অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नाट

नाट

डोंबाऱ्यांप्रमाणे खेळ करणारी एक भटकी जमात.यांचा संचार मुख्यत्वे महाराष्ट्र व गुजरात या प्रदेशांत असतो.स्थलपरत्वेनाटांना भिन्न नावे प्राप्त झाली आहेत.नाट याचा संस्कृतमध्ये नटनर्तक असा अर्थ असून हा शब्द, भटकणाऱ्या व शारीरिक व्यायामाचे निरनिराळे खेळ दाखविणाऱ्या,विशेषतः दोन खांबांस दोरी बांधून त्यावर करावयाच्या शारीरिक कसरतीचे काम दाखविणाऱ्या व सापास शिकवून खेळ करणाऱ्या निरनिराळ्यामानवी समूहास वापरला जातो.मारवाडातून हे लोक महाराष्ट्रात आले असावेत, असा तज्ञांचा समज आहे.महाराष्ट्र व मध्य प्रदेशात नाट, बादी, डांग-छारा, कर्नाटी, बाझीगर, सपेरा इ. नावांनी ते ओळखले जातात.

महाराष्ट्रातील नाट हिंदू आहेत, तर पंजाबातील बाझीगर ही भटकी जमात आहे.नाटस्त्रियांना,त्यांच्या कबूतरासारख्या गिरेबाज नाचांवरून कबूतरी असेही म्हणतात.

क्रुकने उत्तर भारतातील नाटांच्या दहा शाखा सांगितल्या आहेत:(१) ब्रिजवासी, (२) गुआल, (३) जोगिला, (४) कबूतरी, (५) कलबाझ, (६) कर्नाटी, (७) महावत, (८) मिरदाह, (९) राठोड व (१०) सपेरा.

कंजार अथवा बेरिया स्त्रियांप्रमाणे काही नाट स्त्रिया गोंदण्याचे काम करतात. मध्यप्रदेशातील गोपाळ जातीच्या ज्या स्त्रियाकसरतीचे काम करतात, त्यांनादेखील कबूतरी म्हणतात. नाट ही धंदेवाईक संज्ञा असावी, विशिष्ट जमात नव्हे, असे काहींचे म्हणणे आहे.कर्नाटी हे कर्नाटकातील नाट होत.आपल्या शारीरिक श्रमाने उपजीविका करीत असलेला हा एक व्यावसायिक समूह आहे.

याशिवाय ग्वाल्हेरी नाट ही शाखा अयोध्येत असून तिचे कापुरी,भातू व सरवानीअसे तीन स्वतंत्र भेद आहेत.भातू हे संसी ऊर्फ संसिया या भारतीय जिप्सी जातीची एक शाखा आहे. यांच्या स्त्रिया पोटदुखीच्या वेळी पोटाला डबा लावणे, दात कोरणे व काढणे आणि भविष्य व शकुन सांगणे ही कामे करतात. हे हिंदूअसून मृतांना पुरतात.सानवत म्हणून जे नाट आहेत, ते मुसलमान असून आल्हा वउदालचा पोवाडा गात फिरतात.ब्रिजवासीत पुरुष कुस्त्या खेळतात व स्त्रिया दोरीवरची कसरत व नाच करतात.हे हिंदू असून मृतांना बसविलेल्या स्थितीत पुरतात. महावत मुसलमान असून ते गुरांचा व्यापार करतात. बाझीगर हे जादूचे प्रयोग करतात. मिर्झापूरमध्ये बजनिया, बाध्या, कर्नाटक, काश्मीरी कलबाझ, महावत, आघी व मलार या नाटांच्या शाखा आढळतात. नाटांच्या हिंदू जमाती ३८६ व मुसलमान जमाती २०५ आहेत. हिंदू नाटांच्या उत्तर हिंदुस्थानातल्या देवता हुलकी-माई, विंध्यवासिनी, दुर्गा, काली व परमेश्वर या आहेत.

नाट हा निकृष्टावस्थेत असलेला एक समाज असून बंगालमधील नाट हे मूळचे ब्राह्मणी परंपरेतले कथक होते. मालाकार पुरुष आणि शूद्र स्त्रीपासून झालेली ही संतती आहे असे म्हणतात.परंतु काही नाट भारद्वाजमुनींच्या एका नर्तकीपासून आपली संतती झाली असे सांगतात.उत्तर भारतातले कथक यज्ञोपवीत घालतात व शूद्रांना आशीर्वाद देतात, पण बंगालचे नाट तसे करीत नाहीत; कारण तेथे आल्यापासून नीचवर्णीय स्त्रियांशी लग्‍न केल्यामुळे व संबंध ठेवावे लागल्यामुळे कथकांप्रमाणे त्यांना आपले ब्राह्मण्य कायम ठेवता आले नाही.

संदर्भ : 1. Enthoven, R.E.Tribes and Castes of Bombay, 3 vols., Bombay, 1920-22.

2. Risley, H. Tribes and Castes of Bengal, 2 Vols., Calcutta, 1891-92.

3. Russell, R.V.;Hiralal, Tribes and Castes of Central Provinces of India, 4 Vols., London, 1916.

लेखिका : दुर्गा भागवत

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate