(१७ जानेवारी १८८१−२४ ऑक्टोबर १९५५). आंग्ल सामाजिक मानवशास्त्रज्ञ. त्यांचे मूळ नाव ब्राऊन पण पुढे १९२६ मध्ये त्यांनी आईचे रॅडक्लिफ हे नाव धारण केले. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात बर्मिगहॅम (इंग्लंड) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ट्रॅव्हलर्स स्कूल (मिडलसेक्स) व एडवर्ड हायस्कूल (बर्मिंगहॅम) येथे झाले. विल्यम हॉल्स रिव्हर्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ट्रिनिटी महाविद्यालय (केंब्रिज) येथे अध्ययन करून पदवी मिळविली (१९०५). नंतर तेथेच त्यांची प्रारंभी अधिछात्र म्हणून नियुक्ती झाली. विद्यार्थिदशेत त्यांना ए. सी. हॅडन व सी. एस्. मायर्स यांचे मार्गदर्शन मिळाले. १९०६ ते १९०८ दरम्यान त्यांनी अंदमान बेटावरील आदिवासींची प्रत्यक्ष पाहणी केली आणि नंतर १९१० ते १९१२ दरम्यान त्यांनी पश्चिम ऑस्ट्रेलियातील आदिवासींची पाहणी केली. या पाहणीत त्यांनी आदिवासींची कुटुंब संघटना आणि त्यांचे आप्तसंबंध यांचा अभ्यास केला. त्यांचे बहुतेक सर्व जीवन इंग्लंडबाहेर अध्यापनात गेले. ते सामाजिक मानवशास्त्राचे केपटाउन विद्यापीठ (१९२०−२५), सिडनी विद्यापीठ (१९२५−३१) व शिकागो विद्यापीठ (१९३१−३७) यांत प्राध्यापक होते. त्याकाळच्या नव्या पिढीतील मानवशास्त्रज्ञांच्या विचारांवर त्यांचा प्रभाव पडला. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील सामाजिक मानवशास्त्राचे अध्यासन स्वीकारले (१९३७−४६) आणि निवृत्त झाल्यावरही ऱ्होड्स व फरूख (अलेक्झांड्रिया) विद्यापीठांत ते अध्यापनाचे काम करीत होते. अखेरपर्यंत ते कार्यरत होते. लंडन येथे त्यांचे निधन झाले.
द अंदमान आयर्लंड्स (१९२२), द सोशल ऑर्गनायझेशन ऑफ ऑस्ट्रेलियन ट्राइब्ज (१९३१), आफ्रिकन सिस्टिम्स ऑफ किनशिप अँड मॅरेज (१९५०), स्ट्रक्चर अँड फंक्शन इन प्रिमिटिव्ह सोसायटी (१९५२), मेथड्स इन सोशल अँथ्रपलॉजी (१९५८) इ. त्यांचे प्रमुख व मौलिक ग्रंथ होत. शिकागो येथील व्याख्यानांवर त्यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या टिपणांच्या आधारे आणि त्यांच्या मरणोत्तर शेवटचा ग्रंथ प्रसिद्ध झाला.
द सोशल ऑर्गनायझेशन ऑफ ऑस्ट्रेलियन ट्राइब्ज या ग्रंथात त्यांनी ऑस्ट्रेलियातील त्या वेळच्या बहुतेक आदिवासींचा आढावा घेतला असून त्यांची वर्गवारी व विश्लेषण दिले आहे. आदिवासींतील नाते संबंध, विवाह पद्धती, भाषा, चालीरीती, जमिनीची मालकी, विश्वोत्पत्तिशास्त्राविषयीच्या कल्पना, वैषयिक प्रकार इ. गृहीत तत्वांचे त्यात संकलन केले आहे. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आप्तसंबंधव्यवस्थेचा अभ्यास केला आणि नातेसंबंधाचे यथार्थ आकलन होण्यासाठी त्या समाजात प्रचलित असलेल्या आप्तसंबंध विषयक संज्ञा जाणून घेण्याची आवश्यकता प्रतिपादिली. एवढेच नव्हे तर सलगी संबंधाची सुलभ व्याख्या केली. ते म्हणतात, ‘दोन व्यक्तींमध्ये असा काही संबंध (नाते) असतो की ज्यामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची थट्टामस्करी करण्याची रीतिरिवाजानुसार परवानगी असते, परंतु अशा कृत्याला आक्षेप घेतला जात नाही. असा संबंध म्हणजे सलगी संबंध होय’.
सामाजिक संरचनेतील वैशिष्ट्यांचे कार्यात्मक विश्लेषण आणि स्पष्टीकरण हे रॅडक्लिफ ब्राऊन यांचे सामाजिक मानवशास्त्राला मिळालेले बहुमोल असे योगदान आहे. या अभ्यासाकरिता त्यांनी प्राथमिक अवस्थेतील जमातींना आपले लक्ष्य बनविले. त्यांचे समकालीन मानवशास्त्रज्ञ ब्रॉनिस्लॉव मॅलिनोस्की याने सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे कार्यात्मक विश्लेषण केले, त्याने मानवशास्त्राचा आणि कार्यात्मक विश्लेषणाचा इंग्लंड अमेरिकादी देशांत प्रचार केला. सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासाकरिता दोन भिन्न काळातील समाज चित्रांची तुलना आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या अभ्यासात त्यांनी तुलनात्मक पद्धतीचा अवलंब केला.
त्यांच्या आधी होऊन गेलेले माँतेस्क्यू, काँत आणि द्यूरकेम हे समाजशास्त्रीय विचारवंत त्यांचे स्फूर्तिदाते होते.
संदर्भ : 1. Kuyper, Adam, Anthropology and Anthropologists, Boston, 1983.
2. Kuyper, Adam, Ed. The Social Anthropology of Radcliffe-Brown, London, 1977.
लेखक : मा. गु.कुलकर्णी
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020