निवारा ही आधुनिक काळातील मूलभूत मानवी गरज झाली आहे हे मान्य व्हायला विशेष हरकत नसावी. कारण योग्य निवारा असेल तरच सुरक्षित आणि स्वस्थ जीवन लाभू शकते. आणि अशी किमान सुरक्षितता आणि स्वास्थ्य असेल तरच मानव विकास आणि शैक्षणिक प्रगतीची अपेक्षा धरावी.
किमान जागृती हवी
आता हे तर खरेच की संविधानाने आपल्याला असा काही मुलभूत अधिकार म्हणून दिलेला नाही. पण सामाजिक न्यायाच्या आणि एकूण सामाजिक प्रगतीसाठी पुरेसे आणि परवडणारे गृहनिर्माण निर्माण होणे आणि ते सर्वांना उपलब्ध असणे ही समाजाची मूलभूत जबाबदारी आहे. हा मुद्दा सगळीकडून जोरात पुढे यायला हवा आणि सर्वमान्य व्हायला हवा.
मुंबईत लाखो जवळजवळ बेघर
घरांबद्दल मुंबईतील आकडेवारी या दृष्टीने फारच विपरीत आहे. मुंबई म्हटले म्हणजे आपण फक्त मुंबई पुरते बोलत नाही तर एकूणच भारतातल्या शहरांबद्दल बोलत आहोत. मुंबई फक्त वानगीदाखल घेतली आहे इतकेच. 2011 च्या जनगणनेनुसार मुंबईतील 41.85 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. म्हणजेच त्यांना योग्य घर नाहीच, तर अनेकदा त्यांना मूलभूत पायाभूत सुविधा देखील नाकारल्या गेल्या आहेत. सवयीने हे आपण विसरतो आणि आपली नजर, संवेदना अनेकदा बोथट झालेली असते म्हणा. पण विचार केला तर ही एक प्रचंडच संख्या आहे जी अक्षरश: लाखोंच्या घरात (2011 मध्ये 52 लाख) आहे.
नंबर एकचा प्रश्न
मुंबईतले प्रश्न कोणते असे विचारले तर प्रश्नांची मालिकाच लागेल. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला तर बहुतेक तज्ञांचे एकच उत्तर असेल- घरांचा प्रश्न! प्रत्येकाला वाटते की हा 'माझा' प्रश्न. पण हा 'त्याचा' प्रश्न नसून एकूण आजच्या शहरीकरणाचा प्रश्न आहे.
परवडणाऱ्या घरांसाठी
ही किमान जाण तरी प्रथम होणे आवश्यक आहे. त्यानंतर मग विचार सुरू होऊ शकतो की या संदर्भातले कायदेकानू आणि नियमावल्या आहेत तरी कोणत्या आणि काय? त्यानंतरच सुयोग्य आणि परवडणाऱ्या घरांसाठी प्रयत्न आणि सामुदायिक कार्यक्रम सुरू होऊ शकतात. आज तरी हे खूप लांबवरचे पल्ले आहेत आणि अशक्य कोटीतले वाटेल. पण देशात आणि जगभरात या दिशेने चाललेल्या कृती पाहिल्या तर काही धागेदोरे, दिशा मिळणे शक्य आहे.
दुसरे असे की, लांबवरचा विचार घटकाभर बाजूला राहू द्या. पण सर्वसाधारण नागरिकांना निवाऱ्यासंबंधी तातडीचे प्रश्नही बरेच भेडसावतात. सजग नागरिकांना त्याला सक्षमपणे हाताळण्याची क्षमता येणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
निवारा 'साक्षरता' हवी
याबद्दलची सध्याची कायद्यांची, नियमांची, नियोजनाची आणि प्रशासनिक प्रक्रियांची चौकट समजून घेताना विशेषत: घरबांधणी आणि घरांच्या एकूण प्रश्नांसंबंधी FSI, TDR, SRA वगैरे शब्दजंजाळातून आपल्याला वाट काढावी लागेल. पण हे सोप्या भाषेत समजून घेतले तरच आपण प्रश्नांना हात घालू शकतो.
अंतिम सुधारित : 3/26/2020