অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इरावती दिनकर कर्वे

इरावती दिनकर कर्वे

(१५ डिसेंबर १९०५ — ११ ऑगस्ट १९७०). एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा व लेखिका. महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते. इरावतीबाईंचे बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुण्यास झाले. त्यावेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ ह्या विषयावर प्रबंध लिहून एम्‌. ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या. ‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ ह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पीएच्‌.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले. १९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या.

इरावतीबाईंनी मानवशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र ह्या विषयांत विपुल संशोधन केले. त्यांचे सु. ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांपैकी हिंदू सोसायटी – अॅन इंटरप्रिटेशन (१९६१), किन्‌शिप ऑर्गनायझेशन इन इंडिया (१९५३), महाराष्ट्र लँड अँड पीपल (१९६८) हे इंग्रजी व परिपूर्ती (१९४९), भोवरा, मराठी लोकांची संस्कृति (१९५१), युगान्त (१९६७) हे मराठी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. ह्यांतील बहुतेक इंग्रजी ग्रंथांस आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून युगान्त ह्या महाभारतावरील चिकित्सक ग्रंथास साहित्य अकादेमी व महाराष्ट्र शासन यांचा पुरस्कार लाभला. ह्यांशिवाय त्यांनी इंग्रजी व मराठी नियतकालिकांतून स्फुट लेखनही केले. युगान्तप्रमाणे रामायणावर असेच एखादे चिकित्सक पुस्तक लिहावे, असा त्यांचा विचार होता. त्या १९४७ मध्ये दिल्लीच्या सायन्स काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या मानवशास्त्रातील संशोधनामुळे त्यांची १९५५ मध्ये लंडन विद्यापीठांत व्याख्यात्या म्हणून एक वर्षाकरिता नियुक्ती झाली. त्याच साली प्रागितिहासाच्या सकल आफ्रिकी काँग्रेसमध्ये त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले.

त्यांची राहणी अत्यंत साधी व वृत्ती पुरोगामी होती. वयाच्या पासष्टाव्या वर्षी हृदयविकाराच्या आघाताने त्यांचे पुण्यात निधन झाले.

लेखक / लेखिका : रामचंद्र  मुटाटकर, इरावती कर्वे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 3/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate