बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावात जन्मल्यापासून आयुष्याच्या वाटेवर अनुभवलेले अनेक खडतर प्रवास.. वेळोवेळी मिळालेले धक्के.. पदरी पडलेले नैराश्य.. यातून खचून न जाता स्वयंसिद्धा अभियानात आजवर लाखो मुलींना प्रशिक्षित करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या मंत्रालयातील विशेष कार्य अधिकारी कविता सुभाष नावंदे यांची ही यशकथा..! कविता यांचे मूळ गाव अंबेजोगाई. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. घरात चार बहिणी, एक भाऊ असा परिवार. वडिलांच्या वारंवार होणाऱ्या बदलीमुळे परळी, पाटोदा, बीड येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण करताच लग्न झाले. बीपीएड, एमपीएडचे शिक्षण औरंगाबाद येथे घेतले. ‘ते’ सात दिवस पहिला संघर्ष ८० च्या दशकात मुलींना फारसे शिक्षण घेऊ दिले जात नव्हते.
कविता यांचे वडिल माणिकराव यांनी देखील दहावीनंतर पुढे त्यांचे शिक्षण बंद असा आदेशच घरात दिला. आईने शिफारस केली, वडिलांच्या विनवण्या केल्या, मैत्रिणींच्या पालकांनी समजाविले परंतु ते काही ऐकत नव्हते, मग सुरु झाला पहिला एल्गार.. पुढील शिक्षणाला परवानगी मिळेपर्यंत काहीही न खाण्याचा.. इवल्याशा वयात कविता यांनी सात दिवस उपवास केल्यानंतर त्यांना परवानगी मिळाली. आई विजयलक्ष्मी यांनी उत्साह वाढविला. शालेय जीवनापासून चपळ, पण.. कविता या शालेय जीवनापासूनच हरहुन्नरी होत्या. विविध स्पर्धांमध्ये त्यांनी चांगले यश संपादन केले. कब्बडी, भरतनाट्यम, बॅडमिंटनमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य संपादन केलं होतं. कराटे प्रशिक्षण घेत, होमगार्डना देखील प्रशिक्षण दिले. स्पर्धांमध्ये यश संपादन करीत अनेक बक्षीसे, प्रमाणपत्र मिळविली.
आपण कराटे मास्टर असल्याच्या अविर्भावात असतांनाच कराटेला मान्यताच नसल्याचे कविता यांना कळले. लग्नानंतर पुन्हा ज्युडो प्रशिक्षण घेतले. त्यात प्राविण्य मिळविले. अभ्यासासोबतच फावल्या वेळेत कविता यांनी अनेक ‘कविता’ आपल्या वहीत उतरविल्या. अनेकांना प्रेरणादायी ठरतील अशाच त्यांच्या कविता वाचून अनेकांनी दाद दिली. मनावर दगड ठेवत पटकाविला मान कविता यांचे बाळ आठ महिन्यांचे असतांना त्या एनआयएस डिप्लोमासाठी पटियाला येथे रवाना झाल्या. दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमात सहा महिन्यांनी एकदा बाळाची भेट होत होती. आईचे काळीज कासावीस होत असतांना वैद्यकीय शिक्षणाचा अर्धा अभ्यासक्रम असलेला एनआयएसचा अभ्यास करावा लागत होता. प्रशिक्षणकाळात पंजाबच्या तगड्या स्पर्धकांसोबत कुस्ती, दोरावर चढणे असा व्यायाम त्यांना करावा लागत होता. सर्व खडतर असतांना देखील कविता यांनी एनआयएस डिप्लोमा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होण्याचा मान पटकाविला. पती सुभाष नावंदे यांनी चांगले सहकार्य केले.
लाखो मुलींना दिले स्वयंसिद्धाचे प्रशिक्षण १९९८ मध्ये शासकीय प्रशिक्षक म्हणून औरंगाबाद येथे त्यांची पहिली नेमणूक झाली. औरंगाबाद, सांगली येथे सेवा बजाविल्यानंतर त्या पुणे येथे रुजू झाल्या. २००१ ला शासनाच्या धोरणानुसार स्वयंसिद्धा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली. कविता यांनी योजनेच्या माध्यमातून ठिकठिकाणी ग्रामीण तसेच शहरी मुलींना ज्युडो, कराटेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. आजवर कविता नावंदे यांनी जवळपास दोन हजार मास्टर्स घडविले असून लाखो मुलींना प्रशिक्षण दिले आहे. शासनाकडून आजवर कोणताही निधी न घेता केवळ महिला सक्षम व्हाव्या या उद्देशाने त्यांनी राज्यात महिला, मुलींचे एक संघटन उभारले. आजदेखील कविता यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या विद्यार्थिनी विना मोबदला शहरी, ग्रामीण व आदिवासी बहुल भागात प्रशिक्षण देत आहेत. बेस्ट कोच ॲवार्ड भारतातील पहिल्या पदवीप्राप्त महिला प्रशिक्षक झाल्यानंतर कविता यांनी लाखो मुलींना स्वत:च्या बचावाचे धडे दिले, सामाजिक कार्यात सहभाग घेतला.
मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी पोशमपल्लू सर, क्रीडापटू धनराज पिल्ले, अंजली भागवत यांनी पुढाकार घेतल्याने २०१४ मध्ये कविता यांना राज्य शासकीय सेवेतील १२८ प्रशिक्षकांमधून तर ज्युडो या खेळातील मिळालेला हा पहिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्वत:ची स्वप्ने, स्वतःचा आत्मविश्वास घेऊन प्रवास कविता नावंदे यांनी लहानपणापासून पाहिलेली स्वप्ने आणि कोणतेही कार्य स्वत: पार पाडण्याचा असलेला आत्मविश्वास त्यांना आज मंत्रालयापर्यंत घेऊन आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या विशेष कार्य अधिकारी म्हणून त्या आज काम पाहत आहे. खेळाडू व त्यांच्या समस्या, महिला स्वसंरक्षण : काळाची गरज, ग्रामीण भागातील मुलींसाठी काहीतरी करण्याची तळमळ, युवकांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे, सर्वांसाठी सुदृढता, युवा नेतृत्त्व विकास, क्रीडा विषयक अनेक समस्या त्यांना आज देखील स्वस्थ बसू देत नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील युवा युवतींना एकत्रित आणणे त्यांना शासन योजनेची माहिती देणे, स्वयंसिध्दा युवती व युवा प्रशिक्षण देणाऱ्यांना त्या प्रोत्साहित करतात. त्यांना विविध माध्यमातून योग्य दिशा दाखवून खंबीरपणे पाठीशी उभे राहतात.
लेखक - चेतन रविंद्र वाणी,
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 6/19/2020
शिक्षण हे व्यक्तिविकास साधण्याचे एक प्रमुख साधन मा...
राज्यातील मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारसी, जै...
अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थांना रोजगाराभिमुख प्...
सातारा जिल्ह्याच्या वाई येथील रेश्मा गाढवे आणि विश...