অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बचतगट कसा स्थापन कराल?

बचतगट कसा स्थापन कराल?

एखादया नवीन संकल्पनेची सुरुवात करणे अवघड नाही, पण ती कल्पना सतत चालू ठेवणे आणि पूर्ण करणे ही मात्र अवघड गोष्ट आहे. एखादे मूल चालायला शिकताना जसे पडते तसेच एखादी नवीन कल्पना राबवताना होते. मूल चालायला शिकत असते तेव्हा प्रथम बसते, रंगते, मग उभे राहू बघते. कधी कधी धडपडते, खाली पडते, नंतर अडखळत पावले टाकते. पण एकदा ‘चालणे’ शिकल्यावर मात्र पाळायला लागते आणि घरभर धावते. तसेच नवीन कामाच्या बाबतीतही घडते. सर्व प्रगती एका दमात होऊ शकत नाही. ध्येय गाठण्यासाठी धीर धरावा लागतो. वेळ खर्च करावा लागतो. प्रयत्न नेटाने करावे लागतात, तेव्हाच ध्येय साध्य होऊ शकते.

बचतगटाच्या स्थापनेमध्ये गटाचे पैसे गुंतविलेले असतात, गटातील लोकांची धडपड व प्रयत्न यांचाही बराच मोठा वाट असतो म्हणून अगदी सुरुवातीपासून ते कार्य त्या लोकांचेच असणे आवश्यक आहे. आता आपण बचतगटाच्या स्थापनेमध्ये कोणत्या पायऱ्या आवश्यक आहेर, ते बघू या.

१. प्रेरणा

प्रेरणा हीच बचतगटाची गुरुकिल्ली आहे व सुरुवातीला तर तिचे फारच महत्त्व आहे. काही महिला बचतगट स्थापन करण्यास अगदी सहज प्रेरित होतात, कारण त्यांच्या मनात एक अशी आशा दडलेली असते, की ह्या बचतगटाच्या कामामुळे आपणास बाहेरील पैशांची मदत मिळेल.  पण काही महिला मात्र त्यांना खरोखर पैशाची गरज असूनही बचतगटाच्या कामापासून दूरच राहतात. कारण त्यांना वाटते, की बचतगट हे पैसेवाल्यांचे काम आहे, आपले नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत व वेळ आहे त्यांनीच हे करावे. आपण त्या भानगडीत कशाला पडायचे? आपल्यासाठी हे नाही. आपल्याजवळ बचत करायला पैसे आहेत कुठे? त्यामुळे बचतगटात सामिल होण्याची आपली लायकीच नाही असे त्यांना वाटते. काही महिलांना मागच्या वेळी अशाच तऱ्हेच्या भिशी वगैरे गोष्टींचा काही वाईट अनुभव आलेला असतो, त्यामुळे मागील अनुभवाच्या धसक्याने त्या परत यात भाग घ्यायला तयार होत नाहीत.

ह्या सर्व प्रकारच्या महिलांना बचतगट म्हणजे काय, तो कसा स्थापन करावा आणि कशासाठी स्थापन करावा हे स्पष्ट करून सांगणे, ही पहिली पायरी होय. कुठल्याही प्रकारे हा उद्देश सफल करावयाचा असेल तर लोकांचा सहभाग व चर्चा आणि शंका निरसन करणे हे फार गरजेचे आहे.

एखादया चांगल्या तऱ्हेने काम करणाऱ्या बचतगटाचा कार्यकर्ता दुसऱ्या बचतगटाची स्थापना करण्यास लोकांना फार चांगल्या प्रकारे प्रेरित करू शकतो व स्वतःच्या बचतगटाचे उदाहरणही दाखवू शकतो.

२.  गटाची स्थापना

एखादा १० ते २० महिलांचा गट बचतगटाची स्थापना करण्यास तयार झाला, की त्यांची स्वतंत्र सभा घ्यावी. ह्या सभेत बचतगटाची कल्पना, नियम, अटी, कामकाज व्यवस्थितपणे समजावून सांगणे ही दुसरी पायरी होय.

त्यांनी नंतर बचतगटाच्या उद्घाटनाची तारीख ठरवावी. एवढे जरी केले, तरी गटातील सभासदांना खऱ्या अर्थाने कार्यपद्धती व तिचे परिणाम लक्षात येतातच असे नाही. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची गरज असते. पुष्कळ खेडेगावांत असेच घडते, म्हणून पहिले ६ महिने कामाचा अन्य्भाव मिळवण्यासाठी राखून ठेवावे लागतात व बचतगटाचे कार्य करणे शक्य आहे का, ते आजमावून बघावे लागते.

३.    सुरुवातीची सभा

गटाला सर्व नियमांचे आकलन झाल्यावर (प्रकरण ५ पहा) त्यातील लोक बचतगटाच्या स्थापनेस मान्यता देतात. ही तिसरी पायरी होय. या सभेत गटप्रमुखांची निवड होते, तसेच नेहमी महिन्यातील कोणत्या वारी सभा घ्यायची तो वर आणि वेळ ठरवली जाते (परिशिष्ट १ पहा) पहिले श महिने हिशेब सध्या वहीवरच लिहिले जावेत.

४.    तिमाही मूल्यांकन

दर तीन महिन्यांनी कामकाजाचे मुल्यांकन करणे ही एक आवश्यक पायरी आहे. (पहा : बचतीच्या मूल्यमापनाची मार्गदर्शक तत्त्वे – पण २१) सभासदांनी नियमांचे पालन केले नाही, पैसे वेळेवर भरले की नाही हे पाहावे. तसेच सर्व सभासदांना एकत्र गटात काम करणे आवडते की नाही, ते पहावे. सभासदांचे एकमेकांशी जमते की नाही ते पहावे.

५.   बचतगटाची स्थापना

पहिल्या श महिन्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर सभासदांना आपण नियमांचे पालन करू शकतो की नाही, हे कळू शकते. या वेळी जर सभासदांची इच्छा असेल तर बचतगटाची रीतसर पुन्हा स्थापना होऊ शकते.

अ)  जर गट विसर्जित करण्याचा सर्व सभासदांचा विचार असेल तर

  • कर्ज रकमा परत करण्याची तारीख ठरवली जावी.
  • त्या तारखेला सर्व मुद्दल व व्याज सारख्या प्रमाणात सर्व सभासदांना वाटून पहिला गट विसर्जित करावा.

ब) जुन्या गटातील काही सभासदांना नवीन सभासद घेऊन पुन्हा बचतगटाची स्थापना करण्याची इच्छा असेल, तर ते तसे करू शकतात व त्यांचे हिशोब लेजरवर सरळ लिहू शकतात, कारण त्यांनी मागील ६ महिन्यांचा कामाचा अनुभव असतो.

विसर्जित गटातील महिलांना वाटले, की आपली आतापर्यंतची बचत नवीन गटातच गुंतवावी,तर तसे करावे. मात्र त्यामध्ये नवीन सभासद घेतल्यास त्यांच्याकडून पूर्वीच्या सभासदांच्या रकमेएवढी रक्कम घ्यावी.

क)जर महिलांना पुन्हा बचतगट हवा असेल, तर पुन्हा सभा भरवून मन्यता घ्यावी व पूर्वीचे ६ महिन्यांचे सर्व हिशोब लेजरवहीवर उतरून काढावे.तसेच पासबुकात त्यांच्या नोंदी कराव्यात.

६. नियमित सभा

पुढच्या सर्व सभांमध्ये (नमुना परिशिष्ट- २ पहा) नियमांचे पालन करून आर्थिक शिस्त पाळली गेली पाहिजे. अशी आर्थिक देवाणघेवाणीची शिस्त पाळली, तरच बचत गटाचे कार्य सुरळीतपणे चालू शकते. आर्थिक बाबी सोडून इतरही मदतीचे उपक्रम हा बचतगट हाती घेऊ शकतो व अशा उपक्रमांमुळे बचतगटाच्या कामात रस निर्माण होतो. उदा. परसबाग, रोपवाटिका, साक्षरता, आरोग्य-शिक्षण इत्यादी.

७.जास्तीच्या निधीचा वापर

कर्ज पुरवठा होऊन उरलेला पैसा इतर कामांत गुंतवून त्यावर नफा मिळवणे शक्य आहे का, याबद्दल चर्चा करून अशी कामे हाती घेता येतील. जेचा सभासदांना स्वतःच्या कामात रस वाटतो व आत्मविश्वास जाणवतो तेच त्या इतर महिलांना प्रेरणा देऊ शकतात.

८. परस्पर सहकार्य

आपल्या बचत गटाकडे जेव्हा जास्तीचे पैसे शिल्लक राहतील, त्या वेळेस आपल्यासारख्या इतर गटांना तुम्ही कर्ज देऊ शकता.

बचतगटाच्या मूल्यमापनाची मार्गदर्शक तत्त्वे

(ही फक्त मार्गदर्शनासाठी आहेत. प्रत्येक गट स्वतःच्या गरजेनुसार कोणत्या बाबींना अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे ते ठरवू शकतो व स्वतंत्र पद्धतीने स्वतःच्या गटाच्या कामाचे योग्य ते मूल्यमापन करू शकतो.)

मूल्यमापन नियानितपणे करावे. सुरुवातीस तिसऱ्या व सहाव्या महिन्यात आणि नंतर स्वतः आखलेल्या नियमानुसार, मूल्यमापनासाठी खालील मुद्दे महत्त्वपूर्ण आहेत

१)     कामातील शिस्त

सभासदाची नियमित व वेळेवर हजेरी

वेळेवर पैशाचा भरणा

व्याज व कर्ज यांची वेळेवर परतफेड

२)    ज्या कामासाठी कर्ज घेतले गेले, त्याच कामासाठी ते वापरले गेले की नाही हे पाहणे.

३)    हिशोब लिखाण व्यवस्थित आहे की नाही ते पहाणे. सर्वसाधारणपणे सर्व सभासदांना हिशोब वाचता आला पाहिजे आणि समजला पाहिजे.

४)   बचतीशिवाय सभासदांसाठी फायदेशीर असणारी इतर कार्ये, ज्यासाठी ते नियोजन करून एकत्रित काम करू शकतील.

उदा. रोपवाटिका, सुधारीत चूली, परसबाग, साक्षरता इ.

५)   कर्जाचा इतर कारणांसाठी विचार होऊ शकतो का?

(उदा. जीवनमान उंचवण्याकरिता वैयक्तिक उत्पन्नाचे व्यवसाय.)

६)    प्रशिक्षकाचे गटाविषयी मूल्यमापन.

सुरुवातीच्या मिटिंग मध्ये चर्चेचे विषय

या मिटींगमध्ये गावातील जास्तीत जास्त महिला सहभागी व्हाव्यात. त्यांच्यात पुढील मुद्द्यांवर चर्चा व्हावी

  • कुटुंबाला येणाऱ्या सर्वसामान्य अडचणी.
  • पैशाची गरज कशी भागविली जाते?
  • आकस्मिक आर्थिक गरज भागविण्याचे इतर काही उपाय आहेत काय?
  • महिला बचतगट स्थापन करावा काय?
  • या गटामुळे काय काय होऊ शकते?
  • गटाची स्थापना करण्यास विरोध होईल काय?
  • असल्यास तो कसा दूर करता येईल?
  • किती महिलांचा गट असावा त्याची कार्यपद्धती काय असावी?
  • गट केचापासून स्थापन करावा?

पुढील नियमित मिटिंग मधील चर्चेचे विषय

  • बचत जमा करणे.
  • जमा रक्कम व आत्तापर्यंतचा हिशोब तसेच दिलेल्या कर्जाचा उपयोग झाला का? कशासाठी? या संबंधीचे अनुभव
  • या वेळी कोणास पैशाची गरज आहे व किती दयावे.
  • त्या महिन्याच्या हिशोबाची पूर्तता.
  • इतर विषय (आरोग्य, प्रौढशिक्षण, परसबाग, इ.)
  •  

    लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

    स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे  - पुस्तिका

    अंतिम सुधारित : 7/18/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate