অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण

डॉ.मोहम्मद युनूस यांनी बांगला देशात बचत गटांचे बीज रोवले. त्यांनी जाबेरा या गावात गरीबांच्या बचतीतून ग्रामीण बँकेचा प्रकल्प सुरु केला. ग्रामीण बँकेकडे बांगला देशात आज 96% महिला सदस्य आहेत व 90% शेअर्स महिलांच्या मालकीचे आहेत. बांगलादेशातील गरीबी दूर करण्यासाठी व कुटुंबे आत्मनिर्भर राहण्यासाठी डॉ.युनूस यांनी बचत गट हे माध्यम लोकांच्या हाती सोपविले आहे. याच धर्तीवर भारतामध्ये 1990 च्या दशकात नाबार्ड, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामविकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. 

समान प्रश्न, सारखे आचार विचार, समान मते असणारे स्त्री किंवा पुरुष एकत्र येतात व नियमित बचतीच्या माध्यमातून आपल्या छोट्या मोठ्या आर्थिक गरजा भागवून आपला सर्वांगीण विकास साधतात त्यास स्वयंसहाय्यता समूह अथवा स्वयंसहाय्यता गट म्हणतात. नियमितपणे केलेल्या अल्पबचतीतून आर्थिक साहाय्य करण्यासाठी भांडवल उभे करण्यासाठी संघटनशक्ती वाढविण्यासाठी परस्परांच्या सहकार्याने सभासदाच्या नेतृत्वाने तयार झालेला गट अशीही बचत गटाची संकल्पाना आहे. 

गावपातळीवर समविचारांचे, समवयस्क, सेवाभावीवृत्तीचे सुमारे 15-20 व्यक्ती समान ध्येयाने प्रेरीत होऊन स्वयंसहाय्यता बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक बचत करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. महिलांची काटकसर वृत्ती, व्यवहारातील पारदर्शकता तसेच संघटन कौशल्यामुळे स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य अधिक प्रमाणात महिला आहेत.

बचत गटामुळे गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महिला सक्षमीकरणात बचतगटाचा मोठा वाटा आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या वाटेवरुन जाण्यास साहाय्य झाले आहे, व त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वाढता सहभाग हे ही बचतगटाचे एक यश आहे. ग्रामसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. गावातील पाणीपुरवठ्यासंबंधी निर्णयही महिला बचतगटाच्या माध्यमातून घेत आहेत. तंटामुक्ती गाव मोहिमेअंतर्गत अनेक गावातून बचतगटांचा सकारात्मक दबाव गट दिसून येत आहे. दारु बंदी, दारुची दुकाने बंद करणे यामध्ये महिला सहभाग अधिक दिसून येत आहे. बचत गटामुळे महिलांमध्ये सहकाराची भावना वाढीस लागली असून काही बचतगट समुपदेशनाचे कार्यही करीत आहेत. जिल्ह्यांतील वस्तूंचे जिजाऊ, सिंधू, सावित्री अशा विशिष्ट नावाने ब्रँडिंग केलं जात आहे. दरवर्षी राज्य आणि केंद्र शासनातर्फे विविध विभागाच्या सरस प्रदर्शनामध्ये वस्तूंची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी सरकारी कार्यालयाच्या आवारातील स्टॉल किंवा स्टेशनरी दुकान बचत गटातील महिला चालवतात. शालेय पोषण आहाराचे काम महिला बचत गटाकडे दिले गेले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळामधील गणवेषांची शिलाई बचतगटामधील महिलांकडून करुन घेतली जात आहे. जेजुरी, अष्टविनायक, पंढरपूर यासारख्या देवस्थानामध्ये पूजासाहित्य आणि प्रसादाच्या विक्रीचे स्टॉल महिला बचतगट चालवतात. रेशन दुकानाचे परवाने देताना महिला बचतगटांना प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. 

महाराष्ट्रात अडीच लाखापेक्षा अधिक बचतगट असून, त्याद्वारे 36 लाख महिला संघटीत झाल्या आहेत. कोकण विभागातील बचतगटांची संख्या अठरा हजार पेक्षा जास्त आहे. कोकण विभागातील बचत गटासाठी आयोजित कोकण सरस प्रदर्शनातून बचतगटातील महिलांना वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ मिळाले आहे. बचतगटातील वस्तूंच्या उत्पादनाला गावापासून मॉलपर्यंत बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 

एकंदरीत बचतगट हे महिलांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय वाढीस साहाय्यकच ठरत आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व एकत्रित होतील तेव्हाच त्या सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरु शकतील खऱ्या अर्थाने त्यांचे सबलीकरण होईल. सामाजिक स्वास्थ्यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी महिलांना या बचतगटाचा अस्त्रासारखा वापर नक्कीच करता येईल.

-शैलजा देशमुख
विभागीय माहिती कार्यालय, कोंकण विभाग, नवी मुंबई

 

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate