अबोध मन म्हणजे व्यक्तीच्या जाणिवेच्या कक्षेबाहेरील मनोव्यापाराचा स्तर. ज्याप्रमाणे तरंगत्या हिमखंडाचा अधिकांश भाग पाण्यात दडलेला असतो, त्याप्रमाणे मानवी मनाचा अधिकांश भाग जाणिवेच्या बाहेर अज्ञात स्वरूपात असतो. काही काही मनोव्यवहार आपणास नकळत चालू असतात, हे सत्य द्रष्ट्या कवींनी आणि गूढवादी विचारवंतांनी प्राचीन काळापासून कथन केलेले आहे. पाश्चात्त्य मानसशास्त्रात मात्र 'अबोध मना' च्या संकल्पनेला उशिरा स्थान मिळाले. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात अपसामान्य मनोव्यापारांची चिकित्सा करताना, तसेच मनोविकृतींवर इलाज करताना, रुग्णांच्या अबोध मनोव्यापारांची दखल घ्यावी लागते, असे फ्रॉइड वगैरे मानसोपचारज्ञांस आढळून आले.
अर्थात अबोध मनाचे गृहीतक मानसशास्त्रीय अंतर्निरीक्षणाने सिद्ध करणे हे दुरापास्तच आहे; कारण अबोध मानसिक प्रक्रिया जाणिवेच्या कक्षेबाहेरच चालत असल्याकारणाने, त्या अंतर्निरीक्षणाने ज्ञात होणेच शक्य नाही. परंतु संमोहनोत्तर सूचनेच्या प्रयोगांद्वारा अबोध मानसाची सत्यता प्रस्थापित झाली आहे. संमोहित अवस्थेतल्या माणसाला पुढे नियोजित वेळी पार पाडण्यासाठी दिलेला आदेश वा सूचना त्याच्याकडून अमलात आणली जाते. मात्र संमोहित अवस्थेत आपणास कोणता आदेश वा सूचना देण्यात आली होती, याची त्या माणसाला संमोहनानंतरच्या अवस्थेत आठवण राहत नाही; याचाच अर्थ असा, की ती सूचना त्या माणसाच्या मनात अबोध स्वरूपात कार्य करते. सारांश, मनाच्या काही प्रक्रिया अबोध पातळीवर घडून येतात, हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मानसशास्त्रज्ञांसदेखील मान्य करावे लागले आहे.
अबोध मनाची फ्रॉइडची कल्पना : सिग्मंड फ्रॉइडच्या (१८५६-१९३९) मते, अबोध मनात प्रामुख्याने निसर्गदत्त व असंस्कृत प्रबळ प्रवृत्ती नांदतात. शिवाय, अनुभवाच्या ओघात, विशेषत: बालपणी, ज्या वासना व स्मृती अप्रशस्त वा लज्जास्पद म्हणून व्यक्तीने दडपून टाकलेल्या असतात, त्यादेखील तेथे धुमसत असतात. या वासनांवर अंकुश ठेवण्याचे कार्य बाह्य परिस्थितीची दखल घेणारा 'अहं' अथवा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा व्यवहारी व जागृत भाग करीत असतो. या समाजोन्मुख अहंचा अबोध मनातल्या सुखलोलुप वासनांशी वारंवार खटका उडतो व त्या वासना दडपून टाकल्या जातात; परंतु त्या नष्ट न होता दबा धरून राहतात व प्रच्छन्नपणे वा प्रकटपणे अभिव्यक्त होऊ पाहतात. त्यातूनच कधी कधी माणसाच्या मनोविकृती उद्भवतात.
मानवी मनाची जटील रचना प्रत्ययास आल्यानंतर फ्रॉइडने मनाचे 'इदं', 'अहं' आणि 'परांह' असे तीन विभाग कल्पिले; तद्वतच जाणिवेची, जाणीवपूर्व आणि जाणिवेपलीकडची अशा मनाच्या तीन वेगवेगळ्या पातळ्या मानल्या. त्याच्या मते, अहं आणि पराहं हे मनाच्या तिन्ही पातळ्यांवर कार्य करीत असतात. परंतु इदं मात्र नेहमी नेणिवेत अथवा अबोध पातळीवर असते. इदंमधल्या काम व अन्य अप्रशस्त प्रेरणा आणि पराहंची उच्च मूल्ये व आदर्श यांचा परिस्थितीशी व्यवहारदृष्ट्या मेळ घालण्याचे अत्यंत अवघड कार्य अहंला पार पाडावे लागते. या कामी अहंची शक्ती अपुरी पडली, की माणसाच्या वर्तनात विकृती येते.
पुढेपुढे फ्रॉइडने माणसाच्या अबोध मनात चाललेल्या एका वेगळ्याच अंतर्व्देद्वाचे चित्र रेखाटले. जीवनाच्या प्रेरणा (लाइफ इन्स्टिंक्ट्स) आणि विध्वंस अथवा मरणप्रेरणा (थॅनॅटॉस) या दोहोंचा अखंड संघर्ष अबोध मनात चालत असतो, असा सिद्धांत त्याने प्रतिपादन केला.
अॅड्लर, युंग आदींच्या कल्पना : अबोध मनाचे वर्णन करताना फ्रॉइडने आरंभी आरंभी कामवासनेला अतिरिक्त प्राधान्य दिले, ते त्याच्या काही अनुयायांना पटले नाही. त्यांनी अबोध मनाच्या स्वरूपाविषयी नव्या उपपत्ती प्रतिपादन केल्या. अॅल्फ्रेड अॅड़लर (१८७०-१९३७) याच्या मते, अबोध मनात मुख्यत: व्यक्तीची सत्ताकांक्षा आणि वैयक्तिक न्यूनतेची जाणीव नांदत असते. त्यांतूनच, सामाजिक परिस्थितीच्या प्रभावानुसार, व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व व तिची जीवनशैली आकारित होत असते. कारेन होर्नी आणि एरिक फ्रॉम या नवफ्रॉइडियन मनोविश्लेषणवाद्यांनीही सामाजिक दृष्टीकोन स्वीकारला. त्यांच्या मते, अबोध मनात जो प्रेरणांचा संघर्ष चालतो, त्यास प्रामुख्याने सामाजिक परिस्थितीच कारणीभूत असते. ðकार्ल युंग (१८७५-१९६१) याच्या मते, अबोध मनात कामवासना नव्हे, तर मूळ जीवनदायी प्राणशक्ती उसळत असते. शिवाय, अबोध मनात केवळ व्यक्तिगत प्रेरणा व दडपून टाकलेल्या वासना असतात, असे नसून मनुष्यजातीच्या इतिहासाचे संस्कार असतात. हे वांशिक अथवा सामूहिक अबोध मन होय. या सामूहिक अबोध मनात मानवजातीचे वैचारिक मूलबंध (आर्किटाइप्स) व मानववंशपरंपरागत वर्तनप्रेरणा असतात. त्यांतूनच सामान्यजनांची काही काही स्वप्ने, बालकांची कल्पनाचित्रे, मनोविकृतांचे भ्रम तसेच मानवजातीच्या रूपककथा, परीकथा आणि आर्ष उदात्त कल्पना यांचा उदय होत असतो.
संदर्भ : 1. Adler, A. Problems of Neurosis, New York, 1930.
2. Freud, S. New Introductory Lecturers on Psychoanalysis, New York, 1933.
3. Jung, C. G. Collected Papers on Analytical Psychology, London, 1920.
लेखक : शं. हि.केळशीकर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/20/2020