मध्य आफ्रिकेतील सूदानी भाषा बोलणाऱ्यांपैकी प्रख्यात निग्रोवंशीय जमात. १९६५ च्या सुमारास सूदान व काँगो (सध्याचे झाईरे) प्रजासत्ताकांमध्ये या जमातीची अंदाजे साडेसात लक्ष वस्ती होती. पूर्वी हे लोक नरभक्षक होते. लोखंड, लाकूड व माती यांची भांडी बनविण्यात हे लोक निष्णात आहेत. अझांडे वांशिक दृष्ट्या मिश्र आहेत. अम्बोमू टोळी व त्यांनी जिंकलेल्या इतर बऱ्याच जमाती यांचे मिश्रण होऊन अझांडे जमात बनलेली आहे. त्यांच्यात बहुभार्याविवाह प्रचलित आहे. वधूमूल्य सर्वसाधारणतः २० भाले आहे; यावरून त्यांच्या लढाऊ वृत्तीची कल्पना येते. मुलींचे विवाह लहान वयात होतात. सर्वसामान्य माणसे आपल्या कुळींत विवाह करीत नाहीत; परंतु सामंत (नोबल्स) आपल्या सावत्र बहिणीशीही विवाह करतात. अझांडेंच्या धर्मात पूर्वजपूजेस महत्त्व आहे. या जमातीतील लोकांचा जादूटोण्यावर फार विश्वास आहे.
लेखिका : दुर्गा भागवत
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020