অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घटस्फोट

घटस्फोट म्हणजे पति-पत्नीचे निर्माण झालेले वैध वैवाहिक संबंध कायदेशीर रीत्या तोडणे. मूलतः विवाह रद्द करणे व घटस्फोट घेणे यात फरक करावयास पाहिजे. मूळ विवाह रद्द करण्यात विवाहच मुळी वैध झालेला नसतो. असा विवाह रद्द करण्याकरिता पक्षकाराने न्यायालयाकडेच दाद मागावयास पाहिजे, असे नाही. त्याचप्रमाणे न्यायिक पृथक्‌ता व घटस्फोट यांमधील फरक घटस्फोटाची कायदेशीर व्याप्ती समजून घेण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. न्यायिक पृथक्‌ता हे घटस्फोटाकरिता एक कारण होऊ शकते. न्यायिक पृथक्‌तेच्या हुकूमनाम्याने वैवाहिक वैध संबंध फक्त निलंबित होतात; कायमचे संपुष्टात येत नाहीत.

न्यायालयाचा हुकूमनामा घेऊन ते पूर्ववत करता येतात किंवा कायमचे तोडता येतात. घटस्फोटाचा हुकूमनामा वैवाहिक संबंध कायमचे संपुष्टात आणणारा असतो. घटस्फोटाने जसे वैवाहिक संबंध पूर्णपणे व कायमचे तोडता येतात, तसे न्यायिक पृथक्‌तेने होत नाही. मूलतः विवाह रद्द करणे, न्यायिक पृथकता व घटस्फोट या तिन्हींची कायद्यात नमूद केलेली कारणेही भिन्न भिन्न आहेत. बहुकेत जुन्या पाश्चिमात्य समाजात विवाह हा सामाजिक करार समजण्यात येई. शासनाचा त्याच्याशी संबंध नसे. ज्यूंचे धार्मिक सरकार मात्र विवाहासकट सर्व सामाजिक गोष्टींवर नियंत्रण ठेवीत असे. प्राचीन ग्रीक समाजात पती स्त्रीधन परत करून पत्नीला तिच्या बापाकडे पाठवून घटस्फोट घेऊ शकत असे. व्यभिचाराच्या कारणावरून पतीला घटस्फोट घेता येत असे; पण पत्नीला मात्र याच कारणावरून घटस्फोट घेता येत नसे. अथेनियन कायद्याप्रमाणे पति-पत्नी दोघेही घटस्फोट घेऊ शकत असले, तरी पती घटस्फोट घेण्यास अधिक स्वतंत्र होता. दोघांच्या संमतीने घटस्फोट मिळण्याची सोय ही आधुनिकता ध्वनित करणारी त्या काळातील वैशिष्ट्यपूर्ण तरतूद होती.

प्राचीन रोमन लोकांतही घटस्फोट मान्य होता. स्त्री-पुरुष दोघांनाही घटस्फोट घेण्यास कायद्याने मुभा होती. विवाह बंधनातून मुक्त केल्याचे साध्या पत्राने पतीने किंवा पत्नीने कळविणे पुरेसे होते. याचा अधिक फायदा श्रीमंत पुरुषांना मिळू लागला. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढू लागले व त्याचा फायदा विशिष्ट वर्गालाच मिळू लागला. परिणामतः ऑगस्टस सीझरने स्वतःच्या कारकीर्दीत (इ. स. पू. ३० ते इ. स. १४) घटस्फोटावर मर्यादा घालणारे कायदे संमत केले, त्यांपैकी ज्यूलियन लॉज हे महत्त्वाचे समजण्यात येतात. रोमच्या इतिहासात विवाह व घटस्फोट हे पहिल्यांदाच शासनाच्या कक्षेत आणण्यात आले. खिस्ती धर्माच्या उदयानंतर स्त्रीच्या स्वातंत्र्यावर आणखीनच मर्यादा पडल्या. त्यामुळे घटस्फोटाच्या स्त्रीच्या हक्कावरही बंधन आले. सोळाव्या शतकात प्रॉटेस्टंट पंथ उदयाला आल्यानंतर नवऱ्याची क्रूरता आदी काही कारणांकरिता स्त्रीस घटस्फोट घेता येऊ लागला. १६८७ साली नॉर्वेत, १७३४ साली स्वीडनमध्ये व प्रशियात आणि १७९२ साली फ्रान्समध्ये व बेल्जियममध्ये घटस्फोटास मान्यता मिळाली. फ्रान्सने १८१६ साली पुन्हा घटस्फोटावर बंदी घातली; परंतु १८८४ साली पुन्हा घटस्फोटाचा कायदा लागू केला.

धर्मसुधारणावादी चळवळ

धर्मसुधारणावादी चळवळीनंतर पुष्कळशा प्रॉटेस्टंट देशांनी घटस्फोटास मान्यता दिली. नेदर्लंड्स, डेन्मार्क व स्कॉटलंड या देशांत हा बदल एकाच वेळी घडून आला. हे देश १५६० पासून व्यभिचार वा परित्याग या कारणांकरिता घटस्फोट देत असत. इंग्लंडमध्ये १८५७ च्या मॅट्रिमोनिअल कॉजेस ॲक्टने घटस्फोटास चालना मिळाली. हिंदू धर्मशास्त्रात विवाह हा एक महत्त्वाचा धार्मिक संस्कार मानण्यात आला आहे. या संस्काराने निर्माण झालेले बंधन अखंड असते, जन्मोजन्मी ते टिकते, अशी सर्वसाधारण समजूत आहे. धर्मग्रंथही सामान्यतः असेच प्रतिपादन करतात; पण पुरुषांनी विवाहाची बंधने अनेक वेळा झुगारून दिलेली आहेत. स्त्रीने पतीचा त्याग करणे किंवा पुनर्विवाह करणे हे मात्र महापाप समजण्यात येई. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात व नंतरच्या काळातही घटस्फोटाला विरोधच दिसून येतो. त्या काळातील धर्मग्रंथांतही त्याचे प्रतिबिंब दिसते. इसवी सनापूर्वी एक दोन शतके किंवा त्या सुमारास काही विशिष्ट प्रसंगी विवाहविच्छेद मान्य असावा, असे दिसते. प्राचीन वेदादी ग्रंथांत घटस्फोटाचा उल्लेख सापडत नाही; पण बौद्ध वाङ्‌मयात मात्र थोड्याबहुत प्रमाणात तो आढळतो. मनू, पाराशर इत्यादींची काही वचने विशिष्ट परिस्थितीत विवाहविच्छेदन योग्य असल्याचे दर्शवितात. पति-पत्नीचे काही कारणाने एकत्र राहणे कठीण झाले, तर घटस्फोट घ्यावा असे कौटिल्य सांगतो; पण ही मुभा विशिष्ट विवाहप्रकारापुरतीच (आसुर, गांधर्व, पैशाच) मर्यादित आहे. खालच्या जातीत जरी हे विवाहप्रकार असले, तरी ब्राह्मण किंवा इतर वरिष्ठ जाती त्यांपासून अलिप्त होत्याच असे नाही. यावरून कमीअधिक प्रमाणात सर्व थरांत विशिष्ट परिस्थितीत घटस्फोट रूढ होता, असे अनुमान काढण्यास वाव आहे; पण त्याचा फायदा बव्हंशी पुरुषांना मिळत असे. शिकारी व पशूंचे कळप घेऊन हिंडणाऱ्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढते होते; पण जसजसा समाज शेतीप्रधान होत गेला व कुटुंबावर पित्याची सत्ता जसजशी प्रस्थापित होऊन पितृसत्ताक कुटुंबाची कल्पना रूढ होत गेली, तसतसे घटस्फोटाचे प्रमाण कमी होत गेलेले दिसते. विशेषतः जमीन अखंड ठेवण्याच्या गरजेमुळे आणि स्त्रीला शेतकामात महत्त्व प्राप्त होत गेल्यामुळे स्त्रियांना घटस्फोट मिळणे कठीण होऊ लागले.

संस्कृतींचा आर्थिक पाया

हिंदू, ग्रीक, रोमन, ज्यू, चिनी यांसारख्या सर्व प्राचीन समाजांत ही गोष्ट दिसून येते. या संस्कृतींचा आर्थिक पाया शेतीचा होता व कुटुंबरचना पितृप्रधान होती. साहजिक या दोहोंचे प्रतिबिंब या समाजांतील घटस्फोटांच्या नियमांत पडलेले दिसून येते. पुरुषाचा घटस्फोटाचा हक्क अबाधित होता. त्याच्या स्त्रीवरील अनियंत्रित अधिकाराचे ते प्रतीकच होते. असे असले, तरी पुरुषांचे नपुंसकत्व, व्यंग, दुर्धर रोग, पत्नीचा दीर्घ काळ त्याग, दीर्घ काळ घरातील अनुपस्थिती किंवा उपेक्षा अशा अपवादात्मक परिस्थितीत स्त्रियांना घटस्फोटाची मुभा बहुतेक सर्व प्राचीन समाजांत होती. प्राचीन संस्कृतीत वर्गीय भेद महत्त्वाचे असल्यामुळे घटस्फोटाचे वरील चित्र मुख्यतः धनिक आणि वरच्या वर्गाचे आहे. खालच्या वर्गात घटस्फोटाबाबतची बंधने सापेक्षतः सैल होती. कनिष्ठ जमातीत त्याचप्रमाणे विभिन्न प्रांतांत रूढीच्या नावाखाली घटस्फोट घेतला जाऊ शके. आजही ही प्रथा बंद झालेली नाही. पाश्चिमात्यांत व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पनेमुळे घटस्फोटासंबंधीचे कायदे भारतापेक्षा लवकर अस्तित्वात आले.

भारतात यासंबंधीचा पहिला कायदा

पारशी मॅरेज अँड डायव्होर्स ॲक्ट १८६५ साली अस्तित्वात आला. त्याच्या नंतर ख्रिश्चनांकरिता इंडियन डायव्होर्स ॲक्ट १८६९ अस्तित्वात आला. द डिस्सोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्ट १९३९ साली संमत झाला. १९४७ साली त्या वेळच्या मुंबई प्रांतात सरकारने घटस्फोटाचा कायदा संमत केला. असे असले, तरी सर्व प्रांतांना व सर्व थरांतील हिंदू लोकांना व जमातींना लागू होणारा एक कायदा १९५४ पर्यंत अस्तित्वात नव्हता. १९५४ साली अशा प्रकारचा स्पेशल मॅरेज ॲक्ट अस्तित्वात आला व तो देशभर लागू करण्यात आला. त्यानुसार धर्म, जाती, पंथ इ. बाबींचा विवाहाच्या बाबतीत अडसर राहिला नाही. या अधिनियमाच्या अंतर्गत विवाह करणाऱ्यांकरिता जरूर पडल्यास घटस्फोटाचीही तरतूद या अधिनियमाने केली. हिंदूंच्याकरिता घटस्फोटासंबंधी कायद्यातील तरतुदी हिंदू विवाह अधिनियमाच्या (१९५५) तेराव्या कलमात सांगितल्या आहेत. पतिपत्नीला या कलमात सांगितलेल्या कोणत्याही कारणाकरिता परस्परांपासून घटस्फोट मागता येतो. व्यभिचारी असणे, धर्मांतर करून हिंदु धर्म सोडणे, अर्जाच्या लगत पूर्वी कमीत कमी तीन वर्षेपर्यंत दुरुस्त न होणारे वेड असणे किंवा गुप्तरोग व बरा न होणारा महारोग असणे किंवा संसर्गजन्य गुप्तरोग असणे, संन्यास घेणे, कमीत कमी सात वर्षापर्यंत बेपत्ता असणे, न्यायिक पृथक्‌पणानंतर दोन वर्षे किंवा अधिक दांपत्यभावाने सहवास न करणे, दांपत्य अधिकारांच्या प्रत्यास्थापनाचा हुकूमनामा झाल्यानंतर दोन किंवा अधिक वर्षे तशी प्रत्यास्थापना न करणे यांपैकी कोणतेही कारण घटस्फोट मिळविण्यास पुरेसे आहे. याव्यतिरिक्त स्त्री आणखी दोन कारणांकरिता घटस्फोट घेऊ शकते : (१) हा अधिनियम अंमलात येण्यापूर्वी किंवा नंतर पतीने दुसरे लग्न केलेले असणे व ती पत्नी जिवंत असणे. (२) पती जबरी संभोग, अनैसर्गिक संबंध किंवा पशुसंबंध यांबद्दल दोषी असणे.

अपवादात्मक हालअपेष्टा किंवा अपवादात्मक दुराचरण सोडल्यास घटस्फोटाचा अर्ज लग्नास एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच न्यायालयाने स्वीकारावा, असे बंधन या अधिनियमाच्या चौदाव्या कलमानुसार न्यायालयावर घातले आहे. अशी तरतूद करण्यामागे नव-विवाहित दांपत्यास परस्परांना समजून घेण्यास व परस्परांना जुळवून घेण्यास अवधी मिळावा, हा हेतू आहे. भावनेच्या आहारी जाऊन वैवाहिक बंधन तुटता कामा नये. याकरिता न्यायालयानेही पतिपत्नीत समझोता करण्याचा प्रयत्न करावा, म्हणून या कलमात तरतूदही आहे. त्याचप्रमाणे घटस्फोटाचा हुकूमनामा देण्यापूर्वी या वैवाहिक संबंधापासून झालेल्या मुलाच्या हितसंबंधाकडे लक्ष देणेही न्यायालयाला आवश्यक केले आहे. अपवादात्मक हालअपेष्टा किंवा दुराचरण ठरविणे हे परिस्थितीवर व न्यायालयाच्या स्वेच्छाधीन अधिकारावर अवलंबून आहे. कारण या अधिनियमात त्यांचे स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. घटस्फोटित व्यक्तींना प्रारंभिक न्यायालयाच्या घटस्फोटाच्या हुकूमनाम्यापासून एक वर्ष संपेपर्यंत पुनर्विवाह करण्यास या अधिनियमाने मनाई केलेली आहे. अर्थात तोपर्यंत अपील किंवा अपिलाचा अधिकार संपुष्टात आला असला पाहिजे. घटस्फोटास व घाईगर्दीच्या पुनर्विवाहास प्रोत्साहन मिळू नये, हाच या कलमाचा उद्देश दिसतो. घटस्फोट मान्य असला, तरी त्याकडे अपरिहार्य परिस्थितीत अवलंबण्याची उपययोजना म्हणून पाहण्यात यावे, असाच दृष्टीकोन या अधिनियमात सर्वत्र बाळगलेला आहे.

भारतीय ख्रिश्चनांकरिता त्याचप्रमाणे पारशी लोकांकरिता असलेल्या अधिनियमातही घटस्फोटाची कारणे बहुतांशी हिंदू विवाह अधिनियमाप्रमाणेच आहेत. परंतु मुसलमानी कायद्याप्रमाणे पुरुष ‘तलाक’ हा शब्द त्रिवार उच्चारून बायकोस केव्हाही सोडू शकतो. त्याकरिता काही कारणे सांगण्याचे त्याच्यावर बंधन नाही. ‘तलाक’ तो तोंडी व लेखीही घेऊ शकतो. तो पत्नीच्या उपस्थितीत तसेच अनुपस्थितीत घेऊ शकतो. ‘इला', ‘झिहार’, ‘लिअन’, 'खुला’ किंवा ‘मुबारत’ असे घटस्फोटाचे आणखी चार प्रकार मुसलमानी कायद्याने सांगितले आहेत. ‘खुला’ किंवा 'मुबारत’ दोघांच्या संमतीने घेण्यात येतो. पत्नीकडून घटस्फोटाकरिता पुढाकार घेण्यात आला, तर त्यास खुला म्हणतात. ‘मुबारत’ मध्ये दोघेही परस्परांना विटून घटस्फोट घेण्यास सहमत होतात. मुसलमानी कायद्याचे वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोटाकरिता न्यायालयाच्या हुकूमनाम्याची आवश्यकता लागत नाही. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे घटस्फोट घेण्याचा अधिकार मुसलमानी कायद्यान्वये दुसऱ्यास दिला जाऊ शकतो.

मुसलमानी कायद्यातील घटस्फोटासंबंधीच्या वरील तरतुदी मुसलमानी कायद्याप्रमाणे विवाह करणाऱ्या एडन, ब्रूनाई, श्रीलंका, केन्या, पाकिस्तान, सिंगापूर, टांझानिया, इराक, इराण व भारत या देशांतील लोकांना लागू आहेत. या कायद्यान्वये मुसलमान पतीस साक्षीदारासमोर तलाक शब्द उच्चारला, की घटस्फोट मिळतो; पण मुसलमान स्त्री मात्र तसे करू शकत नाही. मुस्लिम स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार जवळजवळ नाकारण्यातच आला आहे. इतकेच नव्हे, तर तलाकविरुद्ध दाद मागण्याची तरतूदही मुस्लिम कायद्यात नाही. भारतात मात्र १९३९ साली मुस्लिम घटस्फोट अधिनियम संमत करून मुसलमान स्त्रीलाही न्यायालयामर्फत घटस्फोट घेण्याचा अधिकार दिला आहे. घटस्फोटाची कारणे बहुतेक हिंदू विवाह अधिनियमाप्रमाणेच आहेत. १९६० साली ईजिप्तमध्ये घटस्फोटाच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या सुधारणांनी पत्नीला काही विशिष्ट कारणांकरिता घटस्फोट वा पृथक्‌ता मागण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे पत्नीपासून घटस्फोट का घेऊ इच्छित आहे, याची कारणे न्यायालयात जाऊन सांगणे पुरुषाला आवश्यक केले आहे. कुराणात सांगितल्याप्रमाणे पुरुषाला चार बायका करण्याची मुभा ठेवली असली, तरी पहिल्या बायकोला अशा परिस्थितीत घटस्फोटाचा अधिकार देण्यात आला आहे. रशियामध्ये १९१७ पर्यंत विवाह धार्मिक बाब समजण्यात येत असल्यामुळे घटस्फोटाची अधिकारिता फक्त धार्मिक न्यायालयासच असे. ही न्यायालये व्यभिचारासारख्या जुन्या कारणांचाच घटस्फोट देताना विचार करीत. शिवाय घटस्फोटाची कार्यवाही खर्चिक आणि दीर्घकालीन असे.

घटस्फोटाकरिता न्यायालयाकडे दाद

१९१७ च्या क्रांतीनंतरच्या आरंभीच्या काळात विवाह आणि घटस्फोट या दोन्ही बाबी खाजगी समजण्यात येऊ लागल्या. साधारणतः १९४४ नंतर मात्र विवाह ही शासनाची बाब समजण्यात येऊ लागल्यामुळे तो शासनाच्या अधिकाऱ्यासमोर पार पाडावा लागतो. त्याचप्रमाणे घटस्फोटाकरिता न्यायालयाकडे दाद मागावी लागते. रशियातील कायद्यात घटस्फोटाची विशिष्ट कारणे देण्यात आलेली नाहीत. प्रायः प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे विचारात घेऊन निकालात काढण्यात येते. हंगेरी, पोलंड व रूमानिया हे देशही या बाबतीत रशियाच्या पावलावर पाऊल टाकणारे आहेत. एकूण परिस्थिती विचारात घेऊन वैवाहिक संबंध पुन्हा प्रस्थापित होऊ शकत नसल्याचे जर न्यायालयाचे मत झाले, तर घटस्फोट देण्यात येतो.फ्रान्समध्ये १९४५ नंतर घटस्फोटावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाहीची गती मंद करण्यात येऊन कायदेशीर कारणेही कमी करण्यात आली. यावरून असे दिसते, की पश्चिम यूरोपीय देशांतील घटस्फोटाचे कायदे रशिया व पूर्व यूरोपातील देशांपेक्षा साधारणतः कमी उदार आहेत. सामान्यतः विशिष्ट कायदेशीर गुन्हा सिद्ध होणे घटस्फोटास आवश्यक आहे.

इंग्लंड-फ्रान्सपेक्षा स्कँडिनेव्हियन कायद्यात घटस्फोट अधिक उदार कारणांकरिता देण्याची तरतूद आहे. इंग्लंडमध्ये संपूर्ण घटस्फोटाची आताही कायद्याने तरतूद केलेली नाही. स्वीडनमध्ये पति-पत्नीचे परस्परांशी न जमणे आणि विवाहाची अयशस्विता ही घटस्फोटाकरिता पुरेशी कारणे आहेत, तर नॉर्वेमध्ये अपमानास्पद किंवा अनीतीकारक वागणूक, तसेच मुलांशी चांगले न वागणे ही घटस्फोटास पुरेशी कारणे समजण्यात येतात. सौदी अरेबिया व येमेन यांसारख्या मुस्लिम देशांत मुस्लिम कायद्याचे तत्त्व तंतोतंत पाळण्यात येते. त्यामुळे कायद्याच्या स्पष्टीकरणास तेथे वाव नाही. पूर्वी फ्रेंचांचा अंमल असणाऱ्या आफ्रिकी प्रदेशात (चॅड, गाबाँ, काँगो, मध्य आफ्रिका प्रजासत्ताक) विवाहाचा उद्देश संततिजनन असल्यामुळे जननक्षमता नसणे हे घटस्फोटाचे प्रमुख कारण समजण्यात येते. गंभीर आजार किंवा इतर दुर्बलता, सासरच्या माणसांचा अपमान, विवाहाने पतीवर व पत्नीवर पडणारी जबाबदारी टाळणे (उदा., पतीवर असलेली घर आणि मुले सांभाळण्याची जबाबदारी त्याने टाळणे वा पत्नीने नवऱ्याशी प्रामाणिक राहण्याची त्याचप्रमाणे स्वयंपाक वगैरे करण्याची जबाबदारी टाळणे), या कारणांकरिताही घटस्फोट देण्यात येतो. व्यभिचाराबाबत बव्हंशी तडजोड होते. काही पश्चिम आफ्रिकी देशांतील लोकांचा पतीला व पत्नीला सारखे अधिकार मिळावेत आणि पश्चिमात्यांच्या धर्तीवर घटस्फोटाचा कायदा व्हावा, असा प्रयत्न आहे.चीन-जपानमध्ये पति-पत्नीच्या संमतीने आणि व्यभिचाराच्या कारणाकरिता घटस्फोट मिळण्याची तरतूद आहे.

घटस्फोटाची कारणमीमांसा

आधुनिक काळात तर घटस्फोटाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या घटस्फोटाचे एकच कारण सांगणे कठीण आहे. शहरी जीवनपद्धत, घटस्फोटाला अनुकूल वा प्रतिकूल असे धर्मनियम, घटस्फोटाला उत्तेजन देणारे सुलभ कायदे, नीतिविषयक भिन्न कल्पना, श्रीमंती वा गरिबी, औद्योगिकीकरण, मूल नसणे इ. अनेक कारणे घटस्फोटाची म्हणून दिली जातात; पण त्यांपैकी प्रत्येकाला महत्त्वाचे अपवाद आहेत. उदा., कॅथलिक धर्माचा घटस्फोटाला विरोध असतो; पण म्हणून कॅथलिक समाजात कमी घटस्फोट होतात असे नाही. त्याचप्रमाणे इंग्लिश समाज प्राधान्याने प्रॉटेस्टंट असूनही तेथील घटस्फोटाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. जपान शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांत आघाडीवर असूनही घटस्फोटाचे त्या देशातील प्रमाण कमी आहे. असेच अपवाद इतर कारणांनाही आहेत. तथापि बऱ्याचशा समाजशास्त्रज्ञांनी पुढील कारणे महत्त्वाची व निर्णायक मानली आहेत : (१) शेतीप्रधान समाजाच्या मानाने आजचा उद्योगप्रधान समाज जास्त अस्थिर व विघटित असणे आणि स्थिर विवाहसंबंधांना प्रतिकूल अशी सामाजिक चलनशीलता मोठ्या प्रमाणात असणे. (२) धर्म व आप्तसंबंधांची विवाहावर असलेली पूर्वींची बंधने शिथिल होत जाणे. (३) विवाह हा करार मानून नवरा-बायकोचे वैयक्तिक सुख हेच विवाहाचे अंतिम उद्दिष्ट मानण्याच्या प्रवृत्तीमुळे केवळ वैयक्तिक हक्कांवरच भर देणे व सामाजिक कर्तव्य व जबाबदारी यांची जाणीव न ठेवणे.

घटस्फोटामुळे निर्माण होणाऱ्या समस्या

घटस्फोटामुळे तापदायक वैवाहिक संबंध तोडण्याचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी त्यायोगे काही बिकट समस्याही निर्माण झाल्या आहेत. विशेषतः घटस्फोटित स्त्रीला अनेक कठीण प्रश्नांना तोंड द्यावे लागते. स्त्री मिळवती  किंवा अर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण नसेल, तर हे प्रश्न अधिकच जटिल बनतात. कायद्यात पोटगीची तरतूद केली असली, तरी त्यायोगे प्रश्न सुटत नाहीत. घटस्फोटित स्त्रीचा पुनर्विवाह सहजासहजी होत नाही. तिच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बऱ्याच अंशी पूर्वग्रहदूषित असते. तिला जर मुले असतील, तर तिचा पुनर्विवाह होणे बव्हंशी अशक्य असते. पुनर्विवाहानंतर घटस्फोटितांच्या मुलांना होणारा सावत्रपणाचा संभाव्य जाच दृष्टिआड करता येत नाही. त्यांची वाढ सर्वसामान्य वातावरणात होत नसल्यामुळे त्यांच्यात मनोविकृती व इतर स्वभावदोष निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. ती एकाकी व पोरकी होण्याचाही संभव असतो. जर घटस्फोटित व्यक्ती कर्तबगार, मिळवती त्याचप्रमाणे दृढ इच्छाशक्तीची नसेल, तर तीही अशीच एकाकी व पोरकी होते. मानसिक प्रश्न जरी महत्वाचे असले, तरी आर्थिक, लैंगिक त्याचप्रमाणे सामाजिक प्रतिष्ठेचे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे सुखी जीवन जगण्याचा वैयक्तिक उद्देश सफल होत नाही. उलट समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने ती एक चिंतेची बाब होऊन बसते. पाश्चात्त्य समाज घटस्फोटास अधिक निर्ढावलेला असला, तरी तेथेही विभक्त कुटुंबसंस्थेमुळे व नात्यागोत्यांचा परिघ कमी असल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

उपाययोजना

घटस्फोटितांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहून त्यांना अधिक अपमानित जिणे जगावयास लावणे, हे समाजस्वास्थाच्या दृष्टीने अयोग्य आहे. शक्य तेथे त्यांचे पुनर्विवाह करण्याचा त्याचप्रमाणे त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. लग्नानंतर पति-पत्नीने परस्परांशी कसे वागावे याबद्दलचे शिक्षण देणाऱ्या सामाजिक संस्थाही अस्तित्वात यावयास पाहिजेत. वैवाहिक जीवनाचा प्रारंभिक काळ अत्यंत नाजूक व महत्त्वाचा असतो. या काळात घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी, मित्रांनी आणि आप्तेष्टांनी नूतन पति-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण न होण्याच्या दृष्टीने व त्यांना मानसिक दृष्ट्या जवळ आणण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावयास पाहिजेत. बेबनावाच्या मुळाशी मानसिक विकृती असेल, तर मानसिक उपचार करण्याच्या दृष्टीने व्यवस्था असावयास पाहिजे. घटस्फोट घ्यावाच लागला, तर तो सुलभ रीतीने व परस्परांच्या संमतीने घेण्याची तरतूद कायद्यात असावी. त्यायोगे परस्परांवर खरे-खोटे आरोप प्रत्यारोप करण्याचा व साक्षीपुरावे गोळा करण्याचा प्रसंग न येता कटुता टाळता येईल. या सर्व व इतर बाबींचा विचार करून दांपत्यास मार्गदर्शन करण्याकरिता एक विवाह मार्गदर्शक समिती सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थापन करणे अत्यंत इष्ट व जरूरीचे मानण्यात येते. अशा मार्गदर्शन करणाऱ्या विवाह समित्या इंग्लंडमध्ये आहेत.विवाह हा समाजसंघटनेचा मूलभूत पाया समजण्यात येतो. म्हणून विवाहाचे सातत्य टिकविण्याकडे साधारणतः सर्वच समाजांचे लक्ष असते. घटस्फोटाने वैवाहिक जीवनातील सर्व प्रश्न सुटतातच असे नाही. जीवनातील असंतोष व वैफल्य नाहीसे करण्याचा तो केवळ एक मार्ग आहे. हा मार्गही अनिवार्य परिस्थितीतच फक्त पतकरावयाचा असतो, यावर आता पाश्चात्त्य समाजशास्त्रज्ञ व विचारवंतही भर देत आहेत.

लेखक : अच्युत खोडवे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate