অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘ति’ला वाचवा, सन्मानाने जगवा

बालविवाह ही आपल्या समाजात प्रचलित असलेल्या अनेक अनिष्ट प्रथांपैकी एक आहे. सतीची चाल, केशवपन, विधवा पुनर्विवाह बंदी या आणि अशा अनेक चालत आलेल्या स्त्री-पुरुष विषमतेवर आधारित आणि पुरुष प्रधान संस्कृतीच लक्षण असलेल्यांपैकी व आजही समाजामध्ये असलेली एक अनिष्ट प्रथा आहे.

जालना जिल्ह्यात शून्य बालविवाह करण्याच्यादृष्टीने प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असले तरी समाजातील प्रत्येक नागरिकाने या प्रथेविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. बालविवाह रोखण्यासाठी आपण काय करु शकता. याबाबत थोडक्यात माहिती…

बालविवाहाची समस्या ही लिंगभेदावर आधारित समाजरचना, जातीव्यवस्था, पारंपरिक रुढी, स्थलांतरित कामगार, शाळाबाह्य मुलींचे चिंताजनक प्रमाण, बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबतचे अज्ञान आणि आरोग्य शिक्षणाबाबतची जनमानसातील उदासिनता, गाव पातळीपासून ते जिल्हास्तरापर्यंत या विषयाबाबत समज, गैरसमज, अंतर्गत वाद, समन्वयाचा असलेला अभाव या सर्व बाबी या विषयाच्या मुळाशी कारणीभूत आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि धर्म निरपेक्षता या मूल्यांवर आधारित भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला सन्मानाने आयुष्य जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यासारखे मुलभूत मानवी अधिकार दिले आहेत.

1989 साली झालेल्या बाल हक्क संहितेने बालकांच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करण्याच्या हेतूने जागतिक स्तरावर बालकांना सन्मानाने जगण्याचा, विकासाचा, शोषणापासून संरक्षणाचा आणि सहभागितेचा अधिकार अबाधित रहावा यासाठी 54 कलमी संहिता बहाल केली आहे. आपला देशही त्याला बांधिल आहे.

खर तर बालविवाह होऊ नये, अशी आपल्या सर्वांची प्रबळ इच्छा असते. मात्र वास्तव वेगळं आहे. नकळत्या वयात विवाह झाल्याने त्या अजाण मुलीच्या जीवनाची फरफट होते. लहान वयात विवाह म्हणजे शाळेपासून फारकत आणि त्यामुळे संपूर्ण जीवनात स्वत:च्या विकासाची आणि संधीची सर्व दारे आपोआपच बंद होऊन जातात. आरोग्याच्या तक्रारी डोक वर काढतात. त्यातूनच गर्भधारणा झाली तर दुष्टचक्र सुरु होतं. परिणामी आपल्या स्वत:च्या मुलींना आपण स्वत:हूनच मरणाच्या दारी पोहोचवत असतो. बालमाता मृत्यू, बालमृत्यू, कुपोषणसारख्या आजारपणामुळे मुलींचा आत्मविश्वास कमी होत जाऊन जगण्याची उमेद राहत नाही.

बालविवाह आपण कसे रोखू शकतो

बालविवाहपूर्व 


  • सर्वप्रथम दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन बालविवाह हा एक दंडनीय अपराध आहे, याची जाणीव करुन देऊन बालविवाह न करण्याबाबत प्रवृत्त करावे.
  • समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, नातेवाईक, शिक्षक, लोकसेवक, बालकल्याण समिती, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगाने बालविवाह होणाऱ्या कुटुंबांशी संवाद साधून त्यांना यापासून परावृत्त करावे.
  • मुलीसोबत चर्चा करुन बालविवाहाच्या परिणामाविषयी माहिती द्यावी.
  • सर्व प्राथमिक बाबीनंतरही बालविवाह रोखण्यास कुटुंबाचा नकार असेल तर बालविवाह अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
  • सीआरपीसीच्या कलम 151 नुसार पोलिसांना अपराध रोखण्यासाठी कारवाई करण्याचे अधिकार आहेत.

बालविवाहाच्या वेळी


  • बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याने बालविवाह होत असल्याची तक्रार बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 नुसार प्रथम श्रेणी न्यायपीठासमोर तक्रार अर्ज करुन बालविवाह रोखण्याबाबत आदेश मिळवावेत.
  • बालविवाह होत असल्याबाबत फोटो, निमंत्रण पत्रिका, लग्नाच्या खरेदीबाबतचे पुरावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अल्पवयीन असल्याबाबत पुरावे गोळा करावेत.
  • मुलीसोबत बालविवाह करण्याबाबत जबरदस्ती होत असल्याचे निदर्शनास आल्यास मुलीला त्वरित ताब्यात घेऊन बालन्याय मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2006 व कलम 32 नुसार प्रकरण बालकल्याण समितीसमोर सादर करावे.

बालविवाहानंतर


  • बालविवाह झाला असेल तर बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी विवाहादरम्यानचे पुरावे गोळा करावेत.
  • पोलिसामध्ये तक्रार करुन त्वरित दोषींना अटक करण्याची कार्यवाही करावी.
  • मुलीचा एकवेळेस जबाब नोंदविल्यानंतर तिची पुन्हा चौकशी करु नये.
  • मुलीसाठी समुपदेशन आणि पुनर्वसनाची गरज लक्षात ठेऊन कार्यवाही करावी

बालविवाहाची माहिती कोणाकडे द्यावी

गावपातळीवर
• बालविवाहाची माहिती आपण गावपातळीवर ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, शिक्षक, गाव बालसंरक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य
तालुकास्तरावर
• गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास कार्यक्रम, जवळचे पोलीस ठाणे (बालसंरक्षण अधिकारी), पंचायत समिती सदस्य
जिल्हास्तरावर

• बालकल्याण समिती, शिक्षणाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, महिला व बालकल्याण सभापती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला आणि बालविकास)

तक्रारीची कोणी दखल घेतली नाही तर

  • जिल्हा न्यायालय, बालकल्याण समिती
  • जिल्हाधिकारी
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
  • जिल्हा पोलीस अधीक्षक

आपल्या मुलींना विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी आजघडीला शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. आपल्या मुलींची मानसिक, शारिरीक वाढ होऊ देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. शिक्षण आणि त्यासोबत आपला सक्रिय पाठिंबा या गोष्टी आपण आपल्या मुलींपर्यंत पोहोचवल्या की बघा. आपल्या मुलीसाठी किती संधी उपलब्ध होतील, त्यांच्यासाठी विकासाच्या नव्या कल्पना समोर येतील. यातूनच शून्य बालविवाहाचे ध्येय गाठून बालविवाहाचे

हे दुष्टचक्र कायमस्वरुपी संपुष्टात येण्यास मदत होईल. अर्थात हे साध्य करण्यासाठी केवळ प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करुन भागणार नाही तर पालकांबरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींनीदेखील पुढाकार घेण्याची गरज आहे.

लेखक - अमोल महाजन,
जिल्हा माहिती कार्यालय, जालना.

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate