অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एस्किमो

एस्किमो

उत्तर अमेरिकेच्या आर्क्टिक भागात व आशियाच्या ईशान्येस एस्किमो जमातीचे लोक राहतात. सायबीरियापासून अलास्का, कॅनडा व ग्रीनलंडपर्यत त्यांचा प्रदेश पसरलेला आहे. अमेरिकन इंडियन भाषेत एस्किमो म्हणजे कच्चे मांस खाणारे. उत्तर अमेरिकन एस्किमो स्वत:स ‘इनइत’ व सायबीरियातील एस्किमो आपणास ‘यूइत’ म्हणवितात. दोन्ही शब्दांचा अर्थ ‘खरे मानव’ असा आहे. सु. ५०,००० एस्किमो (१९६०) चार समूहांत विभागलेले आहेत : (१) अलास्काचा किनारा व शेजारच्या बेटांवर राहणाऱ्या १५,८०० एस्किमोंचा पश्चिम समूह. येथे प्राणिज अन्नाचा भरपूर साठा आहे. या भागात एस्किमो पक्क्या वसाहती करून राहतात. (२) कॅनडातील मध्य भागात १०,००० एस्किमो राहतात. या भागात शिकार कमी असल्यामुळे अन्न मिळविण्यासाठी जास्त प्रयत्‍न करावे लागतात. (३) पूर्वेकडे ग्रीनलंडमध्ये २२,६०० एस्किमो व लॅब्रॅडॉरमध्ये ८०० एस्किमो राहतात. हे भटके आहेत. (४) ईशान्य सायबीरियातील १,२०० एस्किमो रेनडियरांचे कळप पाळतात.

एस्किमो अमेरिकन इंडियनांप्रमाणेच मंगोलवंशीय आहेत, परंतु ते इंडियन नाहीत. सरळ काळे केस, पिंगट डोळे, नजरेत भरण्यासारखी गालाची हाडे, रुंद चेहरा, लहान हात व पाय, बुटकी शरीरयष्टी ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये आहेत.

एस्किमो प्रदेशात झाडांचा अभाव जाणवतो. तपमान –६० से. पर्यंत खाली जाते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश दीर्घकाल मिळतो, तर हिवाळ्यात कित्येक आठवडे सूर्याचे दर्शन होत नाही.

एस्किमो जमातीत कुटुंब हा सर्वात महत्त्वाचा गट आहे. पुरुष, आपली बायको किंवा मुले यांच्या मदतीने सर्व कामे करतो. त्यांना मुलींपेक्षा मुलगे अधिक प्रिय असतात; कारण ते शिकार करू शकतात. दहा-वीस कुटुंबे एका ठिकाणी राहतात. परंतु तीसुद्धा शिकारीनिमित्त दुरावली जातात. यांच्यात कायमचा असा पुढारी नसतो. यशस्वी शिकारी त्यांचे पुढारीपण करतो. हिवाळ्यासाठी बर्फाचे घर (इग्‍लू) व उन्हाळ्यासाठी तंबू अशी त्यांची राहण्याची व्यवस्था असते.

एस्किमो समुद्रातील सील, वॉलरस, व्हेल यांचे व समुद्री पक्ष्यांचे मांस भक्षण करतात. जमिनीवरील प्राण्यांत कॅरिबू हा सर्वात महत्त्वाचा प्राणी असतो. इंधनाच्या तुटवड्यामुळे ते कच्चे मांस जास्त प्रमाणात खातात. त्यांचे कपडे फरयुक्त कातड्यांचे असतात. कॅरिबू, सील व वॉलरसच्या कातड्यांचा कपडे व जोडे यांकरिता सर्रास उपयोग केला जातो.

एका विशिष्ट प्रकारच्या भाल्याने शिकार करण्यात येते. अलीकडे बंदुकींचा वापर करावयास ते शिकले आहेत. व्हेल माशाची शिकार बोटीतून करतात, तर सील व वॉलरसची शिकार करण्यासाठी त्यांना कित्येक तास बर्फात वाट पहात पडून रहावे लागते. हिवाळ्यात प्रवास करण्यासाठी किंवा वाहतूक करण्यासाठी कुत्र्यांनी ओढावयाच्या गाड्या असतात. कुत्र्यांच्या पाठीवर सामान बांधूनही ते ने-आण करतात. कायाक नावाची एस्किमो शिकारी बोट प्रसिद्ध आहे. यात एकच शिकारी बसू शकतो. दुसरी बोट (उमिआक) मोठी असते.

एस्किमो धर्माचा अन्न-उत्पादनाशी जवळचा संबंध आहे. त्यांच्या मते माणसास तीन आत्मे असतात. एकास पुनर्जन्म मिळतो; दुसरा जीवाची जपणूक करतो व शरीरास गरम ठेवतो. दुसरा आत्मा मृत्यूनंतर शरीर सोडून जातो, तिसरा मात्र मृत्यूनंतरही शरीरातच राहतो. प्राण्यांनाही आत्मा असतो, असा त्यांचा विश्वास आहे. सेदना ही समुद्र-देवता त्यांना सील, वॉलरस इ. पुरवते, असा त्यांचा समज आहे. उन्हाळा संपल्यावर सेदना देवतेस मेजवानी देण्यात येते. समुद्रातील प्राणी व जमिनीवरचे प्राणी एस्किमो वेगवेगळे ठेवतात व त्यांना एकत्र खात नाहीत.

मृत एस्किमोचे शरीर कॅरिबूच्या कातडीत शिवून दगडाखाली ठेवण्यात येते. त्याशेजारी अन्न व शस्त्रेही ठेवण्यात येतात. अलीकडे बरेच एस्किमो ख्रिस्ती झाले आहेत. एस्किमो शामनास किंवा देवऋषीस ‘अंगाकोक’ म्हणतात. शामन औषध देतो, तसेच हवामानाचे अंदाज वर्तवितो.

एस्किमो लोक कलाकुसरीकरिता ख्यातनाम आहेत. रोजच्या वापरातील अल्पशा वस्तूंतही त्यांची कलात्मक दृष्टी दिसून येते. कलाकुसरीसाठी ते वॉलरस माशाची व इतर प्राण्यांची हाडे, सांबरांची शिंगे, निरनिराळी कातडी, नदीच्या प्रवाहातून वाहत आलेले ओंडके इ. साहित्य वापरतात. ह्यांतील हाडांवर व लाकडांवर ते नक्षीकाम करतात, तसेच वरील वस्तूंपासून सुबक सुरेख आकृत्या बनवितात. कातड्यांवर ते निरनिराळ्या आकृत्या काढतात. त्यांत काही सांकेतिक असतात, तर काहींमध्ये एस्किमोंच्या जीवनातील वास्तव घटनांचे चित्रण केलेले दिसते. ह्याबाबतीत पूर्व सायबीरियातील एस्किमो प्रसिद्ध आहेत. अलास्का येथील एस्किमोंची कला सांकेतिक चिन्हांची आहे. उदा., ढोलांच्या चित्रांतून ते महत्त्वाच्या घटना व गोष्टी सुचवितात. त्यांनी केलेल्या लाकडी पशुपक्ष्यांच्या मूर्ती किंवा कातड्याचे वा लाकडाचे मुखवटे आकर्षक व बोलके वाटतात. बाहुल्यांसारख्या खेळण्याविषयी एस्किमोंची विशेष प्रसिद्धी आहे.

त्यांचे जीवनमान सुधारण्याचे व त्यांना शिक्षण देण्याचे प्रयत्‍न नेटाने चालू आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अलास्का व उत्तर कॅनडातील गोऱ्यांच्या वसाहतींत बऱ्याच एस्किमोंना काम देण्यात आले.

संदर्भ : 1. Birket - Smith, Kaj, The Eskimos, New York, 1959.

2. Mead, Margaret, People and Places, Glasgow, 1964.

लेखक : रामचद्रं मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate