অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नको वीजेचा धक्का - सुरक्षेचा विचार पक्का

नको वीजेचा धक्का - सुरक्षेचा विचार पक्का

महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागामार्फत दि.11 ते 17 जानेवारी 2018 या कालावधीत राज्यभर विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने जनजागृतीसाठी हा लेख..

आपला देश कृषिप्रधान आहे त्यामुळे आपल्याकडे कृषी आणि त्यावर आधारित अनेक कुटुंबाचे जीवन आहे. कृषीच्या उन्नतीसाठी वा शेती करण्यासाठी वीजेची आवश्यकता असते. ऊर्जा विभागामार्फत शेतीसाठी आवश्यक असलेली वीज पुरविली जाते. मात्र असे लक्षात येते की, खेड्यात, बऱ्याच ठिकाणी अगदी उघड्यावरही वीज जोडणी केलेली असते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण काही प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सुरक्षा महत्त्वाची ठरते. तेव्हा या लेखात कृषी पंपासाठी विद्युत सुरक्षा आणि वीजेचा धक्का लागल्यानंतरच्या उपाय योजना.

शेतीपंपासाठी विद्युत सुरक्षा उपाय

शेतीपंपासाठीच्या विद्युत संचमांडणीस भारतीय मानक संस्थेचे आयएसआय चिन्हांकित केलेली स्विच फ्यूज युनिट्स, स्टाटर्स अर्थलिकेज सर्किट ब्रेकर्स आदी अवश्य बसवून घ्यावीत आणि शेतीपंपासाठीची विद्युत संचमंडणी शासन मान्यताप्राप्त परवानाधारक विद्युत ठेकेदाराकडून करून घ्यावी. शेतीपंपासाठी दोन स्वतंत्र अर्थिंग करून ते कमीतकमी ८ गेजच्या भिन्न व अलग जी. आय. तारेने मोटारचे मेनस्विच आणि त्याची लोखंडी पेटी व इतर सर्व उघडे धातूचे भाग यांच्याशी जोडावेत. कमी व्होल्टेजमुळे मोटार स्टार्टर ट्रिप होत असेल तेव्हा तो वायरिंग यंत्रणेतून वेगळे करून मोटार चालविण्याचा प्रयत्न केल्याने कृषिपंप जळण्याचा धोका संभवतो. याची दक्षता घ्यावी.

पाण्याच्या पातळीनुसार पंपाची जागा बदलताना, त्यासाठी नवीन ठिकाणी पक्के फाउंडेशन नक्की करावे. तसेच पंपाला अर्थिंगची जोडणी करावी.या बाबींकडे लक्ष द्यावे. पावसाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घेणे आवश्यक असते. वादळवाऱ्यामुळे वीज वाहिन्या तुटून पडल्यास त्यापासून दूर राहावे व जनावरांना दूर ठेवावे. तेथे काही लोकांना थांबवून इतर लोकांना तेथून जाण्यास प्रतिबंध करावा. तसेच वीजमंडळाच्या जवळच्या कार्यालयाला कळवावे. आणि वीज वाहिनीमधील विद्युत प्रवाह बंद असल्याची खात्री करावी. शेतीपंपासाठी वीज पुरवठादाराने अधिकृतरित्या दिलेली वीज जोडणीच वापरावी. महत्वाचे म्हणजे अनधिकृतपणे वीज वापरणे हे जीवित व वित्तास धोकादायक असून वीजेची चोरी हा दंडनीय गुन्हा आहे हे लक्षात ठेवावे.

शेतीमधील अथवा घराजवळील झाडे जर वीज वाहिन्यांच्या संपर्कात येत असतील तर ती स्वत: अथवा संबधित विभागाला कळविल्याखेरीज अजिबात तोडू नका. कारण ही झाडे ओली असल्यामुळे त्यामधून विजेचा धक्का बसण्याची अधिक शक्यता असते. अशा वेळी संबंधित कार्यालयात लेखी तक्रार देऊन त्याची एक प्रत विद्युत निरीक्षकाच्या हाती द्यावी. आणि मग त्यांच्या निगराणीत ती झाडे तोडावीत. तसेच वीज वाहिन्यांच्या खाली कोणतीही वस्तू अथवा शेतीमाल साठवू नये. तसेच वाहिन्याजवळ अथवा सान्निध्यात खोदकाम करू नये व झाडे लावू नयेत.

शेतातून जाणाऱ्या वीज वाहिन्यांमध्ये झोळ असल्यास अथवा जमिनीपासून ४. ६ मीटरपेक्षा कमी उंचीवर असल्यास त्याची लेखी तक्रार देऊन त्याची एक प्रत विद्युत निरीक्षकाच्या कार्यालयात द्यावी. अशा तारांच्या खालून बैलगाडी, वाहने नेऊ नयेत. शेतातील विद्युत खाबांना अथवा ताणतरेला जनावरे बांधण्याचे टाळावे. जनावरांच्या जोरदार हालचालीमुळे विजेचे खांब अथवा स्टे वायर वीज भरीत होऊ शकते आणि त्यामुळे अपघात घडू शकतो.

वीजेचा धक्का - प्राथमिक उपचार

वीजेचा धक्का लागून जर कोणी बेशुद्ध पडले आणि त्याच्यावर तातडीने काही प्राथमिक उपचार केले तर त्या संबधित व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यासाठी काही पुढील काही बाबी लक्षात ठेवाव्यात.

सुरुवातीचे उपाय वीजेचा धक्का बसून बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीचे कपडे आगीमुळे जळत असल्यास प्रथम अशी आग विझवावी,नंतर अपघातग्रस्ताच्या तोंडात पान - तंबाखू आदी असल्यास ती काढून टाकावी. अपघातग्रस्ताचा श्वासोच्छवास चालू असल्याची खात्री करून घ्यावी आणि त्यास ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावे अथवा डॉक्टरांना बोलवावे.

अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वासोच्छवास बंद पडल्याचे दिसून आले तर शक्यतोवर भाजण्यामुळे झालेल्या जखमांवर त्याच्या शरीराचा भार न पडेल अशा पद्धतीने त्याला पालथे झोपवावे.

अपघातग्रस्ताचा चेहरा अधोमुख अवस्थेत एका बाजूला करून हात व खांदे डोक्याच्या बाजूस सपाट ठेवून त्याच्या खांद्यावर थोपटून त्याची जीभ मुखात मोकळी असल्याची खात्री करावी व त्यास पोटावर झोपवावे. त्याच्या पाठीवर छातीच्या पिंजऱ्याला बारगड्याच्या मागील बाजूच्या छोट्या भागावर दोन्ही हातांचे पंजे ठेवावेत. हातांचे अंगठे जवळ एकमेकास स्पर्शतीळ व हाताची बोटे खालच्या बारगड्यावर पसरून राहतील अशी ठेवावीत. आणि हलकेच शांत चित्ताने पण दृढपणे अपघातग्रस्तावर ओणवे होऊन दोन सेकंद अधर दिशेने एकसारखा दाब वाढवत जावे. नंतर हात न हलवता हलकेच मागील बाजूस झुकून हळूहळू दाब कमी करावा. आणि दोन सेकंदाने वरील पहिली कृती पुन्हा करावी. वरील दोन्ही कृती सतत चालू ठेवाव्यात. ह्या कृती एक मिनिटात पंधरा ते सोळा वेळा होतील याची काळजी घ्यावी. असे करण्यामागे अपघातग्रस्ताच्या फुप्फुसाचे आकुंचन व प्रसरण होत राहून कृत्रिमपणे व मंदपणे श्वासोच्छवास चालू रहावा हाच हेतू असतो. यात अधिकचा दबाव पडू देवू नये. नैसर्गिकपणे श्वासोच्छवास चालू होईपर्यंत ही क्रिया चालू ठेवणे आवश्यक ठरते. अर्ध्या ते एक तासात या कृत्रिम श्वासोच्छवासाचा इच्छित आणि अपेक्षित परिणाम दिसून येईल आणि संबधिताचा जीव वाचू शकतो.

या सर्व बाबी प्राथमिक वाटत असल्या तरी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या सूचनांचा उपयोग करुन आपण विद्युत अपघातापासून सुरक्षा करु शकतो. महत्त्वाचे म्हणजे यामुळे जीवितहानी टाळली जाऊ शकते.

संकलन: डॉ.राजू पाटोदकर,मुंबई.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/6/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate