অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अपातानी

प्रस्तावना

भारतीय आदिवासी जमात. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्‍यात ह्या जमातीचे लोक राहतात. १९६१च्या जनगणनेनुसार अपातानींची सात खेड्यांत २,५२० घरे होती आणि त्यात १०,७४५ लोक राहत होते. वांशिक समानता सोडली, तर भाषा व संस्कृतीच्या बाबतीत ते शेजारच्या डफला व मिरी जमातींहून भिन्न आहेत. अपातानी उत्तरेकडून आले असावेत, असे त्यांच्यातील रूढ दंतकथेवरून वाटते.


स्वरूप

अपातानी अर्थव्यवस्थेत वनगाईसारख्या मिथान या जनावरास महत्त्व आहे. मिथानांचा उपयोग चलन म्हणून करतात. लग्नात वधूमूल्य म्हणून मिथानच देतात. दंडही मिथानच्या रूपातच भरावा लागतो. प्रतिष्ठा टीकविण्यासाठी व वाढविण्यासाठी समारंभात मिथानांचा बळीही दिला जातो. अपातानी तांदुळाची निर्यात करतात व  मिथानांची व डुकरांची आयात करतात. काही वर्षांपूर्वी त्यांचा आसामपेक्षा तिबेटशी जास्त व्यापार असावा. तिबेटी तलवारी, तिबेटीमण्यांच्या माळा, तिबेटी घंटा  अपातानी समाजात आढळतात.

अपातानी समाजात ऐक्य टिकवून धरण्याची विशेष प्रवृत्ती दिसून येते. ‘मोरोम’ व ‘म्लोको’ या दोन महत्त्वपूर्ण उत्सवांच्या वेळी सात खेड्यातील लोक परस्परांशी सहकार्य करतात व आपापसांत समारंभपूर्वक देवघेव करतात. खेड्याचा कारभार अनौपचारिक रीत्या ‘मुरा’ व ‘माइट’ कुळींचे प्रतिनिधी चालवितात. या  पंच-समितीस  ‘बुलियांग’ असे म्हणतात. ह्या समितीचे तीन प्रकार आहेत: (१) अखा बुलियांग—वृद्ध लोक; यांचा सल्ला सर्व महत्त्वाच्या बाबींत घेण्यात येतो. (२) यापा बुलियांग—मध्यवयीन लोक; हे खेड्यातील रोजचा व्यवहार चालवतात, तंटे सोडवतात व अखाबुलियांगशी  सल्लामसलत करतात. (३) अंजाग बुलियांग —तरुण लोक; हे दूताचे काम करतात व यापा बुलियांगला मदत करतात.

समाजातील वर्ग

अपातानी समाजातील कुळींचे ‘माइट’व ‘मुरा’ असे दोन उच्च आणि नीच वर्ग आहेत. काही  खेड्यातील मुरा कुळीच्या लोकांचे उद्योग ठरवून दिलेले आहेत. एका खेड्यात मुरा कुळीच्या काही  स्त्रिया मातीची भांडी तयार करतात, काही लोहाराचा धंदा करतात. गुलाम व त्यांचे  वंशज मुरा कुळीचे सभासद असतात. मुरा कुळीचे लोक कधीही माइट कुळीत सामावून घेता येत नाहीत. मुरा व माइट कुळींचे परस्पर विवाहसंबंध होत नाहीत.

अपातानी समाजात बीज-कुटुंब-पद्धती सर्वमान्य आहे. घरांची बांधणीही अशा कुटुंबास राहण्याजोगीच असते. विवाह झाल्यावर मुले स्वतंत्र घरात राहू लागतात. नवविवाहितांच्या गृहप्रवेशाच्या वेळी जेवण दिले जाते. त्या वेळी डुक्कर किंवा मिथान बळी देण्यात येतो. विवाहसमयी कोठलेही धार्मिक विधी किंवा शकुन- -अपशकुन पाळण्यात येत नाहीत. बहुभार्याविवाह निषिद्ध समजला जात नाही; परंतु असे विवाह फारसे आढळत नाहीत. वधूमूल्य देण्यात येते पण त्याचा आग्रह धरला जात नाही. सख्ख्या आते-मामे भावंडांचे विवाह निषिद्ध समजले जातात. मेहुणी-विवाह व देवर-विवाह या जमातीत मान्य आहेत.

अपातानी कलह टाळण्याकरिता एकमेकांशी ‘डापो’ (तह) करतात. आर्थिक प्रगतीसाठी शांतीची व स्थैर्याची गरज असते, हे अपातानी पूर्णपणे ओळखून आहेत.

धार्मिक


पातानींची आर्थिक व राजकीय संघटना जरी अरुणाचलातील इतर जमातींपेक्षा वेगळी असली, तरीधार्मिक संघटनेबाबत अबोर, मिरी व डफला शेजारच्या जमातींशी त्यांचे साम्य आढळते. ‘किल्लो’ व ‘किरू’ या अपातानींच्या प्रअभावशाली देवता होत. ह्या दोन देवतांचे पतीपत्नीचे नाते असून त्या जमिनीतच राहतात, असा त्यांचा समज आहे. अपातानींच्या सर्वच देवता दंपतिरूपाने असलेल्या दिसतात. ‘चांदुन’ देवाने पृथ्वी उत्पन्न केली व त्याची पत्नी ‘दिदुन’ हिने आकाश निर्माण केले, असा त्यांचा समज आहे. अपातानींच्या मते, पूर्वी केवळ पाणी होते, त्यानंतर खडक व हळूहळू जमीन निर्माण झाली. हे कार्य तीन स्त्री व तीन पुरुष देवतांनी मिळून केले. त्यांनीच सूर्य, चंद्र, तारे, झाडे, पक्षी, प्राणी इ. निर्माण केले व ‘हिलो’ नावाच्या देवाने मानव निर्माण केला, असे ते मानतात. विशेषत: रोग बरे करण्यास ‘हिलो’ देवतेची ते उपासना करतात.या

उत्सव

अपातानींचे मुख्य सार्वजनिक उत्सव ‘मोरोम’ व ‘म्लोको’ हे दोन्ही उत्सव शेती कामे सुरू करतानाच साजरे करतात. मोरोम हा मुख्यत: पेरणीचा उत्सव असतो. म्लोको या उत्सवात बळी देण्याचे विधी वेगवेगळ्या कुळी स्वतंत्रपणे करतात. हा उत्सव बागेत करण्यात येतो व किल्लो व किरू या दैविक दंपतीची उपासना करण्यात येते. या वेळी डुक्कर, कोंबडी व कुत्र्याचा बळी देण्यात येतो. हे उत्सव अद्यापही चालू आहेत.चा

अपातानी शत्रूस मारल्यानंतर त्याचे हात जाळतात व त्याची जीभ आणि डोळे पुरतात. डोळे पुरल्यामुळे मेलेल्या माणसास आपली कत्तल केलेला माणूस दिसत नाही व त्यामुळे त्याला सूड उगवता येत नाही, अशी त्यांची समजूत आहे. या विधीस ‘रोपी’ म्हणतात. अपातानींच्या मते नैसर्गिक कारणामुळे मरण पावलेल्याचा ‘यालो’(आत्मा) ‘नेली’मध्ये (मृत्युलोकात) जातो. नेली पृथ्वीच्या खाली असतो, असा त्यांचा समज आहे. ‘तालीमोको’ (दुसरा मृत्युलोक) आभाळात असतो. ज्या व्यक्ती अनैसर्गिक कारणामुळे मृत्यू पावतात, त्या तालीमोकोत जातात व त्यांच्या आत्म्यांना ‘इगी’ म्हणतात.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर अपातानी सुधारणेची वाटचाल करू लागले. विशेषत: चीनशी भारताचे संबंध बिघडल्यानंतर त्या समाजाचा भारतीय सैन्याशी बराच संबंध आला. त्यामुळे त्यांच्या समाजात बरेच परिवर्तन झालेले दिसून येते. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. गुलामगिरी नष्ट झाली. खेड्यांतून दुकाने व चहा- गृहे उघडली. बऱ्‍याच अपातानींना सरकारी नोकऱ्‍याही मिळाल्या. अपातानींच्या विभागात हवाईतळही बांधला गेला. शिक्षणाची सोय करण्यात आली.

संदर्भ : Furer-Haimendorf, Christoph von, The Aps Tanis and Their Neighbours, London, 1962.

 

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate