অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बचतगटाच्या हिशोब ठेवण्याची पद्धत

बचतगटाच्या हिशोब ठेवण्याची पद्धत

बचतगटाच्या हिशोब ठेवण्याची पद्धत

सभासदांचा पैसा बचतरूपाने गटाकडे एकत्र येतो. कर्ज म्हणून गटाकडून तो परत काही सभासदांकडे जातो. काही पैसा शिल्लक राहतो. जमा – त्यातून खर्च व राहिलेली शिल्लक – किती सोपे आहे हिशोब ठेवणे.

स्वावलंबी बचतगट हा पूर्णपणे विश्वासाच्या, भरवशाच्या पायावर उभा आहे. आणि त्या करिताच तुम्हांला पैसा न् पैशाचा चोख हिशोब ठेवणे जरुरीचे आहे. देवाघरचे- पावसाचे पाणी कसे नितळ अन् स्वच्छ असते तसा तुमचा हिशोब पाहिजे. खूप सोपी रीत आहे. कशी ती पाहू –

तुमच्याजवळ आम्ही छापलेली हिशोबाची वही आहे. (नसल्यास परिशिष्ट – ३ पहा.) त्यामध्ये चार भाग आहेत.

१.      महिन्याचा जमाखर्च

२.    प्रत्येक सभासदाचे खातेपान

३.    महिन्याच्या संक्षिप्त तपशील

४.    बँकेच्या किंवा इतर संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा तपशील.

हे खुलासेवार पाहू –

१.      महिन्याचा जमाखर्च (भाग १)

  • महिना लिहा.
  • डाव्या बाजूला पानावर सभासदांची नावे लिहा.
  • ‘येणे’ (Receivable) मध्ये तीन भाग आहेत.
    • बचत म्हणजे प्रत्येक महिन्याची जी (वर्गणी) बचत रक्कम ठरली असे, ती प्रत्येकाच्या नावासमोर लिहून घ्या.
    • कर्ज कॉलममध्ये त्याला पूर्वी दिलेले कर्ज लिहा.
    • तिसरा कॉलम व्याज – कर्जावरील व्याज जे ठरले असेल ते लिहा. जसे महिन्याला २% . ३% प्रमाणे (बचतीला प्रथमच सुरुवात असेल, तर कर्ज व व्याज काहीच येणार नाही.

    हिशोब ठेवणाऱ्यास सूचना :- तुमच्या बचत गटाची मिटिंग सुरु होण्यापूर्वीच ‘येणे’ चे कॉलम तुम्ही लिहून तयार ठेवा.

    उजव्या बाजूस जमा (Receipt) आहे.

    पहिला कॉलम ‘बचत’ म्हणजे डाव्या बाजूला जी रक्कम लिहिली आहे, ती सभासदाने दिल्यानंतर या कॉलम मध्ये लिहा.

    बचत वेळेवर भरली नसल्यास त्या वरील ‘दंड’ जो ठरला असेल तो दुसऱ्या कॉलममध्ये वसुल करून लिहा.

    त्याचप्रमाणे कर्ज व व्याज काही जमा केले, तर त्याप्रमाणे लिहा.

  • ‘दिलेल्या कर्जाचा’ आपण नंतर विचार करू.
  • आता चालू महिन्याच्या हिशोबाचा सारांश अगदी उजव्या बाजूस लिहू.
  • ‘मागील शिल्लक’ काही असेल तर लिहा.

    त्यानंतर जमा बाजूच्या सर्व रकान्यांची एकूण रक्कम खालच्या

    कॉलम्स मध्ये येईल ती याप्रमाणे लिहा.

    • एकूण बचत जमा
    • दंड
    • कर्ज वसूल
    • कर्जावरील व्याज
    • .  इतर जमा

    या सर्वांची बेरीज ‘एकूण जमा’

    वरील इतर जमा म्हणजे बचत, दंड, कर्जावरील व्याज, याच्या शिवाय जमा होणारी रक्कम, उदा. देणगी, धंद्यातील नफा, बँकेकडून घेतलेले कर्ज, बँकेच्या पुस्तकात जमा झालेले व्याज, इत्यादी

    ^ आता आपल्याकडे पैसे जमा झाले आहेत. गटामध्ये जो निर्णय होईल त्याप्रमाणे सभासदांना कर्ज देणे व ते जमा बाजूला जो कॉलम आहे ‘दिलेले कर्क’ त्यामध्ये दिलेल्या सभासदांसमोर लिहिणे व त्याची जी बेरीज आहे ती नंतर खालील ठिकाणी मांडा

    • दिलेले कर्ज
    • इतर खर्च (झाला असल्यास )
    • ‘दिलेले कर्ज’ व ‘इतर खर्च’ यांची  बेरीज करा व ती वरील एकूण जमामधून वजा करा. राहील ती शिल्लक.

    इतर खर्च म्हणजे, बैठकीचा चहापाण्याचा खर्च, स्टेशनरी खरेदी, इत्यादी.

    टीप – महिन्याचा हिशोब लिहितेवेळी एखादया सभासदाने जर बचत रक्कम भरलेली नसेल तर ती रक्कम सभासदाच्या नावासमोर ‘दिलेले कर्ज’ मध्ये लिहा आणि त्यावर व्याज पण आकारण्यात येईल.

    हा झाला महिन्याचा जमाखर्च.

    २.    सभासदांचे खातेपान (भाग २)

  • प्रत्येक सभासदांच्या नवे एक स्वतंत्र पण उघडा.
  • ‘खाते नाव’ लिहिले आहे त्याचे समोर एकाचा सभासदाचे नाव लिहा. यामध्ये दुसऱ्या कोणाचेही नाव अथवा रक्कम लिहिली जाणार नाही. त्यापुढे खाते क्रमांक लिहा.
    • पहिल्या कॉलममध्ये तारीख लिहा (बैठकीची तारीख).
    • त्यानंतर त्या सभासदाने जमा केलेली बचत रक्कम ‘बचत’ मध्ये लिहा.
    • तिसऱ्या कॉलममध्ये त्यास नवीन कर्ज दिले असल्यास लिहा.
    • पूर्वीच्या कर्जापैकी जी रक्कम बचतगटाकडे जमा केली असेल, ती चौथ्या कॉलममध्ये लिहा.
    • आता ‘मागील एकूण येणे’, अधिक नवीन दिलेले कर्ज, वजा ‘कर्ज जमा’ जे येईल ते ‘एकूण येणे’ मध्ये लिहा.
    • बचतीची रक्कम स्वतंत्र राहू दया. तिचा या कर्जाच्या कोणत्याही कॉलमशी संबंध देऊ नका.
    • या नोंदी सभासदांना समजावून सांगा व त्यांची सही घ्या.

    ३.    महिन्यांचा संक्षिप्त तपशील (भाग ३)

    • हे पण उघडल्यावर प्रथम महिना लिहा.

    त्यानंतर अनुक्रमे ‘कर्जदार सभासदांची नावे’ व नावावर कर्ज’ जे कॉलम्स आहेत. हे लक्षात ठेवा, की हे कॉलम्स आहेत. हे लक्षात ठेवा, की हे कॉलम्स भरताना तुम्ही एक करायचे की सभासदाचे खाते पान उघडायचे व त्यामध्ये ‘एकूण येणे’ जे लिहिले असेल, ते या ठिकाणी लिहायचे. (ज्यांचे नावावर कर्ज येणे आहे, फक्त तीच नावे या ठिकाणी लिहा.)

    सभासदांची नावे व रक्कम लिहून झाल्यानंतर ‘आतापर्यंतचा खर्च’त्या खाली लिहा.

    ‘आत्तापर्यंतचा खर्च’ म्हणजे मागील महिन्यापर्यंत झालेल्या ‘आत्तापर्यंतच्या खर्चात’ या महिन्याचा  ‘इतर खर्च’ मिळवा व लिहा.

    नंतर तुमच्याकडे असलेली शिल्लक लिहा. (हातातील +बँकेतील)

    या सर्वांची बेरीज करा म्हणजे ‘एकूण रक्कम (अ)’ तयार होईल.

    हे सर्व केल्यानंतर तुम्हाला कोणी विचारले, की तुमचा गट सुरु झाल्यापासून किती रुपयांचा व्यवहार केलात तर एका क्षणात तुम्ही सांगू शकाल की इतक्या सभासदांकडून इतके येणे आहे. खर्च आतापर्यंत एवढा झाला आहे व शिल्लक इतकी आहे. बचतगटाचे पूर्ण चित्रच तुम्ही उभे करू शकता.

  • याच पानावर खाली दोन रकाने दिले आहेत त्याचा उद्देश फक्त ताळा करण्याकरिता आहे. आपण या महिन्यात जे लिहिले आहे, ते मागील महिन्याच्या हिशोबाची ताळा करून पाहण्याकरिता आहे. ते बरोबर आले म्हणजे आपण मांडलेला हिशोब शंभर टक्के बरोबर आहे.
    • प्रथम चालू महिन्याची रएकूण ‘बचत जमा’ लिहा.
    • त्याखाली ‘दंड’, ‘कर्जावर व्याज’ व ‘इतर जमा’ लिहून त्यांची ‘एकूण बेरीज (ब)’ करा,
    • मग संक्षिप्त तपशिलाची ‘एकूण रक्कम (अ)’ खालील कॉलम मध्ये लिहा.
    • त्यातून ‘एकूण बेरीज (ब)’ वजा करा.
    • जी रक्कम राहील, ती गेल्या महिन्याच्या ‘एकूण रक्कम (अ)’ शी जुळायला हवी.

    हे खाली दिलेले जडन रकाने आहेत ते फत ताळा करण्याकरिता आहेत. सरावाने ते तुम्हास जमतील फक्त त्यातील एकूण रक्कम व एकूण बेरीज यावर लक्ष ठेवा.

    आम्हास खात्री आहे, की हिशोब तपासनीस-ऑडिटर सुद्धा तुमची चूक काढू शकणार नाही. (मात्र एक काम करा – लिहिण्यापूर्वी कॉलम नीट वाचा, मगच आकडे लिहा. पहिले एक- दोन महिने शिसपेन्सिलने लिहिले तरी चालेल म्हणजे र्ब्र्ने चूक दुरुस्त करता येईल. )

    ४.    बँकेच्या किंवा इतर संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा तपशील (भाग ४)

    बचत केली महिलांनी, रुपया रुपया जमवला, नेऊन घातला बँकेत,

    वापर केला पैशांचा, उभा राहिला जोडधंदा, पैसा हातात राहिला औदा  II

    राष्ट्रीय कृषी  आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) व रिझर्व बँक यांचे परिपत्रकानुसार बँकांना आदेश देण्यात आले आहेत, की स्वयंसेवी संस्था आणि स्वावलंबित अल्पबचत गट (नोंदणी झालेले किंवा न झालेले) यांच्या मार्फत खेडयातील गरीब लोकांना पतपुरवठा उपलब्ध करावा.

    ही पत निर्माण होण्याकरिता गटाने कमीत कमी श महिने आपला कारभार लोकशाही पद्धतीने केलेला असावा. त्यांचे हिशेब व्यवस्थित असावेत.

    त्याचप्रमाणे इतरही काही संस्थांकडून अल्पबचत गटास कर्ज मिळण्याची शक्यता असते. त्याकरिता आपल्या हिशोबाच्या पुस्तकात चौथ्या भागात त्याचा हिशोब ठेवण्याकरिता सोपी पद्धत दिलेली आहे. कसे तर पाहू.---

    • चौथ्या भागामध्ये पण उघडल्यावर ज्या बँकेकडून अथवा संस्थेकडून कर्ज घेतले असेल, ते नाव लिहा. किती रुपये कर्ज घेतले, कोणत्या तारखेस घेतले, व्याजदर व किती मुदतीचे आहे, परतफेडीची एकूण रक्कम आणि परतफेडीची  मासिक हप्ता किती आहे, तो लिहा.
    • त्यानंतर खाली हिशोब लिहिण्याकरता मुख्य तीन कॉलम्स आहेत.
    • परतफेडीची तारीख : ज्या दिवशी कर्जफेडीचा हप्ता भरला असेल ती तारीख लिहा.
    • व्याजासह परतफेड रुपये दुसऱ्या  कॉलम मध्ये लिहा.
    • तिसऱ्या कॉलममध्ये दोन भाग आहेत. पहिला भाग – मुद्दल बाकी/ यात सुरुवातीचे मुद्द्लामधून दर महिन्याची मुद्दल परतफेड वजा करत जा व लिहा. दुसरा भाग – व्याजासह परतफेड. यात व्याजासहित परतफेडीच्या रकमेतून दर महिन्याची एकूण परतफेड वजा करत जा व लिहा व वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च) कर्जफेड किती बाकी आहे, ते बँकेच्या अधिकाऱ्यांना विचारून लिहा.

    मार्च महिन्यामध्ये जी कर्जफेड बाकी असेल, ती रक्कम आपण वर्षअखेर हिशोब करताना विचारात घेऊ. त्याकरिता नवीन पान घेण्याची जरूर नाही. मात्र पहिले कर्ज फिटल्यानंतर नवीन कर्जास नवीन पानावर सुरुवात करावी.

    परिशिष्ट ३, भाग ४ मध्ये, आपण बघू शकाल की महाराष्ट्र बँकेकडून दि. ५-१-९७ रोजी द.सा.द.शे. १०.५% व्याज दराने तीन वर्ष मुदतीसाठी रु. ५०००/- कर्ज घेतले असून तीन वर्ष मुदतीत आपणास रु. ६५७६/- परत करावे लागतील, त्याचा मासिक हप्ता रु. १८३/- आहे. परतफेडी मध्ये मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम असते म्हणजे घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हास फेडावी लागते. त्याचा हिशेब बँकेचे अधिकारी करतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरणे, एवढेच तुमचे काम.

    वर्षाअखेर :

    हिशोब लिहिण्याच्या पद्धती आपण शिकलात. पण हे रहाटगाडगे असेच चालू ठेवायचे का? नाही. वर्षाच्या वर्षाला हिशोब पूर्ण करून बँकेचे किती देणे आहे, गटाला व पर्यायाने सभासदांना किती नफा झाला हे कळावयास पाहिजे व परत नवीन पानावर नव्या वर्षाचा हिशोब लिहिणे चालू केले पाहिजे.

    बँकेचे किंवा इतर संस्थांचे आर्थिक वर्ष मार्च महिन्यात संपते. त्याकरिता आपणही आपल्या बचत गटाचा हिशोब दरवर्षी मार्च महिन्यात पूर्ण करू. तुमचा बचत गट प्रथम कोणत्याही महिन्यात  सुरु केलेला असला, तरी मार्च महिन्यात त्या वर्षाचा हिशोब पूर्ण करा व परत त्याच महिन्यात नवीन पानावर नवीन वर्षाच्या नोंदी घ्या. कसे ते आता आपण पाहू-

    • मार्च महिन्यात शक्यतो सर्व येणे वसूल करा. जर ते शक्य नसले तर त्या करिता ज्यांचेकडे येणे आहे त्या रकमा महिन्याला जमा खर्चामध्ये जमा केलेल्या दाखवा.

    टीप – या रकमा लाल पेनने लिहा म्हणजे आपल्या लक्षात राहील की ही रक्कम प्रत्यक्षात जमा झालेली नाही. नवीन वर्षाचा हिशोब लिहिताना त्यांचे नावांवर ते कर्ज म्हणून दाखवायचे आहे.

    खातेपानावर पण जमा केलेल्या दाखवा. आता महिन्याचा जमाखर्चामध्ये तुमची सर्व रक्कम, काही प्रत्यक्ष व काही कागदोपत्री जमा झाली आहे, म्हणजे शिल्लक (बँकेतील + हातातील) दाखवली गेली आहे.

    • त्या रकमेमधून बँकेच्या / संस्थेच्या कर्जाच्या मुद्दलाची जी परतफेड बाकी आहे ती वजा करावी म्हणजे राहील ती शिल्लक रक्कम गटाची.
    • परिशिष्ट ३, भाग १, मार्च १९९७ वर्षाअखेर पहा, उदाहरणात दाखविल्याप्रमाणे आपले पाच सभासद आहेत, निव्वळ शिल्लक रक्कम रु. १६३८/- भागिले सभासदांची संख्या पाच, बरोबर रु. ३२७.६० म्हणजे वर्षाअखेर बचत गटातील प्रत्येक सभासदाची त्यांचे स्वतःचे नावावर रु. ३२७.६० इतकी बचत झाली.
    • आता मार्चमध्येच महिन्याच्या जमाखर्चाचे (भाग १) नवीन पान घ्या.

    नवीन वर्षाचा हिशोब आपण या पानावर सुरु करू.

    -    महिना लिहा. “मार्च(नवीन वर्ष)”

    -    सर्व सभासदांची नावे लिहून घ्या व त्यांच्या नावापुढे जमा बाजूला (उजवी बाजू) मार्चअखेर त्यांची जी एकूण बचत झाली, ती ‘बचत’ कॉलम मध्ये लिहा.

    -    त्याचप्रमाणे शेवटी जो कॉलम आहे. ‘दिलेले कर्ज’, त्यामध्ये ज्यांचेकडे प्रत्यक्ष कर्ज येणे बाकी आहे, (मार्चचा हिशेब पुर करण्याकरिता कागदोपत्री त्यांचे कर्ज आपण जमा दाखविले होते) व ज्यांना मार्च महिन्यात नवीन कर्ज देऊ, ती रक्कम त्यांचे नावासमोर लिहा. व त्याचप्रमाणे त्यांच्या खात्यावरही लिहा.

    टीप – नवीन वर्षाच्या हिशोबाच्या पानावर उजव्या बाजूस ‘जमा- बचत’ व ‘दिलेले कर्ज’ हे दोनच कॉलम भरले जातील.

    -    आता चालू महीन्याचा सारांश जो उजव्या कोपऱ्यात आहे तो बघू – ‘मागील शिल्लक’ शून्य येणार.

    -    ‘एकूण बचत जमा’ लिहा (उदाहरणात ती रु. १६३८/- आहे.)

    -    कर्ज वसूल- शून्य

    -    व्याज- शून्य

    -    मात्र ‘इतर जमा’ मध्ये मार्च महिन्यात बँकेचे जे देणे राहिले आहे (परत फेड बाकी) ते दाखविले आहे. रु. ४७२२/-

    -    आता बेरीज करून ‘एकूण जमा’ लिहा. रु. ६३६०/-

    -    दिलेले कर्ज – रु. ६०००/-

    -    इतर खर्च – शून्य

    -    एकूण खर्च – रु. ६०००/-

    -    आता एकूण जमामधून एकूण खर्च वजा करा. राहील ती शिल्लक जसे की उदाहरणात रु. ३६०/-

    टीप – वरील नोंदी शिवाय कुठल्याही नोंदी. जशा ‘दंड’, ‘कर्जफेड’, ‘व्याजफेड’, ‘इतर खर्च’ येणार नाही.

    • याचप्रमाणे वर्षाअखेर व नवीनवर्षाच्या नोंदी, भाग-२ ‘सभासदांचे खाते पान’ आणि भाग-३ ‘महिन्याचा संक्षिप्त तपशील’ या मध्ये घेणे. याकरिता दिलेली उदाहरणे काळजीपूर्वक पाहा.

    हे वर लिहिलेले तुम्हाला मनोरंजक वाटणार नाही, कारण ही काही राजाराणीची गोष्ट नाही, यांत आहे आकडेमोड, पण हे निश्चित, की तुम्ही गटाचा हिशोब लिहायला लागलात की या पुस्तिकेप्रमाणे कॉलम भरा.हिशेब पक्का. तुम्ही म्हणाल हे किती सोपे आहे हिशोब ठेवणे.

     

     

    लेखक : वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

    स्त्रोत : थेंबे थेंबे तळे साचे  - पुस्तिका

    अंतिम सुधारित : 8/18/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate