অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हामुराबी

हामुराबी

(इ. स. पू. ?–? १७५०). बॅबिलन या प्राचीन नगर-राज्यातील सर्वश्रेष्ठ राजा व अ‍ॅमोराइट वंशातील सहावा अधिपती. त्याच्या पूर्वायुष्याविषयी तसेच जन्ममृत्यूच्या तारखा/सालांविषयी निश्चित माहिती ज्ञात नाही. त्याच्या राज्यकालाविषयी भिन्न मते असून काही तज्ज्ञांच्या मते इ. स. पू. १७९२–१७५० हा त्याच्या कारकीर्दीचा कालखंड आहे, तरकाही तज्ज्ञ इ. स. पू. १७२८–१६८६ हा कालखंड देतात. त्याच्या वडिलांचे नाव सिन-मुबाल्लित असून त्याला इल्तानीनामक एक बहीण होती. वडिलांच्या मृत्यूनंतर (इ. स. पू. १७९२) तो बॅबिलनच्या गादीवर आला. त्याच्याविषयीची विश्वसनीय व अधिकृत माहिती त्याने अधिकाऱ्यांना पाठविलेल्या इष्टिकालेखांवरील (टॅब्लेट) ५५ पत्रे व काळ्या डायोरेट( भरडकणी अग्निज) दगडावर कोरलेल्या विधिसंहितेवरून ज्ञात होते. त्या वेळी मेसोपोटेमियात (आधुनिक इराक) उत्तरेस बॅबिलन, दक्षिणेस लार्सा व इसिन अशी तीन बलवत्तर नगरराज्ये होती. त्यांपैकी बॅबिलनचे पहिले राजघराणे सुमू-अबूम या नावाच्या सेमिटिकवंशीय माणसाने स्थापन केले असून त्याने बॅबिलनभोवती तटबंदी बांधली होती आणि जवळची कीश, सिप्पर ही ठाणी काबीज केली होती. त्या वेळी इसिन व लार्सा यांत सत्तासंघर्ष उद्भवला. रिम-सिन (इ. स. पू. १८२२–१७२३) याने इसिनचा विनाश करून लार्साची सत्ता प्रबळ केली. तेव्हा लार्सा वबॅबिलन या सत्तेसाठी स्पर्धा उद्भवली. या स्पर्धेत हामुराबीने लार्साला निष्प्रभ करून मेसोपोटेमियाचा सर्व प्रदेश आपल्या अमलाखाली आणला आणि प्रबळ केंद्रसत्ता स्थापन केली. त्याने लष्करात सुधारणा करून भोवतालच्या अस्थिर राजकारणाचा फायदा घेऊन अर, ऊरुक, निप्पूर, एरिडू , सिप्पर, लार्सा, इसिन, बॉर्सिपा, लेगॅशमारी अशा महत्त्वाच्या नगरांवर कब्जा मिळविला. त्याबरोबर त्याने लोकहिताची कामे केली. दोन कालवे बांधले. त्यांपैकी युफ्रेटिसच्या कालव्यासंबंधी इष्टिकालेखात माहिती मिळते. त्याने अनेक मंदिरे बांधली. मार्डुक देवतेचा तो निस्सीम भक्त होता. राज्य करण्याचा दैवी अधिकार आपणास आहे, असे तो मानीत असे. कर आकारणीवर त्याचे बारीक लक्ष असे. आपले अधिकारी प्रजेचा छळ करणार नाहीत, यावर त्याचा कटाक्ष होता. त्याच्या एका इष्टिकालेखात मंदिरातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसंबंधी लिहिले आहे. राज्यकारभारातील अखेरच्या दिवसांतील कायदेविषयक घेतलेल्या निर्णयांचा संग्रह म्हणजे त्याची विधिसंहिता होय. ती बॅबिलनमधील मार्डुकच्या मंदिरात एका उभ्या काळ्या डायोरेट चिऱ्यावर कोरली आहे. तिचा शोध फ्रेंच पुराभिलेखविज्ञ झां-व्हिन्सेन्ट शील याने १९०१ मध्ये लावला. सांप्रत ही इष्टिका शिळा लूव्हर संग्रहालयात आहे. तीत २८२ निर्णयविधी असून त्यांत आर्थिक तरतुदी (वस्तूंचे दर, कर, उद्योग, वाणिज्य), कौटुंबिक तरतुदी (विवाह, घटस्फोट), फौजदारी कायदे (चोरी, खून) आणि नागरी कायदे( गुलामगिरी, कर्ज) वगैरेंविषयी कायदे केलेले होते आणि खटले चालविण्यासाठी न्यायाधीशांची नेमणूक केली होती. ते पूर्णतः राजाला जबाबदार असत. गुन्ह्यांच्या शिक्षा सामाजिक दर्जानुसार व परिस्थिती-नुसार दिल्या जात. उदा., जशास तसे हा न्याय होता. म्हणजे डोळ्यास डोळा, कानास कान. या संहितेचा मूळ आधार वा पार्श्वभूमी सुमेरियन-कालीन कायदेकानू होती. मूळ पाठ (मजकूर) सेमिटिक (अ‍ॅकेडियन) भाषेत आहे. बॅबिलोनियन संस्कृतीतील हामुराबीची कारकीर्द हा सुवर्णकाळ होता. त्याची देदीप्यमान कारकीर्द म्हणजे सुमेर संस्कृतीचे विलोपन होय.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate