कळंब तालुक्यातील वाढोणा हे गाव. ह्या गावात जवळ जवळ ८०% कोलाम लोकांची वस्ती आहे व बाकी प्रधान आदिवासी वस्ती आहे. १९९७ पासून आम्ही स्वयंसाहाय्य गट सुरु केले. आज ७ गट स्थापित झाले आहेत.
गटामध्ये परसबागेची माहिती देण्यात आली होती. ह्या आधी त्या गावात काही महिला पपई, लिंबू, वाल व कोहळे फार कमी प्रमाणात लागवड करीत होत्या. तेथील गावकऱ्यांना जवळच ४ कि.मी. अंतरावर जोडमोंह ह्या ठिकाणी फक्त बाजाराच्या एखादी भाजी त्या आणत असत आणि बाजारहाटास भाडे खर्च करून भाजी आणणे परवडण्यासारखे नसल्यामुळे त्यांना भाज्या वगैरे खाणे दूरच !
वाढोणा ह्या गावात परसबागेकरीता थोडीफार जागा उपलब्ध होती. या गोष्टीची माहिती घेऊन महिला समाजसेविका ह्यांनी परसबाग लावण्याची माहिती दिली.
परसबाग ज्या घरी लावावयाची आहे त्या महिलांना वाफे तयार करावयास सांगितले. कोहळे, वाल, कारली, गवार, भेंडी, वांगी, मिरची, टोमाटो, काकडी, गोडलिंबबियाणे लावले. त्या महिलांनी त्यांच्या परसबागेला बोरीबाभळीचे काटेरी कुंपण केले. व त्या रोपांची निगा चांगल्या प्रकारे ठेवली. बघता बघता, परसबागेतील रोपटी मोठी झाली. पणे, फुले, फळे आली. महिलांना खूप आनंद झाला. भेंडी, गवार, वांगी, टोमाटो, कोहळे, वाल भरभरून आले. भाज्या तोडून महिला स्वयंपाक करू लागल्या. काकड्याही भरपूर निघाल्या व त्या खाण्याचा आनंद मुलांनी अधिक घेतला. आणि विशेष म्हणजे हे सर्व सांडपाण्यावर बरे का!
महिलांची मिटिंग घेण्यात आली, त्यामध्ये परसबागेचे अनुभव सांगावयास सुरुवात केली असता तुंनी सांगितले की, नवीन भाज्या विकायला येतात. तेव्हा ४ रु. ते ५रु. पाव असतात व त्या कधी एवढया महाग भाज्या घेतही नसत. पण आता त्यांच्या परसबागेत जे तयार असेल, ते तोडून भाज्या करतात. त्यामुळे आहारामध्ये देखील बदल होतो. स्वतः व कुटुंबाच्या चांगल्या आरोग्याकरिता लावलेल्या परस बागेतील भाज्या खाण्यास मिळतात व पैशाची देखील बचत होते.
ह्या अनुभवावरुनच दुसऱ्या वर्षी परसबाग तयार करण्याकरिता मिटिंग घेण्यात आली. जास्त महिला परसबाग लावण्यास तयार झाल्या. त्यांना विचारले की, परसबागेत किती भाज्या निघाल्या? खुप भाज्या निघाल्या, असे उत्तर मोठया अभिमानाने देतात. आजही घरात काही स्वयंपाकासाठी नसेल तर घरातील आमचा माणूस म्हणतो, “बघा, परसबागेत लागल्या असतील भाज्या तर तोड व भाजी कर.” असे महिला आनंदाने सांगतात.
अशा प्रकारे महिलांनी परसबागेचे महत्त्व समजून घेतले व ते त्यांना पटले. घरच्या घरीच भाज्या खाण्यास मिळाल्या. भाजी खाण्यास सुरुवात झाली. भाजी विकत आणण्याचे पैसे वाचले व परसबाग त्या दरवर्षी उत्साहाने लावू लागल्या.
लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
स्त्रोत : बोल अनुभवाचे - पुस्तिका
अंतिम सुधारित : 5/21/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा म्ह...
आता तरी बायांनो बोलक्या व्हा !! चार गोष्टींचा विच...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील वळसंग ये...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उर्जा बचत...