অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अब्रुनुकसानी

अब्रुनुकसानी

अब्रु ही मानवाची मूल्यवान संपत्ती होय. गेलेली अब्रू परत मिळविणे कठीण असल्यामुळे अब्रुनुकसानीला घोर दुष्कृती समजतात. अब्रुनुकसानी झालेल्यांच्या मनस्तापामुळे, विधी त्या दुष्कृतीची गंभीर दखल घेतो. लिखाण, वक्तव्य, हावभाव, चित्र, आकृती वगैरे कोणत्याही साधनाने कोणाही इसमाने एखाद्या व्यक्तीच्या अब्रूस धक्का लावला, तर अब्रुनुकसानी होते.रोमन कायद्याप्रमाणे अब्रुहानिकारक गाणी सार्वजनिक ठिकाणी म्हणणारे अथवा भाषणे करणारे देहांत शिक्षेस पात्र असत. इंग्‍लंडमध्ये प्रथम अब्रुनुकसानी अपकृत्य मानून भरपाईच देववीत असत. पुढे तो गुन्हाही समजला जाऊ लागला.प्राचीन भारतामध्ये निष्ठुर, अश्लील इ. अपशब्दांचे प्रकार असत. त्यांचा उच्चार गुन्हाच समजत. सत्य हा बचाव नसे. सामाजिक उच्च-नीचतेवर शिक्षेचे प्रमाण अवलंबून असे.इंग्‍लंडप्रमाणे आधुनिक भारतातही लेखी बदनामी वा तोंडी बदनामी असे अब्रुनुकसानीचे दोन प्रकार आहेत. योग्य समर्थन किंवा कारण नसता दुसऱ्याच्या अब्रूला धक्का देणाऱ्या असत्य मजकुरांचे लेख, चिन्हे, चित्रे इत्यादींच्या द्वारे प्रकाशन म्हणजे लेखी बदनामी. तसा मजकूर बोलण्याने व्यक्त करणे म्हणजे तोंडी बदनामी. लेखी बदनामी कायम स्वरूपाची असल्यामुळे ती गंभीर स्वरूपाची मानतात.

भारतात दोन्ही स्वरूपांची बदनामी अपकृत्यही होते व गुन्हाही होतो.इंग्‍लंडमध्ये अपशब्दांमुळे शांतताभंग होण्याच्या संभवनीयतेचा विचार करतात; भारतात तो विचार करीत नाहीत. या दोन देशांतल्या कायद्यामधील आणखी एक फरक असा, की भारतात प्रकाशन महत्त्वाचे असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द उद्दिष्ट व्यक्ती सोडून इतरांना समजल्याशिवाय दुष्कृती होत नाही. इंग्‍लंडमध्ये त्याची आवश्यकता नाही.मृत व्यक्तीबद्दलची मानहानिकारक विधाने संबंधिताना मनस्तापकारक होत असल्याने गुन्हा होतो. संस्था, समूह व कंपनी  यांचीही अब्रुनुकसानी होऊ शकते. आलंकारिक, सूचक किंवा व्याजस्तुतिपर भाषाही अब्रुनुकसानकारक असते. पण काही मानहानिकारक कथने गुन्हा होत नाहीत. असे अपवाद : सार्वजनिक हिताकरिता केलेले सत्यविधान व न्यायालयातील कामकाजाच्या वृत्तांताचे प्रकाशन.बाकीची खाली दिलेली विधाने अपवादांत अंतर्भूत होण्यासाठी सद्भावपूर्वक केलेली असली पाहिजेत.सार्वजनिक प्रश्नांसंबंधी कोणाच्याही वर्तनाबद्दल केलेले मतप्रदर्शन, न्यायालयीन कार्यवाहीच्या गुणदोषांविषयी किंवा त्यातील पक्षकार किंवा साक्षीदार यांच्या वर्तनाविषयी मतांची अभिव्यक्ती, लेखकाने किंवा कर्त्याने अभिप्रायार्थ सादर केलेल्या कृतीबद्दल मत व्यक्त करणे, वैध किंवा संविदादत्त अधिकार असणाऱ्याने दुसऱ्याच्या वर्तनावर केलेली टीका, अधिकारी वरिष्ठांकडे केलेला आरोप, स्वत:च्या किंवा इतरांच्या संरक्षणार्थ किंवा सार्वजनिक हिताकरिता दुसऱ्याच्या चारित्र्यावर केलेला आरोप, एकाच्या किंवा सार्वजनिक हिताच्या दृष्टीने दुसऱ्याविरुद्ध सावधगिरीची केलेली सूचना या गोष्टी सद्भावपूर्वक केल्यास गुन्हा होत नाही.अब्रुनुकसानी अपकृत्य असल्यामुळे दिवाणी न्यायालयातून नुकसान-भरपाई मिळू शकते. इंग्‍लंडमध्ये विशेष नुकसान दाखवल्याशिवाय नुकसान-भरपाई मिळत नाही. भारतामध्ये तोंडी बदनामीमुळे नुकसान किती व कसे झाले हे वादीला दाखवावे लागते. मात्र अशी बदनामी गंभीर परिणाम करणाऱ्या प्रकारात मोडत असेल, तर वादीस तसे दाखवावे लागत नाही. दिवाणी कायद्यात  विधानाची सत्यता हा बचाव आहे. प्रामाणिक टीका व परिस्थितीमुळे विधान करण्याचा प्राप्त झालेला विशेष अधिकार, असे आणखी दोन बचाव होऊ शकतात. हा विशेष अधिकार संपूर्ण किंवा नियंत्रित असतो.

विधानमंडळांत केलेली विधाने, न्यायालयीन कामकाजाच्या ओघामध्ये न्यायाधीश, अधिवक्ते, पक्षकार, साक्षीदार यांची विधाने, व मंत्र्यामंत्र्यांमधील शासन वा राज्यविषयक पत्रव्यवहार वा उद्गार संपूर्ण विशेषाधिकारने संरक्षिले जातात. कर्तव्याच्या ओघात आवश्यक झाल्यामुळे तिऱ्हाइतांना कळलेली, स्वहित-संरक्षणार्थ केलेली वा संयुक्त हितसंबंध रक्षण्यासाठी केलेली कथने, नियंत्रित विशेषाधिकाराने संरक्षिली जातात. दोन विशेषाधिकारांतील भेद असा, की संपूर्ण विशेषाधिकार असल्यास असद्हेतूने केलेली कथनेसुद्धा संरक्षित असतात. तो नियंत्रित असल्यास मात्र सद्हेतूच्या अभावी केलेली कथने कारवाईयोग्य होतात.बदनामी हा शब्द केवळ मानवी अब्रुशीच निगडित नाही. एखाद्याच्या संपत्तीवरील हक्कासंबंधी असत्य-विधाने द्वेषाने केली आणि त्यामुळे त्याच्या हक्काला इजा पोचली तर हक्क बदनामी होते. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या मालाला खोटेपणाने व द्वेषाने कमी लेखणारे कथन केले तर माल-बदनामी होते. इंग्‍लंडमध्ये १९५२ च्या बदनामी-अधिनियमापूर्वी या दोन्ही बदनामींच्या बाबतीत विशेष नुकसान दाखवावे लागे. आता त्याची  आवश्यकता नाही.

संदर्भ : Heuston, R. F. V. Ed. Salmond on the Law of Torts, London, 1965.

लेखक :ना.स.श्रीखंडे

माहिती स्रोत :मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate