অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ह्यूगो ग्रोशिअस

ह्यूगो ग्रोशिअस

(१० एप्रिल १५८३–२८ ऑगस्ट १६४५). डच विधिवेत्ता व मुत्सद्दी. आधुनिक आंतरराष्ट्रीय कायद्याचा जनक म्हणून तो ओळखला जातो. त्याचा जन्म डेल्फ्ट येथे एका प्रसिद्ध घराण्यात झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्याने काही लॅटिन कविता करून बुद्धीची चमक दाखविली. १५९७ साली तो लीडन विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने मार्शिएनस कापेला या लॅटिन लेखकाच्या (पाचवे शतक) विश्वकोशवजा ग्रंथाचे संपादन केले. १५९८ मध्ये यान व्हान ऑल्डन बार्नव्हेल्ट या डच मुत्सद्याबरोबर तो फ्रान्सला चौथ्या हेन्रीच्या दरबारी गेला. राजा त्याच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाला.

१६०० मध्ये त्याने वकिलीस सुरुवात केली. १६०३ मध्ये त्याची इतिहासलेखक म्हणून नेमणूक झाली. १६०७ मध्ये हॉलंड व झीलंडचा ॲडव्होकेट जनरल म्हणून त्याची नेमणूक झाली. १६०८ मध्ये त्याने मारियाव्हान रायगर्स बर्ग या एका मेयरच्या मुलीशी लग्न केले. तिने त्याला शेवटपर्यंत ह्यूगो ग्रोशिअससाथ दिली. १६१२ मध्ये ख्रिस्ती धर्मातील विविध मतप्रणालींच्या लोकांना त्याने एकत्र आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १६१३ मध्ये तो रॉटरडॅमचा मुख्य दंडाधिकारी झाला. त्याने कॅल्व्हिनवादास विरोध केला, म्हणून त्यास १६१९ साली आजन्म कारावासाची शिक्षा झाली; पण तो तुरुंगातून पळून प्रथम अँटवर्पला व नंतर पॅरिस येथे गेला. पॅरिस येथे १६२५ मध्ये त्याने आपला De Jure Belli ac Pacis हा प्रसिद्ध ग्रंथ पुरा केला. हा आंतरराष्ट्रीय कायद्यावरील आद्यग्रंथ होय. १६२७ मध्ये De veritate Religionis Christiance (इं. शी. ऑल द ट्रूथ ऑफ द ख्रिश्चन रिलिजन) हा त्याचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ  प्रकाशित झाला. १६३१ मध्ये तो हॉलंडमध्ये परत आला; पण लवकरच त्यास हॉलंड सोडून हँबर्गला जावे लागले. इंट्रोडक्शन टू द ज्युरिसप्रुडन्स ऑफ हॉलंड हे त्याचे सांविधिक विधीवरचे पुस्तक १६३१ साली प्रकाशित झाले. १६३४ ते १६४५ पर्यंत त्याने स्वीडनचा फ्रान्समधील वकील म्हणून काम केले.

वेस्ट इंडीजचे देऊ केलेले राज्यपालपद त्याचप्रमाणे त्याच्या दृष्टीने डच हितसंबंधास बाधा आणणारी इतर पदे त्याने नाकारली. राणी क्रिस्टिनाने स्वीडनमध्ये राहण्याचे दिलेले आमंत्रण त्याने नाकारले. १६४५ साली परत हॉलंडला जात असता त्याचे जहाज फुटले व जर्मनीमधील रॉसटॉक येथे तो निधन पावला. त्याच्या मृत्यूनंतर १६५७ साली Annales de Rebus Belgicis हे एक ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झाले. या व इतर ग्रंथांनी त्यास जागतिक ख्याती मिळवून दिली.कायद्याव्यतिरिक्त त्यास भाषाशास्त्र, काव्य, धर्मशास्त्र व इतिहास यांची विशेष आवड होती. त्याने या विषयांवर लेखनही केले आहे. काही ग्रीक काव्यांचे त्याने लॅटिन भाषेत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. त्याने केलेल्या लेखनाचा हॉब्ज व लॉक या तत्त्वज्ञांवर विशेष प्रभाव पडलेला दिसून येतो.

लेखक : अच्युत खोडवे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate