অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अ‍ॅल्फ्रेड लूई क्रोबर

अ‍ॅल्फ्रेड लूई क्रोबर

(११ जून १८७६–५ ऑक्टोबर १९६०). एक प्रसिद्ध अमेरिकन   मानवशास्त्रज्ञ. होबोकिन (न्यू जर्सी) येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. त्याने कोलंबिया विद्यापीठातून एम्‌.ए. (इंग्रजी) ही पदवी घेऊन फ्रँझ बोअॅस ह्या ख्यातनाम मानवशास्त्रज्ञाचे शिष्यत्व पतकरले. १९०१ मध्ये त्याने पीएच्. डी. ही पदवी संपादन केली. पुढे त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठात नव्याने सुरू झालेल्या मानवशास्त्र संशोधन विभागात आदेशक म्हणून नोकरी धरली व त्यानेच तो विभाग पुढे परिपूर्ण केला. तिथेच तो १९४६ पर्यत, म्हणजे निवृत्त होईपर्यत राहिला. दरम्यान तो तेथील मानवशास्त्राच्या वस्तुसंग्रहालयाचा संचालकही होता (१९२५–४६). निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्याने अभ्यास, संशोधन व लेखन ह्यांत व्यतीत केले.

अमेरिकेतील मानवशास्त्र संस्थेच्या संस्थापकांपैकी तो एक असून पुढे १९१७ मध्ये तिचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली. तसेच त्याने अमेरिकेन लोकविद्या संस्थेचे अध्यक्षपद (१९०६) व अमेरिकन भाषाशास्त्र संस्थेचे अध्यक्षपद (१९४०) भूषविले. मानवशास्त्रातील संशोधनपर कार्यासाठी त्यास अनेक पदके आणि सन्माननीय पदव्या बहाल करण्यात आल्या.

त्याच्या संशोधनाचे मूळ क्षेत्र कॅलिफोर्नियातील अमेरिकन इंडियन हे होते, तथापि त्याने झूनींचाही अभ्यास केला. इंडियन लोकांची संस्कृती, त्यांच्या चालीरीती, समाजरचना, भाषा, लोकविद्या, नातेसंबंध, पोटजाती वगैरेंसंबंधी त्याने संशोधन केले. ह्याशिवाय त्याने पुरातत्त्वविद्येचा अभ्यास करून मेक्सिको व पेरू या देशांतील उत्खननांत उपलब्ध झालेल्या अवशेषांचा अभ्यास केला. त्याने विविध विषयांवर लेखन केले. त्याचे मानवशास्त्रावरील बहुतेक ग्रंथ संशोधनात्मक आहेत. त्यांपैकी पीपल्स ऑफ द फिलिपीन्स (१९१७), अंथ्रॉ पॉलॉजी (१९२३), हँडबुक ऑफ द इंडियन्स ऑफ कॅलिफोर्निया (१९२५), कल्चरल अँड नॅचरल एरिआज ऑफ नेटिव्ह अमेरिका (१९३९), स्टिम्युलस डिफ्यूजन (१९४०), कॉन्फिगरेशन्स ऑफ कल्चर ग्रोथ (१९४५), द नेचर ऑफ कल्चर (१९५२), कल्चर : ए क्रिटिकल रिव्ह्यू (सहलेखक क्लाइड क्लकहॉन, १९५२), स्टाइल अँड सिव्हिलायझेशन (१९५७) वगैरे ग्रंथ महत्त्वाचे व अभ्यासपूर्ण आहेत. ह्याशिवाय त्याने विपुल स्फुटलेखन केले. अमेरिकेतील मानवशास्त्राचा एक प्रमुख प्रवक्ता म्हणून त्याची ख्याती आहे. तो पॅरिस येथे मरण पावला.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate