অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कट्‌टुनायकन

कट्‌टुनायकन

केरळ व तामिळनाडू राज्यांतील एक जमात. केरळमध्ये मुख्यत: कोझिकोडे व कननोर जिल्ह्यांत त्यांची वस्ती जास्त आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार दोन्ही राज्यांत आणि कर्नाटकात मिळून त्यांची लोकसंख्या ४,३८७ होती. कट्टुनायकन म्हणजेच जंगलचे नाईक. दणकट आणि उंच शरीरयष्टी,लांब हात, काळा रंग व कुरळे केस ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये होत. त्यांची बोली द्राविड भाषांच्या मिश्रणातून निर्माण झालेली आहे. केरळमधील कट्‌टुनायकनांच्या भाषेत मलयाळम शब्द अधिक आढळतात. ते स्वत:स पश्चिम घाटातील मूळ रहिवासी समजतात. आपला संबंध ते हिडिंबा राक्षसीशी व पल्लव राजवंशाशी लावतात.

कंदमुळे गोळा करून ते आपली उपजीविका करतात. जंगलखात्यात माहुत किंवा पहारेकऱ्याचे काम किंवा मळ्यात मजुरीही ते करतात. कुत्रे, जाळी, सांपळे इत्यादींच्या साहाय्याने डुकरांची व हरिणांची ते शिकार करतात. मध व मेण गोळा करण्यात ते निष्णात आहेत. कट्टुनायकनांच्या झोपड्या लांबट व ठेंगण्या असून भिंती बांबूच्या व छत गवताचे असते. कधीकधी ते बुंध्याच्या खोलगट भागात आडोसा करूनही राहतात.

यांपैकी हिंदूंशी जवळचा संबंध आलेले कट्टुनायकन स्वत:स हिंदू म्हणवितात. ते सूर्य, चंद्र व भैरव यांची पूजा करतात. तसेच ओणम् सण साजरा करतात. एरवी ते जडप्राणवादी आहेत. झाडे, सर्प, डोंगर व काही प्राण्यांची ते पूजा करतात; त्यांपासून ते आपली उत्पत्तीही सांगतात.

जमातीच्या प्रमुखास ‘मुट्टम’ म्हणतात. तो जमातीचा पुरोहितही असतो व देव अंगात आल्यास भविष्य वर्तवितो. मास्ती व माला दैवम ही केरळमधील कट्टुनायकनांची प्रमुख दैवते होत. याशिवाय त्यांमध्ये पूर्वजपूजाही रूढ आहे.

विवाह वधूमूल्य देऊन किंवा त्याऐवजी सेवा करणे या अटीवर होतात. पूर्वी त्यांच्यात अपहरणविवाह अस्तित्वात होता. लग्‍नात ताली बांधणे यास विशेष महत्त्व दिले जाते. जमातीची लोकसंख्या वाढावी, म्हणून बहुपत्‍नीविवाहास मान्यता दिली जाते. प्रत्येक पत्‍नीस स्वतंत्र झोपडी असते. घटस्फोट व पुनर्विवाहाची चाल रूढ आहे. ऋतुप्राप्ती, मासिक पाळी व बाळंतपण यावेळी विटाळ मानण्यात येतो.

यांच्यात मृतांना पुरतात. वन्य कट्टुनायकन प्रेत चटईत अगर पानांत गुंडाळून झाडाच्या बुंध्याला अगर खडकाला टेकून ठेवून निघून जातात. आत्म्याबद्दल त्यांच्या फार पुसट कल्पना आहेत. विवाहापूर्वी प्रौढ पुरुष मेल्यास त्याचे भूत (विरिका) होते व ते फार त्रासदायक असते, असा त्यांचा समज आहे.

संदर्भ : Luiz, A. A. D. Tribes of Kerala, New Delhi, 1962

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate