অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हॉल्झबरी, लॉर्ड

हॉल्झबरी, लॉर्ड

(३ सप्टेंबर १८२३–११ डिसेंबर १९२१). ग्रेट ब्रिटनमधील ख्यातकीर्त विधिज्ञ व लॉर्ड चान्सेलर. त्याचे पूर्ण नाव लॉर्ड हार्डिंग स्टॅन्ली गिफर्ड हॉल्झबरी. त्याचा जन्म लंडन (इंग्लंड) येथे सरदार-सरंजामशाही घराण्यात झाला. त्याचे वडील लीज गिफर्ड जमीनदार होते. हॉल्झबरीचे शालेय शिक्षण लंडनमध्ये झाले. नंतर त्याने मर्टन कॉलेज (ऑक्सफर्ड) मधून पदवी संपादन केली (१८४२) आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी इनर टेंपल या संस्थेत आपले नाव नोंदविले (१८५०). त्याबरोबरच तो मध्यवर्ती फौजदारी न्यायालय आणि मिडलसेक्स सेशन कोर्टात काम करीत असे. नंतर तो वकिलांच्या बारमध्ये सामील झाला. राणीचा कायदेविषयक सल्लागार म्हणून त्याची नियुक्ती झाली. त्या वेळी तो इनर टेंपलमध्ये न्यायाधीशाच्या पदावर कार्यरत होता (१८६५). कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातर्फे त्याने कार्डिफमधून दोनदा (१८६८ व १८७४) संसदेवर जाण्यासाठी निवडणूक लढविली; पण यश मिळाले नाही. पुढे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली याने त्याची सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती केली (१८७५). त्याच सुमारास त्याला सरदार (नाइटहूड) करण्यात आले.

त्यानंतर १८७७ पासून लान्सेस्टोनचा प्रतिनिधी म्हणून हॉल्झबरी संसदेत कार्यरत होता. त्याला हॉल्झबरीचा बॅरन करण्यात आले आणि त्याची नियुक्ती लॉर्ड चान्सेलरपदी करण्यात आली (१८८५). या पदावर पुढे तो १८८६–९२ दरम्यान व नंतर १८९५–१९०५ दरम्यान कार्यरत होता. १८९८ मध्ये त्याला हॉल्झबरीचा सरदार आणि ‘व्हायकाउन्ट टिव्हेर्टन’ (बॅरनच्या वरचा दर्जा) करण्यात आले. तो ‘डाय-हार्ड’ ( सहजासहजी न मरणे) या कॉन्झर्व्हेटिव्ह सरदार समूहाचा पुढारी झाला; कारण १९११ सालच्या संसदीय कायद्यानुसार लॉर्ड्स सभागृहाचे अधिकार कमी करावयाचे ठरले होते. त्याला त्याने विरोध केला. त्याच्या मार्गदर्शनाखाली ‘हॉल्झबरीज लॉज ऑफ इंग्लंड’ हा अहवाल १९०५ आणि १९१६ दरम्यान प्रसिद्ध करण्यात आला. अखेरपर्यंत तो लोकांना कायदेविषयक दाव्यांमध्ये मार्गदर्शन करीत असे व सल्लाही देत असे.

वृद्धापकाळात अल्पशा आजाराने त्याचे लंडन येथे निधन झाले.

लेखक : के. के. गुजर

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate