवाणी बाब दुसरी नाही.

पावसाळ्यात धो - धो पडणारा पाऊस वाहून जावू द्यायचा, व नंतर तेच पाणी टँकरद्वारे वाजत गाजत आणून टंचाईग्रस्तांना पुरवायचे हे उरफाटे नियोजन सुरू आहे.

महाराष्ट्रातील 85 टक्के पाणी पुरवठा योजना या भूजलावर अवलंबून आहेत. ग्रामीण महिलांचा बहुतांश वेळ हा पाणी शेंदण्यातच खर्च होतोय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या कृपेने भूजलातील पाणी उपसण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळी अधिकाधिक खाली जात आहे. जलप्रदूषणातही वाढ होत आहे. सर्वदूर तीव्र पाणीटंचाई अनुभवास येत आहे. याचा परिणाम जनमानसावर होवून समाजामध्ये पाण्याबाबत संघर्ष निर्माण होत आहे. हे असेच चालू राहिल्यास याचे फार दूरगामी दुष्परिणाम जनमानसावर होतील.

आजतागायत कायमस्वरूपी दुष्काळ निर्मूलनासाठी एकत्रित, सर्वसमावेशक, शास्त्रशुध्द, नियोजनबध्द व कालबध्द असे प्रयत्न झाले नाहीत याचा परिणाम असा होत आहे, की महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पुन्हा तीव्र पाणी टंचाई व दुष्काळसदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागत आहेत. महाराष्ट्राच्या पाण्यापासून वंचित व तहानलेल्या जनतेला तसेच भुकेल्या शेतीला कायमस्वरूपी शाश्वत पाणी पुरवठा करावयाचा झाल्यास या पुढच्या काळात सर्वसमावेशक एकत्रित प्रयत्न करावे लागतील.

उपाय


भारतीय संस्कृतीमध्ये पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्व आहे. पाण्याला जीवन व जमिनीला माता हे विशेषण आपण वापरतो. पाण्याचे व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन हा पूर्वीपासूनच आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग राहिलेला आहे.
शासनामार्फत वसुंधरा पाणलोट प्रकल्प, हरियाली, आदर्श गाव, एम.आर.ई.जी.एस. शिवकालीन पाणी साठवण योजना, सिंचन, विविध महामंडळे या प्रकल्पाअंतर्गत विविध स्तरावर महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी अडविणे व संवर्धनासाठी प्रयत्न चालू आहेत. परंतु हे प्रयत्न हव्या त्या गतीने व कार्यक्षम पध्दतीने न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे कामाची गती व त्यातील लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. याचबरोबर पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबत महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या भूजलविषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व जाणीव जागृतीची आवश्यकता आहे.

यापुढे पाणीप्रश्न हा केवळ शासकीय कार्यक्रम न बनता त्याला वैयक्तिक जलफेरभरणाची जोड द्यावी लागेल. महाराष्ट्रातील भूस्तर भूजलपातळी, सिंचन क्षेत्र, भूजल प्रदूषणाचा विचार करता जलफेरभरण ही प्रभावी पध्दत आहे. नांदेड, चंद्रपूर, यवतमाळ भागातील भूजलात फ्लोराईड, गडचिरोली ग्रीन बेल्ट भागात लोह, ठाणे, विरार, वसई भागातील भूजलात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय मोठ्याप्रमाणात होणाऱ्या बाष्पीभवनापासून पाण्याला वाचवून भावी पिढीसाठी जलसंचय करण्यासाठी जलफेरभरण हा रामबाण उपाय आहे.

जल फेरभरण म्हणजे काय ?


जमिनीच्या पोटात गाळून किंवा चाळून पाणी सोडणे म्हणजे जलफेरभरण होय. थोडक्यात काय तर जमिनीच्या पोटात आपण पाण्याचे इंजेक्शन देतोय.

जलफेरभरणाच्या पारंपारिक व अपारंपारिक साध्या सोप्या कमी खर्चाच्या, कमी तांत्रिक, सहज करता येण्यासारख्या पध्दती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या पाहिजेत.

विहीर फेरभरण


पावसाळ्यामध्ये विहीरीच्या परिसरात पडलेले पाणी गाळून विहीरीत सोडणे म्हणजे विहीर फेरभरण होय. आपल्या परिसरात विहीर असल्यास विहीरीच्या वरच्या भागाला विहीरी जवळ 10 X 10 X 7 आकाराचा खड्डा तयार करून त्यात दगड, गोटे, खडी. वाळू भरून पाणी गाळून पी.व्ही.सी पाईपद्वारे विहीरीत सोडणे. अशा प्रकारे विहीरीत सोडलेले पाणी जमिनीतील जलपोकळीत साठून राहील व कालांतराने टंचाईच्या काळात याचा वापर करता येईल.

बोअरवेल फेरभरण


प्रत्येकाने आपापल्या घराच्या छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी ही पध्दत उपयुक्त आहे. आपल्या छतावरील वाहून जाणारे पाणी वाहून जावू न देता पी.व्ही.सी पाईपद्वारे एकत्रित करून देवास फिल्टर द्वारे बोअरवेलमध्ये सोडणे जेणे करून पाणी फिल्टर होवून सरळ बोअरवेल मध्ये साठेल व आपणास बारमाही पाणी मिळेल.

पुनर्भरण खड्डा (रिचार्ज पिट)


ज्याच्याकडे जलफेरभरणासाठी विहीर किंवा विंधन विहीर नाही व जलफेरभरण करायचे आहे अशांसाठी ही पध्दत उपयोगाची आहे. आपल्या घराच्या परिसरात खोलगट भागात 3 मि. X 3 मि X 3मि. या आकाराचा खड्डा करून त्यामध्ये दगड, गोटे, विटांचे तुकडे, सिंगल वाळू भरून जमिनीवरील पाणी फिल्टर करून जमिनीमध्ये मुरवता येते.

वनराई बंधारे


वनराई बंधारा ही एक कमी खर्चाची जल फेरभरणाची पध्दत आहे. गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर आपल्याला वनराई बांध घालता येईल. यासाठी प्रथम नाल्यात छोटे मोठे दगड व त्यावर काही माती घालून दबाई करावी व यानंतर सिमेंटच्या किंवा खताच्या रिकाम्या बॅग मध्ये माती भरून त्यावर दोन किंवा तीन लाईनमध्ये लावावे व यानंतर पुन्हा बॅगवर माती लावावी. या बांधात साठलेले पाणी जमिनीत झिरपल्यामुळे कालांतराने पाण्याचा वापर करता येईल. कमी खर्चात जास्त फायदा देणारी ही उपाययोजना आहे.
महाराष्ट्रातील 81 टक्के भूस्तर हा पाषाणापासून बनलेला असल्यामुळे काही ठिकाणी वरील जलफेरभरण पध्दतीचा परिणाम कमी होतो. यासाठी विंधन विहीरी विस्फोट तंत्र, फॅक्चर सील सीमेंटेशन, जलभंजन या आधुनिक तंत्राचा वापर करावा.

पाण्याचा कार्यक्षम वापर


जागतिक बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील पाणीपुरवठा योजनेत गळतीचे सरासरी प्रमाण पन्नास टक्के असून औद्योगीकरणात पाण्याचा पुनर्वापर करण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे. तीन टक्के ऊसाच्या क्षेत्राला आपण तीस टक्के पाणी देतो.

या पीक पध्दतीचाही विचार करून यापुढे कमी पाण्यावर जास्त उत्पादन देणाऱ्या नगदी पीक पध्दतीचा विचार करून, पाणी देण्यासाठी ठिबक, तुषार, स्प्रिंकलर अशा आधुनिक पध्दतींचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होवून आर्थिक विकास होईल.

जलसाक्षरता


देशातील एकूण धरणांपैकी बहुसंख्य धरणे महाराष्ट्रात असून व आजतागायत पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवूनही आपण फक्त सतरा टक्के जमीन सिंचनाखाली आणू शकलो, यामागे महाराष्ट्राची भौगोलिक रचना हे शास्त्रीय कारण असले तरी जलफेरभरण या कार्यक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होवू शकले नाही हेही यामागचे मुख्य कारण आहे.

पाणी हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याचा कितीही वापर केला तरी चालतो ही मानसिकता आजतागायत आपल्या मनात घर करून बसली आहे. परंतु प्रत्यक्षात पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे तिच्यावर सर्वांचा समान हक्क आहे ही मानसिकता सर्व सामान्य जनतेच्या मनात रूजवावी लागेल यासाठी आपल्याला खालील विषयावर जलसाक्षरता करण्याची आवश्यकता आहे. किमान आवश्यक जाणीव जागृती असणे ही मूलभूत संकल्पना साक्षरता शब्दाच्या पाठीशी आहे.
1. एकूण पाणी किती उपलब्ध आहे. निसर्ग हे आपल्याला कधी, केव्हा, कुठे, किती देतो हे आपल्या हातात नसून त्याचे संवर्धन करणे आपल्या हातात आहे हे जनतेला सांगावे लागेल.
2. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात पाणी हा विषय असला पाहिजे.
3. महाराष्ट्रात पाणी या विषयावर अनेक स्वयंसेवी संस्थांनी यशस्वीपणे काम केले आहे ते जनतेपर्यंत पोहचले पाहिजे.
4. हवामान खात्याचा अंदाजाचा व पर्जन्यमापक यंत्राचा योग्य वापर करण्यासाठी कृषी खात्यामार्फत स्थानिक पातळीपर्यंत यंत्रणा उभी करावी लागेल.
5. उपलब्ध पाणी, भूजल, पाण्याचा कार्यक्षम वापर, सिंचन, पुनर्भरण, पुनर्वापर, पाणलोट क्षेत्र विकास, पर्यावरण, दूषित पाणी याबाबतची सखोल माहिती विविध प्रसार माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहचावी लागेल.
6. यापूर्वी झालेल्या पाणलोट कामातील साठलेला गाळ काढणे व देखभाल दुरूस्तीची कामे लोकसहभागातून करणे.

लोकचळवळ


या पुढच्या काळात पाण्याबाबत चर्चा, चिंता व चिंतन करत बसण्यापेक्षा तीव्र पाणी टंचाई व दुष्काळसदृष्य परिस्थितीवर मात करण्यासाठी कृतीची जोड देवून समन्यायी पाणी वाटपासाठी स्वयंसेवी संस्था, धार्मिक विविध संघटना, महाविद्यालयीन युवक, शेतकरी, महिला मंडळे यांच्यामार्फत सजग, प्रगल्भ, सामाजिकदृष्ट्या जबाबदार लोकाभिमुख, लोकमान्य, अशी लोकचळवळ उभी केल्यास पाणीप्रश्न सुटून स्वाराज्याचे सुराज्य होईल.

गावामध्ये धो - धो फुकट पडणारा पाऊस वाहून जाऊ द्यायचा व नंतर तेच पाणी टँकरद्वारे वाजत - गाजत आणून टंचाईग्रस्तांना पुरवायचे अशा उलट्या नियोजनामुळे आज सद्यपरिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे प्रत्येकाने जलफेरभरणाद्वारे नियोजन केल्यास तीव्र पाणी टंचाईवर कायमस्वरूपी उपाय शक्य आहे.
दोन हजार चौरसफुट क्षेत्रफळ असलेल्या घराचे जलफेरभरण केल्यास सरासरी सहाशे पन्नास मि.मी. पर्जन्यमानाप्रमाणे एक लाख वीस हजार लिटर पाणी संकलित होते. प्रतिदिन पाचशे लिटर प्रमाणे उपयोगत आणल्यास ते आठमाही पुरते.

लेखक: श्री. नरहरी शिवपुरे, औरंगाबाद - (मो :9822431778)

माहिती स्रोत: इंडिया वाॅटर पोर्टल

अंतिम सुधारित : 7/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate