অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नैसर्गिक आपत्तीवेळी प्रथमोपचार तज्ञाचे कार्य

नैसर्गिक आपत्तीवेळी प्रथमोपचार तज्ञाचे कार्य

राज्यात, विभागात किंवा आपल्या जिल्ह्यात गावात कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती उदा. भूकंप, आग, पूर, वादळ, रोगराई, युद्ध, दंगली व अपघात यासारख्या अचानक आपत्तींना सामोरे जातो. अशावेळी जीवितहानी टाळण्यासाठी प्रथमोपचार करणे नितांत गरजेचे आहे. यासाठी प्रथमोपचार तज्ञाच्या महत्वाच्या कार्याविषयी जाणून घेवूया या लेखाद्वारे.

कोणतीही नैसर्गिक आपत्ती/अपघात झाल्याबरोबरच आपत्तीचे ठिकाणावर प्रथमोपचार तज्ञ लवकरात लवकर पोहोचले पाहिजेत. असंबंध किंवा संदर्भहीन प्रश्न विचारण्यात त्याने वेळ अजिबात घालवू नये. आपत्ती / घटनेचे कारण त्वरित जाणून घेण्याचा त्याने प्रयत्न करावा. घातक पदार्थांपासून त्याने पेशंटचे रक्षण करावे. रुग्ण जिवंत आहे की मृत, शुद्धीवर आहे की बेशुद्ध हे त्याने तत्काळ तपासावे. सर्वप्रथम रुग्णाच्या श्वासनलिकेचा मार्ग त्याने मोकळा करावा व कृत्रिम श्वसनादी उपचार करावेत. वेळकाळ बघून त्या वेळेस कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे त्याने ठरवावे. रुग्णाला घटनास्थळावरुन त्वरित हलविण्याची व प्रत्यक्ष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याची त्याने व्यवस्था करावी.जखमीची ओळख पटविण्यासाठी आवश्यक त्या नोंदी कराव्यात तसेच आपत्ती / दूर्घटनेबाबत आवश्यक त्या नोंदी करुन ठेवाव्यात. घटनास्थळी उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचाच जास्तीत जास्त चांगला उपयोग कसा करता येईल ते त्यांनी पाहावे. एखाद्या गोष्टीसाठी अडून बसू नये. रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना त्याने दिलासा द्यावा तसेच लहान मुले व वयोवृद्धाची विशेष काळजी घ्यावी.

आपत्तीस्थळावरील प्रथमोपचार पद्धती पुढीलप्रमाणे असावी. आपत्तीस्थळी वेगात पण शांत चित्ताने संपूर्ण नियंत्रण राखून काम करणे व स्वत:ची प्रशिक्षित प्रथमोपचार तज्ञ म्हणून ओळख करुन द्यावी. घटनास्थळी डॉक्टर किंवा नर्स उपस्थित नसेल तर स्वत: शांतपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे. डॉक्टर / नर्स उपलब्ध असतील तर त्यांना प्रथमोपचार / वैद्यकीय उपचारामध्ये मदत करावी. जेव्हा जेव्हा व जिथे जिथे तुम्ही आपत्तीला सामोरे जाता तेव्हा तेव्हा तुमच्या कार्यशक्तीचा विचार करुन आपल्या मर्यादा लक्षात घ्या व झेपेल त्यापेक्षा जास्त करायला जाऊ नका.

आपत्ती परिस्थितीची पाहणी करताना अचूक परीक्षण करावे. अपेक्षेप्रमाणे कृती करा. आपणास किंवा जखमींना धोका नाही याकडे प्रथम लक्ष द्यावे. प्राणघातक स्थिती असल्यास रस्त्यावरील बघ्याची मदत घ्यावी व वैद्यकीय मदतीसाठी फिरती रुग्णवाहिका मागवावी. प्रथमोपचार तज्ञाच्या, रुग्णाच्या तसेच तिथे उपस्थित गर्दीच्या जीवाला धोका टाळणे, जखमींच्या संख्या आटोक्यात ठेवणे हे लक्ष असावे. वायुगळती किंवा विषारी वायुगळती असेल तर त्याचा उगम बंद करायचा प्रयत्न करुन हवा खेळती ठेवावी. विजेच्या धक्क्यामध्ये संपर्क तोडण्याचा प्रयत्न करा, परत संपर्क होणार नाही याची खबरदारी घ्या. आग लागली असेल किंवा इमारत कोसळली असेल तर तुमचा जीव धोक्यात न घालता जखमींना कसे तेथून हलविता येईल असे प्रयत्न करावेत. वाहनाच्या मोठ्या अपघातात जमलेल्या बघ्यांचाही मदतीसाठी उपयोग करुन घ्यावा. त्यांना वाहतूक नियंत्रणाचे काम द्यावे, पेट्रोल व इतर इंधन सांडत असेल तर आगीच्या धोक्याकडे लक्ष ठेवा, अपघात झालेल्या गाडीचे इंजिन बंद करा.

आपत्तीमध्ये जखमींचा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी गर्दीतील लोकांची मदत घ्यावी. मोठी जखम झालेल्या अवयवाला आधार देण्याचे काम त्यांच्याकडून करुन घ्यावे. तसेच वाहतुक, गर्दी नियंत्रित करण्याचे काम गर्दीतील लोकांकडूनच करुन घ्यावे, फोन करुन मदत बोलविण्याचे काम त्यांच्यावर सोपवावे. संबंधित अधिकारी / प्रशासनाकडे अचूक माहिती पोहोचणे महत्वाचे असते म्हणून पुन्हा पुन्हा संदेश सांगूनच गर्दीतील कोणाला तरी फोन करायला लावणे व कळवल्यानंतर त्यांना परतपावली येऊन तुम्हाला सांगण्याविषयी कळवावे.

निकडीचा निकष ठरविण्यासाठी जखमींच्या अवस्थेचा अंदाज येण्यासाठी नक्की काय झाले आहे अशा अर्थाचा प्रश्न विचारावा. व्यक्ती जो काही प्रतिसाद देईल त्यावरुन समजू शकते की, व्यक्ती शुद्धीवर आहे का?, श्वसनमार्ग मोकळा आहे का? श्वासोच्छवास चालू आहे का ते पाहावे. जर जखमी व्यक्तीनी तुम्हाला काही प्रतिसाद दिला नाही तर तत्काळ पुढील गोष्टी कराव्यात. श्वसनमार्ग बंद झाला असेल तर प्रथम तो मोकळा करा. श्वासोच्छवास घेत नसेल तर कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा. नाडी लागत नसेल तर छातीवर दाब देऊन हृदयाचे कार्य पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करा. शिवाय भरपूर रक्तस्त्राव होत असल्यास तो प्रथम नियंत्रित आणण्याचा प्रयत्न करा. रुग्ण बेशुद्ध असेल तर रुग्णाला बरच्या बाजूचा पाय वाकवून पुढे टाकून सहज अवस्थेत झोपवावे. रुग्ण कितपत प्रतिसाद देतो आहे ते पहावे पाठीच्या कण्याला दुखापत झाली आहे असे आढळून आले तर रुग्णाला वळवू नका. वैद्यकीय मदत येईपर्यंत रुग्णाला शांत झोपलेल्या अवस्थेत ठेवा. रुग्णाला इतरत्र हलविण्यापूर्वी त्याच्या सर्व अस्थिअंगावर व जखमांवर प्रथमोपचार करा.रुगणाला नेत असताना त्याच्या जखमी भागांना आधार द्यावा, पाठीच्या कण्याच्या जखमांसाठी विशेष काळजी घ्यावी. मदत घेण्यासाठी जर तुम्हाला रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल, गॅस किंवा वीजमंडळ अधिकारी यांची कोणतीही मदत घ्यायची असेल तर शक्यतो जमलेल्या बघ्यांच्या गर्दीतून कोणाला तरी पाठवा, कोणत्याही परिस्थितीत रुग्णाला एकटे सोडू नका.

प्रशासनाला / अधिकाऱ्यांना माहिती देताना तुमच्या जवळचा दूरध्वनी क्रमांक बघायला विसरू नका. काही कारणाने तुम्ही संपर्क साधू शकत नसाल तर ते अधिकारी तुमच्याशी संपर्क साधू शकतील. घटनास्थळाचे नेमके स्थान सांगण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी जास्तीत जास्त रस्त्याच्या जवळच्या एखाद्या मोठ्या व प्रसिद्ध इमारतींच्या खुणा द्या. आपत्तीचा प्रकार व गांभीर्य हे जास्तीत जास्त त्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करा. जखमींची संख्या, लिंग व अंदाजे वय तसेच शक्य असल्यास जखमांचे स्वरुप या विषयी माहिती देण्याचा प्रयत्न करा. आपत्तीग्रस्तास जर हृदयविकाराचा झटका, श्वासावरोध किंवा प्रसूतीची चिन्हे यापैकी कशाची शक्यता वाटत असेल तर विशेष मदत मागवा.

गंभीर अपघातामध्ये तसेच आपत्तीमध्ये बऱ्याचशा गुंतागुंतीच्या जखमा होतात, हे लक्षात ठेवावे. कोणत्या रुग्णाला आधी उपचार करावेत व कोणाला नंतर ते निरीक्षणाने ठरवावे. जास्त आरडाओरड करणारी व्यक्ती नेहमीच जास्त गंभीर दुखापत झालेली असतेच असे नाही. सर्वप्रथम गंभीर दुखापती हाताळाव्यात व प्रथमोचार करावेत तरच प्रथमोपचार तज्ञाचे कार्य यशस्वी होईल.

लेखक: मनोज शिवाजी सानप

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate