অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

२३ मे २००७, ज्या दिवशी जागतिक शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली

२३ मे २००७, ज्या दिवशी जागतिक शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली

मानवी इतिहासात तो दिवस ऐतिहासिकच म्हणायला हवा ज्या दिवशी, म्हणजे २३ मे २००७ रोजी, जागतिक शहरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा जास्त झाली. त्या दिवशी जगातील शहरी लोकसंख्या 3,303,992,253 होती, ग्रामीण लोकसंख्या 3,303,866,404 होती.

शहर विरुद्ध गाव?

पण याचा अर्थ कोणी असा कोणी काढू नये की शहरी लोकवस्ती महत्त्वाची असते आणि ग्रामीण लोकवस्ती बिनमहत्त्वाची असते. असा अर्थ जगासाठी फारच घातक ठरू शकेल.

शहरी आणि ग्रामीण लोकवस्त्या एकमेकांवर अनेक प्रकारे खूप अवलंबून असतात. ग्रामीण भागांत तयार होणाऱ्या कच्च्या मालावर शहरांत प्रक्रिया होते ती शहरी आणि ग्रामीण दोन्ही उपभोक्त्यांसाठी. पण असा विचार केला की शहरी भाग किंवा ग्रामीण भाग यांनी केवळ आपापल्या स्वत:च्या जीवावर जगावे आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू नये, तर शहरांचा निभाव नक्कीच लागणार नाही. ग्रामीण भागांचा मात्र निश्चितच निभाव लागेल!

ग्रामीण भागाविषयी दुजाभाव का?

शहरांना आपल्या अस्तित्वासाठी ग्रामीण संसाधने नेहमीच लागणार. ग्रामीण जनता शहरांच्या अनेक गरजा पुरवत असतात. शुद्ध हवा, पाणी अन्न, जंगलातील उत्पादने, खनिजे ही सगळी ग्रामीण भागांतूनच येतात. एवढे असूनही ग्रामीण जनतेला शहरी जनतेच्या तुलनेत असंतुलित न्यायच मिळत राहतो. गरिबीचा वाटा देखील ग्रामीण जनतेच्या पदरात भरपूर पडतो आणि शहरातील गार्बेज, कचराही. शिवाय अशुद्ध हवा, अशुद्ध पाणी आणि धोकादायक रासायनिक त्याज्य पदार्थ.

सावध ऐका पुढल्या हाका

या दिवसानंतर पुढचा मानवी इतिहास शहरी इतिहास झाला असे धरायला हरकत नाही. उत्क्रांतीच्या भाषेत मानव प्राण्याची ओळख 'होमो सॅपिअन' अशी सांगितली जाते. या सुमारे १२०००० वर्षांच्या कालखंडात तो प्रामुख्याने अन्न वेचणे, भटकंती, शिकार करायचा. सुमारे ११००० वर्षांपूर्वी तो खेडी वसवू लागला. सुमारे ५००० वर्षांपूर्वी पहिली शहरे वसली असे मानले जाते, तरी काहींच्या मते त्याहीपूर्वी शहरे होती. इसवी सन १८०० मध्ये फक्त ३% लोक शहरवासी होते. १९०० पर्यंत १३% लोक शहर निवासी झाले होते. म्हणजे त्यानंतर केवळ १०७ वर्षांनी ही संख्या ५०% पार करून पुढे गेली आहे.

पण यापुढचे गणित वाटते तेवढे सोपे नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंदाजाप्रमाणे आजची ३२० कोटी शहरवासियांची संख्या इसवी सन २०३० पर्यंत ५०० कोटींपर्यंत पोहोचेल. हा शहरीकरणाचा विस्फोट मुख्यत: आशिया, आफ्रिकेच्या गरीब आणि कमी उत्पन्न गटाच्या जगतात होणार आहे. त्याचे स्वरूप मुख्यत: दुहेरी असणार आहे: प्रचंड मोठ्या प्रमाणावर गरिबांनी केलेले स्थलांतर आणि या स्थलांतरितांची जन्मलेली बालके, पुढील पिढी!

शहरीकरणाच्या दोन कथा

प्रगत जगात शहरीकरणाचा उच्च बिंदू केव्हाच पार पडला आहे. यापुढे घडणारे मागास देशांतील शहरीकरण हे अनेक बाबतीत वेगळे ठरेल. या शहरीकरणाबरोबर झोपडपट्ट्या, वस्त्यांची वाढ आणि अन्य नागरी प्रश्न जोरात उफाळून येतील. याला सामोरे कसे जायचे? शहरीकरण ही ताकद आहे की संकट?

यातून एक मोठा भेद जागतिक पातळीवर पुढे येत आहे. ज्याप्रमाणे शहरे ही ग्रामीण भागांवर अवलंबून असतात त्याचप्रमाणे प्रगत जग देखील अप्रगत जगावर आवलंबून असते. पण जर नैसर्गिक, मानवी संसाधने वापरायची आणि आपल्यापुरते पाहायचे असा सीमित दृष्टीकोन प्रगत जगाने अंगिकारला तर त्यातून जे प्रश्न निर्माण होतील त्याची झळ प्रगत जगाला आणि पर्यायाने सर्व जगाला पोहोचल्यावाचून राहाणार नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेपासून अनेकांचे हेच मत आहे. त्याचप्रमाणे शहरीकरणाची आणि विकासाची आपली मॉडेल्स इतर सर्व जगावर लादणे प्रगत जगाने सोडून द्यावे. जर आशियाई, आफ्रिकी इतर प्रगतीशील जगताला आणि तेथील बुद्धीमंतांच्या प्रयोगशीलतेला वाव दिला आणि स्वातंत्र्य दिले तर मागासलेल्या देशातील हे विस्फोटक शहरीकरण ही सामाजिक बदलाची एक नवी ताकद बनू शकेल असे संयुक्त राष्ट्र संघटनेसकट अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मत आहे.

संतुलित दृष्टीकोन हवा

या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व यात असावे की आपण ग्रामीण-शहरी प्रश्नाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो का? प्रगत-मागासलेपणा या प्रश्नाकडे वेगळ्या नजरेने बघू शकतो का? केवळ एकतर्फा ग्रामीण जनतेने बहुसंख्य शहरी जनतेसाठी काय करावे असे न बघता ज्यांच्या आधारावर शहरे उभी आहेत अशा ग्रामीण भागांसाठी बहुसंख्य ताकदवर शहरी जनतेने काय करावे? प्रगत जगाने मागासलेल्या जगाकडे केवळ साधन म्हणून न बघता प्रगतीचे जागतिक सहकार्य म्हणून बघता येईल का आणि त्यासाठी काय करावे? असे अनेक प्रश्न यानिमित्त उभे राहतात.

अंतिम सुधारित : 2/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate