অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेनू कुरुबा

जेनू कुरुबा

कर्नाटक राज्यातील एक जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने कर्नाटकातील म्हैसूर, बंगलोर आणि कूर्ग जिल्ह्यांत आढळते. १९६१ च्या जनगणनेनुसार कूर्ग जिल्हा वगळता त्यांची लोकसंख्या ३,६२३ होती.  कर्नाटकातील कुरुबा जमात ही मुख्यतः मेंढपाळ (कन्नड ‘कुरी’ म्हणजे मेंढी) असली, तरी जेनू कुरुबा हे मध गोळा करणारे भटके लोक आहेत. जेनू म्हणजे मध. मध्यम उंची, काळसर पिंगट वर्ण, रुंद वाटोळा चेहरा, थोडेसे बसके नाक, लहान कपाळ आणि कुरळे वा लोकरी केस ही यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून वृत्तीने ते भटके आहेत. स्त्रीपुरुष जवळजवळ अर्धनग्नच असतात. स्त्रिया जेमतेम ऊरुभाग झाकेल असे साडीवजा वस्त्र परिधान करतात. त्यांना दागिन्यांची फारशी हौस नाही, तसेच संगीतही प्रिय नाही. बहुतेक जेन कुरुबा पारध आणि मध गोळा करणे हाच व्यवसाय करतात. थोडे लोक गुरे पाळतात, तर काही पूर्वी कुमरी नावाची शेती करीत असत. शेतास ते थक्कल म्हणत. याशिवाय अलीकडे शहरांच्या जवळपासूनचे जेनू कुरुबा मजुरीही करू लागले आहेत.

रागी हे त्यांचे प्रमुख अन्न असून मध, कंदमुळे, मांस इ. ते खातात. गाय, बैल, वाघ, कोल्हा वगैरे प्राण्यांचे मांस निषिद्ध समजतात. त्यांच्या वस्त्यांना हादी म्हणतात. प्रत्येक वस्तीचा एक नेता असतो. त्याला यजमान म्हणतात. तो सर्व धर्मकृत्ये करतो, त्याचप्रमाणे अविवाहित तरुणतरुणींच्या युवागृहांवर नजर ठेवतो. या युवागृहांभोवती त्यांचे समाजजीवन गुंफलेले असते. पूर्वी बालविवाहाची पद्धती सर्रास रूढ होती; पण अलीकडे वयात आल्यावरच मुलीमुलींची लग्ने होतात. पूर्वी सहपलायन विवाह अधिक प्रचारात होता; पण अलीकडे वडीलधारी माणसे विवाह जमवितात. वधूमूल्य देण्याची प्रथा आहे. त्याला तेर म्हणतात. लग्नात ताली बांधतात आणि मुलीला चांदीच्या बांगड्या (कडग), नथीसारखा एक अंलकार (मूगा बोट्ट) इ. देतात. बहुपत्नीकत्वाची चाल असून लग्नापूर्वी अथवा लग्नानंतरच्या अवैध लैंगिक संबंधाबद्दल यजमान कडक शासन करतो. घटस्फोटास मान्यता आहे.

हे लोक जडप्राणवादी असले. तरी अलीकडे बहुतेक हिंदू धर्माचेच पालन करतात. बेळ्ळी, बेट्टदा, चिक्कम्मा, भैरव, वादेव या स्थानिक देवतांबरोबर चंद्र व सूर्य यांची ते पूजा करतात. देवरू करेयुउदू व उगाडी या सणांव्यतिरिक्त हिंदूंचे दिवाळीसारखे सण ते साजरे करतात. जादूटोणा व भुतेखेते यांवर त्यांचा विश्वास असून अद्यापि एखादा रोग वा आजार झाला असता, ते मांत्रिकाकडे जातात. सोमवारी व शुक्रवारी देवतांना नैवेद्य दाखवितात. पूर्वी मृताचे दफन करीत, आता काहीजण मृताचे दहन करतात. बहुतेक जेनू कुरुबा कन्नड भाषा बोलतात; पण कूर्गमधील जेनू कुरुबा कूर्गी ही बोली अधिक वापरतात.

संदर्भ : Government of India, Ministry of Home Affairs, Census of India, 1961, Vol. I, Part V-B (iv) JenuKuruba and Kadu (Betta) Kuruba, New Delhi, 1972.

 

लेखक : रामचंद्र मुटाटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate