অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुमारी मातांचं हसणं जपण्यासाठी

कुमारी मातांचं हसणं जपण्यासाठी

बुलडाणा हे ताराबाई शिंदे यांचं गाव. ताराबाईंचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध आजही स्त्री-पुरुष भेदभाव जिथे जिथे होतो त्या प्रत्येक ठिकाणी डोळ्यात अंजन घालणारा आहे. बुलडाण्याची सध्याची ओळख म्हणजे बुलडाणा अर्बन को-ऑप. बँक आणि त्याचबरोबरीने डॉ. सीमा आगाशे आणि हर्षवर्धन आगाशे यांची संस्था. डॉ. सीमा आगाशे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. लव्ह ट्रस्टतर्फे चालवली जाणारी ही संस्था तरुण, फसवल्या गेलेल्या मुलींना आणि त्यांच्या बाळांनाही जीवदान देणारी ठरली आहे. त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने त्यांच्याशी केलेली ही बातचीत.

कुमारी मातांच्या मदतीसाठी संस्था स्थापन करावी असं का वाटलं?
सीमा आगाशे : १९९६ मध्ये माझ्याच हॉस्पिटलमध्ये एक केस आली होती. त्यातली तरुणी फसवली गेली होती. समाजात तोंड दाखवायला जागा नाही म्हणून तिने गर्भपाताचा प्रयत्न केला. तो फसला. त्यातून अनेक अडचणींवर मात करत त्या मुलाला वाचवलं. बाळाच्या जन्मानंतर त्या तरूणीचे भवितव्य लक्षात घेता, त्या मुलाला दत्तक देणे गरजेचचं होतं. या अनुभवातूनच अशा प्रकारच्या मुलींसाठी सेंटर आणि अनाथाश्रम सुरू करण्याची कल्पना पुढे आली. तरी प्रत्यक्षात संस्थेच्या कामाला १९९८ ला सुरूवात झाली.

या फसलेल्या (कुमारी माता) बलात्कारित मुली कोणत्या घटकातल्या असतात? शिक्षण आणि वय किती असतं?
सीमा आगाशे : मुख्यत्वे या मुली गरीब घरातल्या असतात. बहुसंख्य मुली अशिक्षितच असतात. आतापर्यंत फक्त ५% मुली शिक्षित आढळल्या. पदवी घेतलेल्या काही मुली आढळल्या आहेत. साधारण १४-१८ वर्षे या वयोगटातल्या मुली असतात. काही वेळा विवाहित पुरुषांशी संबंध आलेली एखादी मुलगी असते किंवा लवकर म्हणजे ४०-४५ च्या वयात वैधव्य आलेली एखादी स्त्री असते.

फसवणूक होण्याची काय कारणं दिसतात?

सीमा आगाशे : जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये काका, मामा म्हणजे घरातल्याच पुरूषाकडून वापर करून घेतलेला असतो. अनेकदा बहिणीचा नवराही असतो. मोठी बहीण गरोदर असली की तिच्या मदतीला लहान बहिणीला पाठवलं जातं. अशावेळी बहिणीचा नवरा तिची फसवणूक करतो. काही वेळा तरुण मुलामुलींचे प्रेम असतं. मुलगा लग्नाचे वचन देतो म्हणून शरीरसंबंध येण्यापर्यंत मजल जाते. पण नंतर मुलगी गरोदर आहे हे समजताच तोच मुलगा लग्नाला नकार देतो. बरेचदा काम देतो असं सांगूनही फसवणूक होते. शेतात कामाला गेलेली असताना, पाणी भरून घेऊन येत असताना, आडमार्गाने एकटीच जात असताना अशा अनेक वेळांना मुलींची फसवणूक होते.

किती मुली किंवा त्यांचे पालक कायद्याचा आधार घेतात?

सीमा आगाशे : मघाशी म्हटल्याप्रमाणे बरेचदा घरातला पुरूषच फसवणूक करतो. आता त्याच्यावर केस केली तर बदनामी होणार. मग तिच्या लग्नात अडचणी येणार. शिवाय मोठ्या मुलीच्या नवर्‍यानेच जर हे कृत्य केलं असेल आणि त्याच्यावर केस केली तर तिच्या भवितव्याचं काय? म्हणून अनेक पालक/मुली पोलिसांपर्यंत जातच नाहीत.

संस्थेत दाखल होणार्‍या मुली कोणत्या भागातून येतात?
सीमा आगाशे : मुख्यत्वे बुलडाणा जिल्हा आणि लगतचे जिल्हे - वाशिम, अकोला वगैरे. त्यातूनही खेडेगावातल्याच मुली जास्त असतात

येणारी प्रत्येक मुलगी बाळ इथे देऊन जाते का?
सीमा आगाशे : त्यांना जेव्हा स्वत:च्या गरोदरपणाबद्दल समजते तेव्हा पुढे काय? पालकांची काय प्रतिक्रिया असेल? ही भीती असते. Termination करण्याची वेळही निघून गेलेली असते. काही वेळा दोघांचाही जीव धोक्यात येईल असं काहीतरी पाऊल उचलणं, बाळाला जन्म देऊन त्याला मारून टाकणं असे प्रकार घडतात. मुली आत्महत्याही करतात. आमच्या सेंटरवर येऊन त्या सुखरूप बाळंतीण होतात. अगदी पाचवा-सहावा महिना सुरू असतानाच त्या इथे येतात. त्यामुळे लोक नावं ठेवतील ही भीती थोडी कमी असते. पुन्हा बाळ इथे दिल्यानंतर ते चांगल्याच घरात जाणार आहे हा विश्वास असतो. त्यामुळे आजपर्यंत एकाही मुलीने इथे बाळ द्यायला नकार दिलेला नाही. अर्थात मुलीच्या इच्छेनुसारच Surrender Letter घेतलं जातं. काहीवेळा तिसरी, चौथी किंवा पाचवी मुलगी झाली म्हणूनही आमच्या आश्रमात देतात. अशा वेळी वाटतं की त्या नवरा-बायकोला ते बाळ नकोच आहे, पण मग त्याला कुठेतरी फेकून देणं, मारून टाकणं यापेक्षा अनाथाश्रमात देणं बरं.


तुमच्या कामावर लोकांची काय प्रतिक्रिया?
सीमा आगाशे : १९९८ पासून ते आत्तापर्यंत जवळपास ३५० मुली येऊन गेल्या. तुम्ही अशी संस्था काढणं म्हणजे मुलींची होणारी फसवणूक किंवा बलात्कार याला खतपाणी घालणंच आहे असंही आम्हांला अनेकदा ऐकायला लागलं आहे. पण हळूहळू कामाचं महत्त्व समजायला लागलं आणि टीका कमी होत गेली. गरोदर आहे हे समजल्यानंतर आत्महत्या किंवा बाळाला जन्म देऊन त्याला मारणं ही अघोरी कृत्यं करण्यापेक्षा जीव वाचणं महत्त्वाचं.


अनाथाश्रमाबद्दल सांगाल का?
सीमा आगाशे : हा अनाथाश्रम इंग्लंडमधील लव्ह दांपत्याच्या सहकार्याने चालतो. Love Trust या नावाने. मुलींची डिलीव्हरी आमच्याच हॉस्पिटलमध्ये होते. बाळांची काळजी घ्यायच्या सर्व सोयी-सुविधा इथे आहेत. त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. आमच्या आश्रमातून आत्तापर्यंत जवळपास ६०० ते ७०० मुलं दत्तक गेली आहेत. ३ वर्षांपूर्वी मानसिक आजार असलेल्या बाळांसाठीही युनिट सुरू केलं आहे. २ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी मूल दत्तक जात नसेल तर ते दुसर्‍या संस्थेत पाठवावं हा शासनाचा दंडक आहे.

बाळं कुठे कुठे दत्तक जातात?
सीमा आगाशे : संस्थेकडे आंतरदेशीय दत्तकविधान देण्याचं लायसन्स नाही. त्यामुळे संस्थेतली बाळं देशातच जातात. बाहेरच्या देशातून भारतीय बाळांना खूप मागणी आहे. कारण black मुलं, चीनी किंवा जपानी ठेवणीची मुलं नको असतात. संस्थेचे ट्रस्टी लव्ह असं म्हणतात की मूल जिथं जन्मलं असेल तिथेच दत्तक गेलं तर चांगलं. शिवाय या मुलांचा गैरवापरही होतो. मुख्यत्वे अरब देशांमध्ये. त्यामुळे भारताने २००६-२०११ दरम्यान आंतरदेशीय आंतरदेशीय दत्तक विधानावर बंदी घातली होती. पण २०११ ते २०१२ च्या दरम्यान विशेष मुलांसाठी संसदेच्या आदेशावरून दत्तकविधान खुलं झालं आहे.

बाळांना दत्तक देताना तुम्ही काय काय पाहता?
सीमा आगाशे : ज्या कुटुंबाला किंवा ज्या दांपत्याला बाळ दत्तक घ्यायचं आहे त्यांची सर्व पाहणी होते. बाळ आंतरदेशीय दत्तक जाणार असेल तर त्यावर C­ARA­ (Central ­Adoption Resource ­Authority) चं नियंत्रण आहे. त्यातून भारतात आता सर्वोच्च न्यायालयाचा Indian Council for Social welfareहा विभाग काम करतो. तसेच राज्यस्तरीय पातळीवर S­ARA­ (State Adoption Resources ­Authority) नियंत्रण ठेवते.

पूर्वी असा नियम होता की जोडप्याला पहिला मुलगा असेल तर त्यांनी मुलगी घ्यायची. पहिली मुलगी असेल तर मुलगा घ्यायचा. पण २००५ मध्ये हा नियम बदलण्यात आला असून मुलगा/मुलगी कोणलाही दत्तक घेता येऊ शकतं. जोडपं किती शिकलंय त्यावरही अवलंबून असतं. जितकं जास्त शिक्षण तितकं मुली दत्तक घ्यायचं प्रमाण जास्त. (उदा. आयटी सेक्टरमध्ये नोकरी करणारे, सी.ए., इंजिनियर, डॉक्टर इ.) केरळसारख्या राज्यात मुली दत्तक घेण्याचं प्रमाण जास्त आहे. एक पालकही दत्तक घेऊ शकतो. पण स्त्री असेल तर मुलगी आणि पुरुष असेल तर मुलगा घेऊ शकतात. व्यवसाय असणार्‍या कुटुंबामध्ये मुलगा घेण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण ती व्यवसायाची गरज असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते. शिवाय आईवडिलांचचं वयही पाहिलं जातं. जोडप्याच्या वयाची बेरीज ८५ पेक्षा जास्त असता कामा नये.

शेवटी एक विचारावंसं वाटतं - तुमच्या कामामागची प्रेरणा कोणाची?

सीमा आगाशे : माझं शिक्षण बंगलोरला झालं. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि एम.डी. औरंगाबादमध्ये पूर्ण केलं. आगाशेंच्या घरात आले म्हणून हे काम सुरू केलं. माझे सासरे दिवाकर आगाशे मोठे समाजसेवक होते. ६० वर्षापूर्वी त्यांनी परिश्रम घेऊन स्थापन केलेलं भारत हायस्कूल अजूनही चालू आहे. मला वाटतं माझ्या कार्याची प्रेरणा मी त्यांच्याकडूनच घेतली आहे.
----


डॉ. सीमा आगाशे
द लव्ह ट्रस्ट, बुलडाणा

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate