অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

न्यूबा

न्यूबा

सूदानच्या कोर्दोफॅन प्रांतातील न्यूबा टेकड्यांच्या परिसरात राहणारे निग्रॉइड वंशाचे आदिम लोक. त्यांची लोकसंख्या सु. ५,००,००० (१९६०) होती. नाईल खोऱ्यातील सूदानिक व बँटाइड समूहातील निग्रो संस्कृतीची पुष्कळ वैशिष्ट्ये त्यांच्यात आढळतात. ते कणखर व लढवय्या वृत्तीचे असून शरीराने उंचपुरे, रंगाने काळे व कुरळ्या केसांचे आहेत. पुरुष बहुतेक नग्नच असतात व स्त्रिया कमरेभोवती पर्णाच्छादन करतात. यांची घरे स्थानासक्त, गोलाकार व मातीची असतात. दर-न्यूबा असेही नाव त्यांच्या प्रदेशाला आहे. बहुभाषिकत्व हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. सूदानी, बांटू व न्यूबा या तीन समूहांच्या भाषांची अनेक मिश्रणे यांच्यात आढळतात.

न्यूबा हे शेती करणारे लोक आहेत. डोंगराच्या उतारावर ते कुदळी शेती करतात. मका, भूईमूग, घेवडा, कांदा, तीळ, भरडधान्ये, तंबाखू, कापूस इ. पिके ते काढतात. याशिवाय ते पशुपालन, शिकार इ. व्यवसायही करतात. स्त्रिया डुकरे व मेंढ्या यांची काळजी घेतात. त्यांच्यात कुलपद्धती अस्तित्वात नाही; परंतु एकरेखी सहोदर पद्धती आहे. वधूमूल्य म्हणून पशुधन घेतले जाते. सेवाविवाह काही प्रमाणात आढळतो. एकपत्नी कुटुंबपद्धती असून देवरविवाह मान्य आहे. विवाहानंतर स्त्रीचे पहिल्या अपत्य-जन्मापर्यंत निवासस्थान मातृगृही असते व नंतर ते श्वशुरगृही होते. यांचे राजकीय संघटन अतिशय कमकुवत दर्जाचे असून नेतृत्व गावापुरते मर्यादित असते. पशुधनावरून व्यक्तीचा दर्जा ठरविला जातो. यांच्यात काही प्रमाणात गुलामगिरी आढळते. सभोवतालच्या खेड्यांमध्ये राहणीमान व चालीरिती सारख्या असूनही प्रत्येक खेड्याची भाषा वेगळी आढळते.

यांच्यात विशिष्ट अशी कुलचिन्हपद्धती नाही. न्यूबांत मातृसत्ताक कुटुंबपद्धती आहे. न्यूबा हे बाह्य संपर्कापासून अलिप्त असल्यामुळे त्यांच्यात गट-विभाजन नाही. यांचा धर्म मुख्यत्वे निसर्गाशी निगडित आहे. भूताखेताना तसेच पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी ते पशू बळी देतात. त्यांच्यात पर्जन्यकर्ता देवऋषीचे फार महत्त्व असते. काही डोंगरी भागातील स्त्रिया आपला खालचा ओठ टोचून घेतात आणि खालचे सुळे (दात) स्त्री-पुरुष दोघेही काढून टाकतात. सुंता करण्याची चाल बहुतेक पुरुषांत प्रचलित आहे. त्यांचे झपाट्याने मुस्लिमीकरण होत असून अरबी ही जनभाषा म्हणून लोकप्रिय होत आहे. हे लोक मृतास पुरतात.

संदर्भ : 1. Murdock, G. P. Africa: Its Peoples and Their Culture History, New York,

1959.

2. Nadel, S. F. The Nuba, New York, 1947.

लेखक : सु. रा.देशपांडे, म. बा.मांडके

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate