অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोलाम

कोलाम

ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून तिची वस्ती विदर्भात मुख्यत: यवतमाळ जिल्ह्यात आढळते. त्याच्या खालोखाल चंद्रपूर, नांदेड आणि वर्धा या जिल्ह्यांतही हे लोक आढळतात. आंध्र प्रदेश राज्यामधील आदिलाबाद जिल्ह्यातही ह्यांची वस्ती आहे. वर्धा जिल्हा सोडता १९६१ च्या शिरगणतीत महाराष्ट्र राज्यातील कोलामांची संख्या ६०,५१९ होती.

कोलामांना कोलावार व नाईक असेही संबोधितात. त्यांना गोंड लोक भूमक अगर पुजारी म्हणतात. आदिलाबादेतील तेलुगू लोक त्यांना मन्योड म्हणतात. मन्ने पोड लोकांप्रमाणेच ते शेती करतात, म्हणून त्यांना मन्योड हे नाव पडले असावे. डोंगरावरील कोलामांना गुत्ता मन्योड असे चिन्नूर व सिरपूर भागात म्हणतात. आदिलाबाद व नांदेड या जिल्ह्यांत मन्नेवारलू या नावाने ओळखले जाणारे लोक कोलामच होत.

कोलामांची स्वतंत्र बोलभाषा असून या भाषेला कोलामी म्हणतात. कोलामी द्राविडी भाषासमूहातील भाषा आहे. गोंडांची नायकी भाषा व कोलामी भाषा ह्यांत फार साम्य आहे.

परधानांप्रमाणे दरिद्री असलेली कोलाम ही जमात आहे. ते गोंडांना जंगली वस्तू विकतात. ते शेती, मोलमजुरी व शिकार हेही उद्योग करतात. त्यांच्यात रानडुकराची शिकार फार महत्त्वाची समजली जाते. नायकी भाषा बोलणारे नाईक गोंड मूळचे कोलामच आहेत. गोंड, नाईक व कोलाम हे देवीचे उपासक असून माहूरची देवी हे त्यांचे पूज्य दैवत आहे. गोंड लोक वन्य असूनही यवतमाळ जिल्ह्यातील इतर आदिवासींच्या मानाने पुढे गेले आहेत आणि मराठी लोकांत ते मिसळले आहेत. या दृष्टीने कोलाम मागासलेलेच आहेत. शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेली ही जमात आहे. आता कुठे त्यांची काही मुले प्राथमिक शाळेत जाऊ लागली आहेत.

कोलामांच्या वस्तीला पोड म्हणतात. पोडू या डोंगरी उतरणीवर झाडे कापून ती जाळून त्या ठिकाणी नांगरटीशिवाय शेती– हंगामी शेती– करण्याची किंवा फिरत्या शेतीची जी पद्धत आहे, त्या पोडू पद्धतीवरूनच त्यांच्या वस्तीला पोड हे नाव पडले असावे. कोलामांची वस्ती अत्यंत नीटनेटकी आणि स्वच्छ असते. वस्तीच्या मध्यभागी चावडी असते. ही चावडी म्हणजे लांबट-चौकोनी आकाराची झोपडी असून तिच्यापुढे एक लांबट जागा असते. ती शेकोटीसाठी असून तिच्यासमोर माहूरच्या देवीचे देवठाण असते. ही चावडी म्हणजेच कोलाम पोड्यातले सार्वजनिक सभागृह. वस्तीतला प्रत्येक रस्ता चावडीला येऊन मिळतो. कोलामांची घरे एकमेकांना लागून एका रांगेत असतात व ती सारख्याच आकाराची असतात. घरांची तोंडे पश्चिमेव्यतिरिक्त इतर दिशेला असतात. एका रांगेतल्या घरांची तोंडे एकाच बाजूला असतात. त्यांच्या घराला पुढचे आवार नसते. मागच्या अंगणात भाज्या वगैरे लावतात. झोपडीच्या भिंती कुडाच्या असतात आणि झोपडीला लागूनच उघडी न्हाणी असते.

कोलाम वर्णाने काळा असून बांधेसूद व बळकट असतो. बहुतेक कोलाम पुरुष मिशा ठेवतात. डोक्याला ते फेट्यासारखे फडके गुंडाळतात. जाडेभरडे व आखूड असे धोतर दोन्ही काचे मारून पंचापद्धतीने नेसतात. अंगात कुडते किंवा बंडी घालतात. बरेचसे उघडेच असतात. स्त्रिया गुडघ्यापर्यंत पोहोचणारे नऊवारी लुगडे नेसतात. मध्यंतरी काही काळ त्या चोळ्या घालीत नसत. त्या केस विंचरून, भांग पाडून नेटकेपणे बुचडा घालतात. चांदीचे मंगळसूत्र, सरी, पाटल्या, कोपरकड्या वगैरे दागिने त्या घालतात.

कोलामांच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे लग्न झाले की मुलगा वेगळा राहतो. घरात चार-पाच माणसेच असतात. कधीकधी वृद्ध आई-बाप असतात. नवरा-बायको आणि मुले एवढाच यांचा परिवार असतो.

कोलाम जमात चार कुलगटांत विभागली गेली आहे. हे गट कुळातील देवतांच्या पूजनावरून पडले आहेत. त्यांना गोत्र म्हणता येईल. ते असे : चार देवे, पाच देवे, सहा देवे, सात देवे. प्रत्येक गटात अनेक कुळी असून त्या बहुधा देवक अगर कुलचिन्ह पद्धतीवरून अस्तित्वात आलेल्या असाव्यात. विवाह विषम गोत्रांत होतो; एवढेच नाही, तर काही कुळींचे दुसऱ्या गोत्रातल्या कुळींशीही जमत नाही. अशा न जमणाऱ्या कुळींत विवाह होत नाहीत. पूर्वी कोलमांत मुलगी पळवून तिच्या नातेवाइकांशी लढाई करून लग्न करीत. पुढे ही लढाई केवळ उपचार ठरून आता ही प्रथा बंद पडली. लग्न मामेबहिणीशी होते, आतेबहिणीशी होत नाही. मुलीचेही देज घेत नाहीत. बायको नवऱ्याहून मोठी आहे, अशी अनेक उदाहरणे कोलामांत आढळतात. बालविवाह जवळजवळ नाही. त्यांच्यात बहुपत्नीत्वाची पद्धत आहे. लग्न ठरले की, शालमुंदी व साखरपुडा हे कार्यक्रम जोरदार होतात. लग्न तुळशीच्या लग्नानंतर लागते. पौष महिन्यात लग्न करीत नाहीत. वेताळक हा कोलामांचा इतिहास कथन करणारा असून तो लग्नाचा मुहूर्त सांगतो, आणि उपाध्येपण करतो. लग्नानंतरच्या प्रथम रजोदर्शनानंतर गर्भाधानविधी करतात. त्याला शांतिक म्हणतात. कोलामांत विटाळशी दहा दिवस बाजूला बसते. विटाळशीची झोपडी वेगळी असते. बाळंतपण घरातच होते. सुईणीला माटेरताद किंवा माटेमुरताल म्हणतात. मुलाचे नाव पाचवीला ठेवतात. लहानपणी तिसऱ्या-चौथ्या वर्षी त्याचे आजोबांशी नागपंचमीला गंमतीने लग्न लावतात. नागपंचमीला कारगुल म्हणतात आणि या दिवशीच्या विधीस कासइपा म्हणतात. कोलामांत घरजावई करण्याची पद्धत आहे. पुनर्विवाहाला ते पाट म्हणतात व घटस्फोटाला सोडमोकळीक म्हणतात.

दारिद्र्यामुळे ते उपलब्ध शिकारीवर किंवा ती उपलब्ध न झाल्यास ज्वारीची अंबिल खाऊन राहतात. वाघ, डुक्कर, साप, उंदीर, घोरपड, हरिण, सांबर, गाय, बैल इ. प्राण्यांचे मांस ते खातात. सणावाराला मोहाच्या पानोळ्या खातात. त्यांचे नेहमीचे अन्न म्हणजे भाकरी, वरण व मिरचीचे तिखट हे पदार्थ होत. कोलामांच्या प्रदेशात मोहाचे वैपुल्य असल्यामुळे मोहाची दारू ते पितात. गांजा, भांग, अफू वगैरे व्यसने त्यांच्यात अलीकडे वाढू लागली आहेत. चिलीम मात्र ते ओढतात. कोलाम लोकांना अंगावर गोंदून घेण्याची आवड आहे. पुरुषही गोंदून घेतात.

कोलामांत भगताचे महत्त्व फार आहे. देवठाण्यावर भगत कौल सांगतो, त्या वेळी लोकांची गर्दी होते. तो रोग घालवतो, पीडा घालवतो, ताईत व गंडेदोरे लोकांना मंत्रून देतो. भगताच्या अंगात देव येतो, असा त्यांचा समज आहे. भगत मेला की, त्याचा मुलगा किंवा नातू भगत होतो. भगताला कोलामी भाषेत सुपारी म्हणतात. भगतिणीला सुपारताद म्हणतात. उत्सवात पूजेसाठी एक कोलाम नेमलेला असतो, त्यास देवकरी किंवा पुजारी म्हणतात. कोलामी भाषेत याला दियाला असे नाव आहे. भगतापेक्षा दियालाबद्दल लोकांना अधिक आपुलकी वाटते. भगताला ते भितात. काही वेळा एकच माणूस भगत व दियाला असतो. कोलामांच्या देवता आया, बेक, कारायमेराय, माणूकबाई, लाळाबाई, भुताय, वाघाय, भोवानी व सावारी या आहेत. भीमाय्याक, सानसुर्याक, पारध्याक, बहीस, सकोबा, म्हसोबा, पेट्टा दियाम, साटवन, जयतुर, मोराम, महादेव, मारुती वगैरे देव आहेत. देवीचे तोंड नेहमी दक्षिणेला असते. कोलामांचे प्रमुख सणवार फणमोडी, बायबाकी व नागपंचमी होत. कोलाम जमातीत पंचायतीची प्रथा आहे. नाईक, महाजन, कारभारी आणि घट्या असे पंचायतीचे अधिकारपरत्वे चार घटक असतात.

कोलामांत मृताला पुरतात. प्रेताबरोबर वयस्क स्त्रियाही स्मशानात जातात. प्रेत पुरल्यावर काठ्या, दगड, माती वगैरेंचा जो उंचवटा होतो, त्याला वठ्ठा अगर ओटा म्हणतात. मृत्यू घडला असेल, त्या दिवशी घरी परतल्यावर देव करून चार-पाच माणसांना जेवायला घालतात त्या वेळी भगत येतो व कोणत्या कारणाने मृत्यू घडला ते सांगतो. श्राद्ध फक्त पौष महिन्यात करतात. पेट्टा दियाम या देवतेची पूजा या महिन्यातच होते. शुभ कार्यासाठी जो वार वर्ज्य मानतात, त्याला वर्जिकवार म्हणतात. हा वर्जिकवार सोमवार असतो. त्या दिवशी श्राद्ध करतात. श्राद्ध गावापासून दूर रानात असते. श्राद्धाचा स्वयंपाक स्त्रिया करतात. श्राद्धाच्या जागेवर एका झाडाखाली जगरे म्हणजे गोवऱ्यांचा विस्तव पेटवतात. त्या विस्तवावर पळसाच्या पानात लपटलेले पानगे अगर रोडगे भाजतात. त्या रोडग्यांबरोबर कोंबड्याचे मांस व इतर भाज्या शिजवितात. मेलेल्या माणसाची धातूची प्रतिमा करून देव्हाऱ्यात ठेवतात.

कोलामांची कला फारशी प्रसिद्ध नाही. तथापि दंडारी हा नृत्यप्रकार आणि सणावारी त्यांनी उपलब्ध साधनांद्वारे काढलेली सोंगे प्रेक्षणीय व त्या जमातीत लोकप्रिय आहेत.

संदर्भ : मांडवकर, भाऊ, कोलाम, अमरावती, १९६६.

लेखक : पु. र.सिरसाळकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate