অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अशांटी

अशांटी

एक जमात. पश्चिम आफ्रिकेतील मध्य घाना (गोल्ड कोस्ट) मधील २४,३७९ चौ.किमी. क्षेत्रफळ असलेले या जमातीचे एक प्राचीन राज्य. पश्चिमेकडून आलेल्या या जमातीच्या लोकांनी १७ व्या शतकात सुसज्ज युद्धसंघटना करून कुमासी येथे आपल्या साम्राज्याची राजधानी स्थापन केली. १९०२ मध्ये ब्रिटिशांनी ताबा घेईपर्यंत ह्यांचे साम्राज्य सुरक्षित होते.

१९६० साली अशांटीची लोकसंख्या ११,०८,५४८ होती. ते सूदानी भाषासमूहातील त्सी (त्वी) भाषा बोलतात. हे लोक जंगलात राहतात व स्थलांतरित शेती करतात. शेळ्या व कोंबड्या पाळतात. रबर, सोने व कोकोची निर्यात करतात. अशांटी कलाकुसरीच्या कामात, विशेषतः सुवर्णकलेत, निपुण आहेत.

अशांटीची समाजसंघटना मातृप्रधान आहे. धार्मिक कार्यात पुरुषांना प्राधान्य असते. अशांटी समाजात पूर्वजपूजेला महत्त्व आहे. धर्मसमारंभात पूर्वी मानवाचा बळी देत असत. अशांटीचा मुखिया आपल्या जमातीचा पालक व पूर्वजांचा प्रतिनिधी असतो. अशांटी जमातीतील सर्वांत महत्त्वाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सुवर्णासन. या सुवर्णासनात अशांटी लोकांचा आत्मा वसतो, अशी त्यांची समजूत आहे. एरव्ही मुखिया साध्या स्टुलावर बसून सुवर्णासनावर हात टेकवीत असे; संकटकाळी मात्र अशांटींची शक्ती एकवटण्यासाठी तो या सुवर्णासनावर तीन वेळा बसत असे.

अशांटी राज्याच्या दक्षिणेकडील प्रदेशात ब्रिटिशांचे साम्राज्य असल्यामुळे अशांटी व ब्रिटिश सैन्य यांत अधूनमधून खटके उडत. १८७४ साली ब्रिटिशांनी अशांटींची राजधानी कुमासी उद्ध्वस्त केली व मुखियास राजधानीतून हाकलून दिले. या काळात ब्रिटिशांनी अशांटींचे सुवर्णासन लपवून ठेवले. सुवर्णासन ताब्यात घेतल्यास अशांटी नमतील अशी त्यांची कल्पना होती, पण यातूनच युद्धे भडकली. १९०२ साली अशांटी ब्रिटिशांची वसाहत झाली. १९२१ च्या सुमारास काही अशांटी लोकांस लपविलेले सुवर्णासन सापडले. त्याचे सोने काढून ते विकले गेले. यावरून अशांटी जमातीत परत एकजूट होऊन, चोरट्यांचा तपास लावून त्यांना देहान्ताची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. त्याच वेळी नेमलेल्या कॅप्टन रेट्रे या सरकारी मानवशास्त्र- ज्ञाने सुवर्णासन अशांटींच्या स्वाधीन करून चोरट्यांना हद्दपार केले. अशा रीतीने ब्रिटिशांबरोबर होणारा संघर्ष टळला. लोकांच्या चालीरीती समजून धोरण आखले म्हणजे संघर्ष टळतो व लोकांना ते धोरण मान्य होते हे मानवशास्त्राचे उपयुक्त तत्त्व कॅप्टन रेट्रेने अंमलात आणून सिद्ध केले. म्हणूनच १९२१ हे साल अनुप्रयुक्त मानवशास्त्राचे प्रारंभवर्ष मानण्यात येऊ लागले.

१९५७ सालापासून अशांटी घानाचा एक अविभाज्य घटक झाला.

संदर्भ :   1. Lystad, R. A. The Ashanti, New Brunswick, 1958.

2. Rattray, R.S. Ashanti, London, 1928.

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate