অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विज्ञानेश्वर

विज्ञानेश्वर

(अकरावे-बारावे शतक). हिंदू धर्मशास्त्रावरील श्रेष्ठ भाष्यकार व ⇨याज्ञवल्क्यस्मृतीवरील मिताक्षरा या टीकाग्रंथाचा कर्ता. धर्मशास्त्राच्या टीकाकारांमध्ये विज्ञानेश्वराचे स्थान फार मोठे आणि अनन्यसाधारण असेच मानले जाते. विद्वानांच्या मते त्याचा काळ १०५० च्या आसपास असावा. त्याच्या मिताक्षरा या ग्रंथाची तुलना पां. वा. काणे यांनी संस्कृत व्याकरणशास्त्रातील पतंजलीचे ⇨महाभाष्य व संस्कृत काव्यशास्त्रातील मम्मटाचा ⇨ काव्यप्रकाश  या ग्रंथांबरोबर केलेली आहे.

हिंदू विधीचे (कायद्याचे) मिताक्षरा आणि दायभाग असे दोन मुख्य पंथ न्यायालयांकरवी मान्यताप्राप्त झालेले आहेत आणि प्रिव्ही कौन्सिल, फेडरल कोर्ट व सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या अनेक न्याय-निवाड्यांनुसार मिताक्षरापंथाचा अधिकार हा बंगाल वगळता भारताच्या अन्य सर्व राज्यांत अप्रतिहतपणे चालतो. जेथे जीमूतवाहनाच्या दायभाग या ग्रंथाचा प्रथमाधिकार चालतो, तेथे म्हणजे बंगालमध्येसुध्दा ज्या तरतुदींबाबत दायभाग अपुरा किंवा संदिग्ध असेल, तेथे मिताक्षराची मदत घेणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे हिंदू विधीमध्ये मिताक्षरास व पर्यायाने त्याच्या जनकास अद्वितीय महत्त्व प्राप्त झालेले आहे. भारतात इतिहासलेखनाविषयी प्राचीन काळी फारशी आस्था नसल्यामुळे प्राचीन राजे, तत्कालीन लेखक, विद्वज्जन इत्यादींची परिपूर्ण वा विश्वासार्ह माहिती क्वचितच मिळते. विज्ञानेश्वरही यास अपवाद ठरलेला नाही; पण पुरातन ग्रंथकारांची निदान पुसटशी ओळख तसेच सखोल परीक्षा त्यांच्या विवक्षित ग्रंथांच्या अध्ययनावरूनच होऊ शकते. मिताक्षरा ही याज्ञवल्क्यस्मृतीवर लिहिलेली टीका असून तिच्या उपसंहारामध्ये एक श्लोक आढळतो. त्यावरून विज्ञानेश्वराबद्दल थोडीशी माहिती समजते. ती पुढीलप्रमाणे :

भूतपूर्व निजामाच्या हैदराबाद संस्थानामध्ये असलेले कल्याणी शहर ज्या राज्याची राजधानी होते, त्यामध्ये राज्य करणाऱ्या चालुक्य वंशातील सहावा विक्रमादित्य ह्या राजाच्या अमदानीमध्ये (१०७६-११२६) विज्ञानेश्वराने मिताक्षरा या ग्रंथाची रचना केलेली असावी. विज्ञानेश्वराने असहाय, विश्वरूप, मेधातिथी, श्रीकर, भारूची व भोजदेव अशा सहा पूर्वकालीन टीकाकारांचा उल्लेख केलेला आढळतो. त्याचप्रमाणे १२०० नंतर देवण्णभट्ट याने लिहिलेल्या स्मृतिचंद्रिका या निबंधग्रंथामध्ये मिताक्षराचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. या व अन्य पुराव्यांवरून विज्ञानेश्वराने मिताक्षरा हा टीकाग्रंथ ११०० ते ११२० या दरम्यानच्या काळात लिहिला असावा, असे मानावयास हरकत नाही. विज्ञानेश्वर हा पद्मनाभ भट्टोपाध्याय याचा पुत्र व भारद्वाजगोत्री होता आणि उत्तमाचा शिष्य होता. विज्ञानयोगिन्‌ व परमहंस असा त्याचा निर्देश खुद्द मिताक्षरा व अन्य ग्रंथांत आढळल्यामुळे तो उत्तरकालात संन्यासाश्रमी झाला असावा.

तथापि विज्ञानेश्वराविषयीची ग्रांथिक व वैचारिक माहिती अधिक महत्त्वाची आहे. याज्ञवल्क्यस्मृती ही आचार, व्यवहार व प्रायश्चित्त अशा तीन अध्यायांमध्ये विभागलेली आहे. परंतु अगोदरच्या टीकाकारांच्या मानाने विज्ञानेश्वराने प्रायश्चित प्रकरणाचे अधिक विस्तृत विवेचन केलेले आढळते. त्यावरून दोषापनयन किंवा पापक्षालन अशा विषयांकडे अकराव्या शतकानंतर हिंदूंचे अधिक लक्ष लागले असावे असे दिसते. हिंदू विधीच्या पुराणे या एका मूलस्रोताकडे विज्ञानेश्वराने त्याच्या नंतरच्या ग्रंथकारांच्या मानाने जाणूनबुजून दुर्लक्ष केलेले आढळते. कारण एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये त्याने पुराणांचा संदर्भ फक्त पाचच ठिकाणी दिलेला आहे. मिताक्षरा ही बाह्यतः याज्ञवल्क्यस्मृतीवरील टीका असली, तरी विज्ञानेश्वराने जागोजागी याज्ञवल्क्यस्मृतीचे विवेचन करताना किमान ४०-५० इतर ग्रंथांतील स्मृतिवचनांचे समांतर संदर्भ देऊन त्यांच्यावरसुध्दा टीकाटिपणी केलेली आहे. त्यामुळे मिताक्षरा हा एक निबंधग्रंथच झालेला आहे.

विज्ञानेश्वराचा उदार दृष्टिकोण व वैचारिक प्रगल्भता यांमुळे मिताक्षराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. या दृष्टीने त्याच्या दोनतीन गोष्टींचा उल्लेख करणे इष्ट ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा स्त्रीसंपत्तीविषयक अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोण. हिंदू विधीप्रमाणे हिंदू स्त्रीकडे १९५६ च्या हिंदू उत्तराधिकार अधिनियमापूर्वी दोन प्रकारची संपत्ती असे : स्त्रीधन व स्त्रीधनेतर संपत्ती. स्त्रीधनाचे वैशिष्ट्य  असे, की स्त्रीला स्त्रीधनाची पूर्ण विल्हेवाट करण्याचा हक्क होता व तिच्या मृत्यूनंतर तो तिच्या वारसांकडे जात असे. मात्र स्त्रीला स्त्रीधनेतर संपत्तीचा फक्त आमरण उपभोग घेण्याचा अधिकार हिंदू विधीने ढोबळमानाने दिलेला होता. बहुसंख्य धर्मशास्त्रकारांच्या मते स्त्रीधन हे मनूने सांगितलेल्या षड्‌विध प्रकारांपुरतेच-म्हणजे स्त्रीला तिच्या पिता, माता, भ्राता, पती इत्यादिकांनी विवाह व अन्य प्रसंगी दिलेल्या संपत्तीपुरतेच-मर्यादित असे. म्हणजे वारसा, विभागणी, परिग्रह इ. मार्गांनी स्त्रीला मिळालेल्या संपत्तीचा स्त्रीधनामध्ये समावेश होत नव्हता. परंतु जे जे धन स्त्रीला प्राप्त झाले आहे, ते स्त्रीधन अशी व्युत्पत्तिजन्य व्याख्या करून विज्ञानेश्वराने स्त्रीधनाच्या जुनाट संकल्पनेवर प्रचंड हल्ला केला. याज्ञवल्क्यस्मृतीच्या द्वितीयाध्यायातील १४३ व्या श्लोकाचे निरूपण करीत असताना विज्ञानेश्वर लिहितो:

‘‘आद्यशब्देन रिक्थक्रयसंविभागपरिग्रहाधिगमप्राप्तं एतत्स्त्रीधनं मन्वादिभिरूक्तम्‌ । स्त्रीधनशब्दश्च यौगिको न पारिभाषिकः ।। योगसंभवे परिभाषाया अयुक्तत्वात्‌ ।’’

परंतु पुरूषाच्या संपत्तीप्रमाणेच स्त्रीधनामध्येसुध्दा रिक्थ (वारसा-इन्‌हेरिटन्स), क्रय (खरेदी-पर्चेस), संविभाग (वाटणी-पाटिर्शन), परिग्रह (स्वामिरहित संपत्तीचा स्वीकार-सीझर) व अधिगम (गुप्तधन-फाइन्डिंग) या मार्गांनी स्त्रीला प्राप्त झालेल्या संपत्तीचा समावेश असावा, हे विज्ञानेश्वराचे मत दुर्दैवाने प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायाधीशांना पटले नाही. १८७० मध्ये ‘मॅरिड विमेन्स राइट टू प्रॉपर्टी अँक्ट’ (मालमत्तेवरील विवाहित स्त्रीच्या हक्कासंबंधीचा कायदा) हा अधिनियम संमत होईपर्यंत इंग्लंडमधील विवाहित स्त्रियांना स्वतःची मालमत्ता म्हणून एक कपर्दिकसुध्दा ठेवण्याचा हक्क नव्हता, हे एक त्याचे कारण असू शकेल. त्यामुळे गौरेतर लोकांचा कायदा स्त्री संपत्तीच्या बाबतीत इतका पुरोगामी असेल, हे इंग्रज न्यायाधीशांना पटणे कठीण होते. सुदैवाने हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ च्या कलम १४(१) अन्वये स्त्रीधन व स्त्रीधनेतर संपत्ती यांच्यामधील फरक नाहीसा केलेला असून, स्त्रीला तिच्या संपूर्ण संपत्तीबाबत अमर्यादित हक्क बहाल करण्यत आलेले आहेत. विज्ञानेश्वराने इ. स. ११२० च्या सुमारास जे तत्त्व सांगितले, त्याचा संसद किंवा न्यायालये यांना अंगीकार करण्यासाठी सु. नऊ शतके लागावी, हाच विज्ञानेश्वराच्या वैचारिक प्रगल्भतेचा पुरावा होय.

विज्ञानेश्वराच्या स्थिरबुध्दीचा व शास्त्रीय दृष्टिकोणाचा दाखला वारसाहक्काच्या तरतुदीमध्ये आढळतो. निपुत्रिक पुरूषाचे जवळचे वारस सांगितल्यावर उरलेल्या वारसांमध्ये अग्रक्रम कसा ठरवावा, ह्याचे सूत्र सांगत असताना मनू म्हणतो ‘‘अनन्तरः सपिण्डाद्यस्तस्य तस्य धनं भवेत्‌।’’ (मनुस्मृति ९ : १८७). याचा ढोबळ अर्थ असा, की वारसांमध्ये जो अधिक जवळचा ‘सपिण्ड’ असेल, त्याला मृतपुरूषाची संपत्ती वारसाहक्काने अग्रक्रमाने मिळेल. मनूचा हा नियम सर्व टीकाकारांनी शिरसावंद्य मानला आहे; परंतु त्याचे स्पष्टीकरण करताना मात्र वेगवेगळ्या पंथांचा आधार घेतला आहे. कारण सपिण्ड म्हणजे काय या प्रश्नाविषयीचा ऊहापोह करताना दायभागकार जीमूतवाहन ह्या विज्ञानेश्वराच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्याचे असे स्पष्टीकरण आहे, की ‘पिण्ड’ म्हणजे श्राध्दादिप्रसंगी दिला जाणारा पिण्ड. त्यामुळे जीमूतवाहनाच्या मते पिण्डदानक्रियेच्या स्वरूपात ज्याला मृतात्म्यावर उपकार करण्याचा अग्रक्रमाने अधिकार आहे, त्याला मृत व्यक्तीचा वारस या नात्याने अधिक प्राधान्य आहे. कर्मकांडावर अवलंबून असल्यामुळे हा दृष्टिकोण जुनाट व बुरसटलेला आहे हे सांगणे नलगे. विज्ञानेश्वराने पिण्ड याचे विवेचन करताना शास्त्रीय दृष्टिकोण स्वीकारला व पिण्ड या शब्दाचा अर्थ शरीरावयवसमान मानून, मनुवचनाचे स्पष्टीकरण देण्याच्या निमित्ताने ज्या वारसाकडे ‘प्रत्यासत्ति’ म्हणजे अधिक रक्त-सान्निध्य आहे त्याला अधिक वारसाधिकार आहे, असे प्रतिपादन केले. म्हणजे लांबच्या वारसांपेक्षा जवळच्या नातेवाईकांना वारसाधिकारामध्ये अग्रक्रम द्यावा; असा साधा, सुबोध व शास्त्रीय दृष्ट्या प्रागतिक स्वरूपाचा नियम सांगितल

उत्तराधिकारासंबंधी विवेचन करताना पिता-पुत्रसंबंधांत विज्ञानेश्वराने एक विलक्षण तत्त्व प्रतिपादन केले. विज्ञानेश्वर व त्याचे अनुयायी सोडून अन्य हिंदू पंडितांच्या मते व कदाचित एक रोमन विधी सोडल्यास जगातील जवळजवळ सगळ्याच विधींच्या तरतुदींनुसार पित्याची संपत्ती ही पुत्राला पित्याच्या मृत्यूनंतरच वारसाहक्काने प्राप्त होते. परंतु विज्ञानेश्वराने पित्याच्या स्वार्जित वा वडिलोपार्जित संपत्तीमध्ये पुत्राला जन्मतःच अधिकार प्राप्त होतो, असे आग्रहाने प्रतिपादन केले. बंगाल वगळता संपूर्ण भारतातील हिंदूंनी ह्या तत्त्वाचा मनापासून अंगीकार आजतागायत केलेला दिसतो. अर्थात हे तत्त्व नवीन नव्हते. फार पूर्वी मिताक्षरामध्ये (२/११४) उद्‌धृत केलेल्या गौतमधर्मसूत्रामध्ये ‘जन्मनैवस्वत्वम्‌’ या अर्थाच्या ‘उत्पत्त्यैवार्थस्वामित्वं लभेतेत्याचार्याः’ या सूत्राचा उल्लेख आलेला दिसतो. परंतु विज्ञानेश्वराने त्या तत्त्वाचा अधिकृत व निरपवाद अंगीकार करून हिंदू अविभक्त कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये त्याचा निरंकुश उपयोग सहजरीत्या करून दाखविला. कोणीही व्यक्ती संपत्तीचे अर्जन केवळ स्वतःकरिता करू शकत नाही व स्वतःच्या संपत्तीमध्ये इतरेजनांचा सुध्दा निदान गौण वा सुप्त हक्क असतो, ह्या मूलभूत सामाजिक संकल्पनेचा प्रभाव जन्मस्वामित्वाच्या तत्त्वावर पडलेला दिसतो.

विज्ञानेश्वर हा कुशाग्र बुध्दीचा विधिज्ञ होता. स्मृतिवचनांचा संदर्भ देताना व अर्थ स्पष्ट करून सांगताना तसेच त्यांमधील विरोधाभासाचे निराकरण करताना त्याने मीमांसाशास्त्राचा भरपूर आधार घेतलेला आहे. नियम, विधी, परिसंख्या इ. मीमांसातत्त्वांचा भरपूर वापर त्याने आपल्या विवेचनामध्ये बिनतोडपणे केलेला दिसतो. परंतु त्याचे व्यवहारी शहाणपण त्याने शास्त्रापेक्षा लोकमताला जे महत्त्व दिले, त्यामध्ये दिसून येते. याज्ञवल्क्याने पहिल्या अध्यायाच्या १५६ व्या श्लोकामध्ये ‘अस्वर्ग्यं लोकविद्विष्टं धर्म्यमप्याचरेन्न तु ।’ असे म्हणून धर्मापेक्षा लोकमताला प्राधान्य द्यावे असे मत मांडले. त्याचा मनापासून अंगीकार विज्ञानेश्वराने केलेला दिसतो. [परंतु याज्ञवल्क्यस्मृति ३ : १८ या श्लोकावर भाष्य करताना विज्ञानेश्वराने वरील श्लोक (१:१५६) मनुवचन आहे, असा अनवधानाने चुकीचा संदर्भ दिलेला आढळतो.] यामुळेच विज्ञानेश्वर व त्याचा प्रतिस्पर्धी जीमूतवाहन यांच्या प्रतिपादनांमध्ये जबरदस्त फरक पडलेला आढळतो. उदा., एखादी व्यक्ती संपत्तीची मालक कशी होते, हे सांगताना गौतमधर्मसूत्रामधील वर उल्लेख केल्याप्रमाणे रिक्थ, क्रय, संविभाग, परिग्रह व अधिगम हे पाचच मार्ग सांगितलेले आहेत. यांशिवाय अन्य मार्गाने विधिवत स्वाम्य मिळवता येते किंवा नाही, या महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करताना जीमूतवाहन म्हणतो, की ‘शास्त्रैकसमधिगम्यं स्वं’ म्हणजे स्वामित्व मिळवण्याचे जे मार्ग स्मृतीमध्ये सांगितलेले आहेत, त्याशिवाय अन्य मार्गाने संपत्तीचे अर्जन करता येणार नाही. याविषयी विज्ञानेश्वराचे मत असे, की भले शास्त्रामध्ये काहीही कथन केलेले असो, जर ‘आधि’ (गहाण) सारखा संपत्तीवर अधिकार मिळविण्याचा नवा मार्ग लोकांनी मान्य केला असेल व त्यांच्यामध्ये तो रूढ झालेला असेल, तर त्याला शास्त्रानेसुध्दा मान्यता द्यावी. म्हणजेच विधी हा चिरस्थायी स्वरूपाचा नसून तो लोकमतानुवर्ती होण्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल घडविण्यात यावेत असे विज्ञानेश्वराचे मत होते, तर स्मृतीमध्ये कथन केलेला विधी हा अपरिवर्तनीय स्वरूपाचा आहे, असे आग्रही प्रतिपादन जीमूतवाहनाने केलेले दिसते. मिताक्षराला गेली नऊ शतके बंगाल वगळता सर्व भारतात जे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले व लोकप्रियता लाभली, त्याचे रहस्य विज्ञानेश्वराच्या प्रगल्भ व लोकमतानुवर्ती प्रतिपादनामध्ये आहे, असे दिसते.

स्त्रीधनाची व्यापक व्याख्या करून समस्त स्त्रीवर्गाच्या मनात विज्ञानेश्वराने आदर व आपुलकी निर्माण केली. पित्याच्या मालमत्तेत पुत्राला जन्मापासूनच स्वामित्वाचा हक्क देऊन व वाटणीच्या प्रसंगी पुत्राला पित्याइतकाच हिस्सा देऊन विज्ञानेश्वराने प्रत्येक कुटुंबातील तरूण पिढीची म्हणजेच बहुसंख्याकांची मने जिंकली. बहुसंख्य हिंदू कुटुंबांची शेती हीच मालमत्ता असल्यामुळे पर्यायाने बहुसंख्य शेतकऱ्यांना आपलेसे केले. संपत्तीचे स्वामित्व मिळवून देणाऱ्या ज्या मार्गांना सामाजिक मान्यता लाभलेली आहे, त्यांना धर्मशास्त्रानेसुध्दा मान्यता दिली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन करून धनिक व व्यापारी वर्गांवरसुध्दा त्याने आपली छाप पाडली. धर्मशास्त्राचे निरूपण करताना ‘मळलेली वाट’ न सोडता थोडासा व्यवहारी दृष्टिकोण स्वीकारून एक थोर विधिज्ञ या नात्याने त्याने जी अजरामर लोकप्रियता मिळवली, तिला अन्यत्र तोड नाही.

लेखक : प्र. वा. रेगे

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate