অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रहणांकित चांदणं : हेमांगी हसते तेव्हा...

ग्रहणांकित चांदणं : हेमांगी हसते तेव्हा...

हायड्रोसेफेलेस या आजारामुळे बुद्धीच्या स्तरावर परिणाम झालेल्या एका छोट्या मुलीचा ‘निसर्गस्पर्श’ झाल्यानंतरचा एक हृद्य अनुभव

दिलासा ही आमची विशेष मुलांची शाळा. ६ ते १८ वयोगटातल्या अनेक मतिमंद, गतिमंद, ऑटिस्टिक लहान मोठ्या मुलांची ती बालवाडीच आहे असं म्हटलं तरी चालेल. फक्त बालवाडीत येणारी सगळी बालके कशी साजिरी-गोजिरी असतात, आम्ही मात्र करुणेच्या महापुरात लहानसहान आनंदाचे झरे शोधत रहायचो.

जून महिना आमच्या शाळेतही नव्या विद्यार्थ्यांचा, नव्या प्रवेशांचा, धावपळीचा असतो. अशाच एका वर्षी हेमांगीने शाळेत प्रवेश घेतला. हेमांगी हायड्रोसेफेलेसची केस होती. मेंदूभोवती पाण्याचा थर वाढल्यामुळे डोक्याचा आकार मोठा झालेला; कपाळ पुढे आलेले, बुद्धीचा स्तर अतिशय मागासलेला. तिचा रंग मात्र गोरापान. ओठ लालचुटुक. निर्विकार चेहरा आणि गारगोटीसारखे थिजलेले डोळे. हेमांगीची चणही लहानसर होती. दहा वर्षाची हेमांगी पाच-सहा वर्षांची दिसत असे. पायातही दोष होता. एक पाय ओढत ती फेंगडे चालायची.

शाळेत नव्याने आलेली मुले सुरूवातीला खूप रडून ओरडून गोंधळ घालायची. काहीजण आईच्या मागे जाण्यासाठी धावपळ करायची, नव्या वातावरणात बुजून काही मुलं घाबरून रडवेल्या चेहर्‍याने बसून रहात. हेमांगी या कुणाच्यातही सामावली नाही. आल्या दिवसापासूनच शांतपणे, एकटीच बसून रहात असे. अगदी निर्विकारपणे. थंड भाव चेहेर्‍यावर वागवत. ना कधी खेळायला पुढे येत असे, ना गोष्टी-गाण्यात सहभागी होत असे. शाळेच्या पहिल्या घंटेला तिचे वडील तिला सोडून जात आणि शाळा सुटल्यावर रिक्षावाल्या काकांबरोबर ती घरी जात असे. हेमांगीला शाळेत येण्याजाण्याचा त्रास वाटत नसे तसा फारसा आनंदही जाणवत नसे. आमच्या साठेबाई तिला फिलॉसॉफर म्हणत, मदतनीस मीना तिला संत सखू म्हणून हाक मारे. कुणी निंदा कुणी वंदा, शांतपणा हा हेमांगीचा स्थायीभाव होता.

अपंग मुलांच्या घरी जाऊन, मुलांच्या आजाराचं कारण, कुटुंबातील त्या अपंग मुलाचे स्थान, आर्थिक परिस्थिती या सार्‍याचा अभ्यास करायचा आमचा प्रयत्न असे. या ’होम व्हिजिट’नंतर माझ्या लक्षात आलं की हेमांगीच्या आईचं निधन हेमांगी एक-दीड वर्षांची असतानाच झालं होतं. तिची काकू आणि आजी तिचा सांभाळ करत. एका आईवेगळ्या, मानसिक अपंग मुलीचं आयुष्य कसं असणार? तिचा दिनक्रम कसा असणार? आपल्या डोळ्यापुढे जे चित्र उभे राहतं त्यापेक्षा ते वास्तव अजिबात वेगळं नव्हतं. या होम व्हिजिटनंतर मला हेमांगीबद्दल जास्त आत्मीयता वाटू लागली. हेमांगीच्या निर्विकार वृत्तीमागे एक मानसशास्त्रीय कारण तर होतंच पण तिच्या शरीरातल्या संवेदन वाहक यंत्रणाही मतीमंदत्वामुळे क्षीण बनलेल्या होत्या.

असे पाच-सहा महिने गेले असतील. हळूहळू हेमांगी मुलांबरोबर बडबडगीते म्हणण्यात, बालगीतांवर हातवारे करण्यात सहभागी होऊ लागली. तरीही ती कधी हसायची नाही, रडायचीही नाही. जाणीवा-नेणिवांच्या पलीकडे गेलेली, अगदी ज्ञानेश्वरांपर्यंत पोचलेली, ‘स्थितप्रज्ञ’ होती खरी!

वर्गातली सगळी मुले, सतरंजीवर, बाईंच्या अवतीभोवती गोलाकार बसलेली असत. काहीजण मध्येच उठून खिडकीतून पक्षी पहात, काहींना बाग, बागेतली फुलपाखरे पहाण्यात गंमत वाटे. मुलांना वर्गामध्ये हालचालीचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. त्यादिवशी हेमांगी खिडकीपाशी उभी होती. जोराचा वारा सुटला होता. पावसाची लक्षणे दिसत होती. सुसाट वार्‍याने खिडकीचे तावदान जोरात आपटले आणि... हेमांगीचं बोट खिडकीच्या दारात सापडलं. तिच्या बाईंचं लक्ष होतंच तिच्याकडे. पण सारं एका क्षणात झालं आणि बाई तिच्याजवळ पोहचेपर्यंत हेमांगीला दुखापत झाली. आम्ही सर्वजण कळवळून गेलो. पण हेमांगी रडली नाही, ओरडली नाही. तिच्या सार्‍या संवेदने थिजलेल्या आहेत; क्षीण बनल्या आहेत हे मी जाणून होते. पण शरीराला इजा झाली तरी रडू येऊ नये?
‘खूप दुखतंय का ग हेमांगी?’ या माझ्या प्रश्नाला तिने काहीही प्रतिसाद दिला नाही. बोटातून भळभळ वाहणार्‍या रक्ताकडे ती तशीच एकटक बघत राहिली, थिजलेल्या नजरेने !

‘नेमेची येतो मग पावसाळा’ असे म्हणत शाळेची दोन-तीन वर्षे गेली. काळ पुढे सरकला तो आपल्या सर्वसामान्यांच्या संदर्भात. आमच्या शाळेच्या चाकोरीत काही फारसा बदल घडला नव्हता. हेमांगी आता थोडी उंच दिसू लागली होती. हळू आवाजात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असे. एखादी गोष्ट खूप आवडली की दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत असे. तिची तेवढीच प्रगती झाली होती.
मुलांना पाळीव प्राण्यांची ओळख व्हावी म्हणून आम्ही प्रत्यक्ष छोटे प्राणी शाळेत घेऊन येत असू. शाळेच्या वॉचमनने एकदा कोंबड्या आणि काही पिल्लं मुलांना दाखवायला आणली होती. कुणीतरी मनीमाऊ आणि तिची बाळ दाखवायला आणली होती. या वेळेला कुत्र्याची तीन पिल्लं आमच्या मुलांच्या भेटीला कुणीतरी घेऊन आलं. पांढरीशुभ्र, कापसासारखी मऊ मऊ, गोंडेदार शेपूट, काळे लुकलुकणारे इवलेसे डोळे. मुलं पिल्लांभोवती गोळा झाली. हेमांगी दोन्ही हाताने टाळ्या वाजवत होती. बाईंनी तिच्या मांडीवर एक पिल्लू उचलून ठेवलं. आनंदाची गोष्ट म्हणजे हेमांगीला ते आवडलं. बाईंनी सांगितल्याप्रमाणे पिलाच्या पाठीवरून ती हात फिरवू लागली. मग तिने पिल्लू उचलून गालाजवळ नेले. आपली चिमुकली जीभ बाहेर काढून पिल्लू हेमांगीचा गाल चाटू लागले. तो ओलसर, थंडगार स्पर्श हेमांगीला आवडला असावा आणि काय आश्चर्य? हेमांगी खुदकन हसली.

जगावर रुसलेली, नियतीने केलेल्या अन्यायाने आतल्या आत घुसमटलेली, मिटून गेलेली हेमांगी निसर्गातल्या तिच्यासारख्याच, निरागस, निर्व्याज प्रेमस्पर्शाने सुखावली, रोमांचित झाली आणि तिला हसू फुटलं !
----
संध्या देवरुखकर
४३/१३, कल्पना अपार्टमेंट,
नळस्टॉपजवळ, एरंडवणे
पुणे - ४११००४
चलभाष : ९८५०६०७८९०

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate