অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्लार्क विसलर

क्लार्क विसलर

(१८ सप्टेंबर १८७० – २५ ऑगस्ट १९४७). अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म वेन काऊंटी (इंडियाना)येथे एका डच कुटुंबात झाला. त्याने सुरवातीचे शालेय शिक्षण स्थानिक विद्यालयात घेऊन काही दिवस पब्लिक स्कूलमध्ये अध्यापन केले. पुढे इंडियाना स्टेट यूनिव्हर्सिटीमधून त्यांने ए.बी. (१८९७) व ए .एम्.(१८९९) या उच्च पदव्या संपादन केल्या. त्यांने कोलंबिया विद्यापीठातून मानसशास्त्रात पीएच्.डी. ही पदवी मिळविली(१९०१). नंतर कोलंबिया विद्यापीठात त्यांची १९०३ मध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या सुमारास त्याचा  फ्रेंटस बोअ‍ॅस (१८५८-१९४२) आणि लिव्हिंग् स्टन फॅरंड (१८६७-१९३९) या तत्कालीन जेष्ठ मानवशास्त्रज्ञांशी परिचय झाला आणि त्यांच्या प्रभावाखाली तो मानवशास्त्राच्या संशोधन - अभ्यासाकडे आकृष्ट झाला. न्यूयार्क येथील ‘अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’ या संग्रहालयात तो अभिरक्षक होता(१९०६-४१). तेथून तो १९४२ मध्ये तो निवृत्त झाला. तसेच १९२४ ते १९४० या दरम्यान त्यांने येल विद्यापीठात ‘इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन रिलेशन्स’ या संस्थेत मानवशास्त्राचा प्राध्यापक म्हणून अध्यापन कार्य केले. निवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य त्याने आदिवासींवरील संशोधन - अभ्यासात व्यतीत केले. वरील दोन्ही जबाबदाऱ्या संभाळून त्याने उत्तर अमेरिकेतील मैदानी प्रदेशात अनेक दौरे काढाले. अमेरिकन इंडियन जमातीत त्याला विशेष रस होता. म्हणून त्याने डोकटा व ब्लॅकफुट या जमातींचा क्षेत्र-अभ्यास केला व त्यावर शास्त्रशुद्ध विवेचन करणारे सु. २०० लेख लिहिले यातून त्यांच्या क्षेत्र अभ्यासाचा प्रमुख स्त्रोत प्रतिबिंबित होतो. याशिवाय त्याने काही पुस्तके लिहिली.

त्यांच्या पुस्तकांपैकी नॉर्थ अमेरिकन इंडियंन्स  ऑफ द फ्लेन्स (१९१२), दक्षिण अमेरिकन इंडियन (१९१७), मॅन अँड क्लचर (१९२३), द रिलेशन ऑफ नेचर टू मॅन इन अँबोरिजिनल  अमेरिका (१९२६) सोशल अँथोपॉलॉजी (१९२९) इ. प्रसिद्ध आहेत. नॉर्थ अमेरिकन इंडियंन्स ऑफ द प्लेंन्स या पुस्तकात त्याने मैदानी प्रदेशातील आदिवासींची भौतिक संस्कृति,मिथ्यकथा, दंतकथा कलावस्तूंची रचना, सामाजिक संघटना, नीतिमूल्ये, तसेच प्रामुख्याने त्यांच्या धार्मिक विधींमध्ये प्रचलित असलेले सूर्यनृत्य (सन डान्स) यांच्या संदर्भात विवेचन केले आहे. तद्वतच द अमेरिकन इंडियन या ग्रंथात त्याने या जमातीच्या सांस्कृतिक गुणविशेषांचे प्रादेशिक समूह आणि संस्कृती व भौतिकी पर्यावरण यांतील संबध उजेडात आणून संस्कृति - क्षेत्र (क्लचर-एरिया) या संकल्पनेची रूपरेषा मांडली आहे. मानवजातिविज्ञानाच्या पद्धतशीर मांडणीमुळे हा ग्रंथ अभिजात मानला जातो. त्याच्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्याने आणखी दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले, ते असे : इंडियन कॅव्हल्केड ऑर लाईफ मॅन द ओल्ड – टाईम इंडियन रिझर्व्हेशन (१९३८) आणि इंडियन्स ऑफ द युनायटेड स्टेट्स (१९४०).या सर्व लेखनातून संस्कृती – क्षेत्राची संकल्पना त्याने विस्ताराने मांडली आहे. ही संकल्पना त्याचीच देणगी असून ती उत्क्रांत होण्यामागे फ्रँट्स बोअँस व अन्य काही मानवशास्त्रज्ञांचे प्रयत्न कारणीभूत आहेत.

विसलरचे अभ्यासविषय आणि छंद बहुविध होते. त्याने अभिरक्षक हे पद संभाळून शारीरिक मानवशास्त्र, मानवजातिविज्ञान, मानवजातिवर्णन इ. विषयांचा अभ्यास केला, अध्यापनही केले आणि संग्रहालयाची प्रशासनव्यवस्थाही संभाळली. अभिरक्षक या नात्याने त्यांने अमेरिकन इंडियनांच्या कलावस्तू आणि हस्तव्यवसाय यांचा संग्रह केला. त्यांचे प्रदर्शन प्रकारांऐवजी जमातवार आणि प्रदेशानुसार वर्गीकरण करून केले. परिणामी वस्तुसंग्रहालयशास्त्रात  लक्षणीय बदल घडून आले आणि त्याच्या संस्कृति – क्षेत्र या संकल्पनेस चालना मिळाली. विद्यमान परिस्थितीत विसलरने मांडलेले काही सिद्धांत कालबाह्य ठरले असले, तरी त्याने मानवशास्त्राच्या अभ्यासास दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.न्यूयॉर्क येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Dixon, R.B. The Building of Cultures, New York, 1928.

2. Murdock, George P. “Clark Wissler 1870 – 1947” American Anthropologlst, Vol.50, New York1948.

3. Wallis W. D. Cultureand Progress, New york, 1930.

लेखक : सु.र.देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate