অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुलयन

पुलयन

केरळ व तमिळनाडू राज्यांतील एक अनुसूचित जमात. त्यांना स्थलपरत्वे विविध नावे प्राप्त झाली असून दक्षिण मलबारमध्ये चेरूमान किंवा चेरमक्कल म्हणतात, तर पालघाटमधील पुलयनांना थंडा पुलयन या नावाने संबोधितात. हे लोक थंडा लव्हाळ्याचे वस्त्र वापरीत, म्हणून त्यांना थंडा पुलयन म्हणतात. यांची लोकसंख्या १९७१ च्या जनगणनेनुसार ८९,४०६ होती. याशिवाय यांच्या अनेक उपजमाती आहेत; तथापि त्या सर्वांची बोली भाषा मलयाळम्-तमिळचे मिश्रण असलेली आहे. हे लोक निग्रोंप्रमाणे काळे व ठेंगणे असून, त्यांच्या चेहऱ्यांची ठेवण पूर्णतः भारतीय आहे. स्त्री-पुरूष दोघेही कमरेभोवती आखुड फडके गुंडाळतात. थंडा पुलयन स्त्रिया वाळलेल्या पानांच्या झिरमिळ्या फक्त कमरेभोवती बांधतात. स्त्रिया केसांचा भांग न पाडता माथ्यावर मध्यभागी अंबाडा घालतात. गळ्यात काचमण्यांच्या माळा व हातांत कोपरापर्यंत पितळी बांगड्या घालतात.

या लोकांच्या उत्पत्तीविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत. पूर्वी ह्या लोकांना गुलाम म्हणून वागवीत असत. ब्रिटिश काळात गुलामगिरी नष्ट झाल्यापासून ते शेतमजुरी करू लागले आहेत. स्त्रिया टोपल्या-चटया विणतात. यांचे अन्न भात-भाजी, मासे, ताडी इत्यादी पदार्थ होत. यांच्या झोपड्या माडांच्या चुडतीनी किंवा गवताने शाकारलेल्या शेताच्या कडेने एका रांगेत असतात. त्यामुळे सर्व शेतावर कायम राखण होते. चेरूमान आपल्या झोपड्यांना छाळ म्हणतात. सर्व उपजमाती अंतर्विवाही असून मुलामुलींची लग्ने वयात आल्यावर करतात. मामेबहिणीला प्राधान्य दिले जाते. फक्त थंडा पुलयनांमध्ये लग्न वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी ठरविले जाते. त्याला थंडा कल्याणम् म्हणतात. वधूच्या बोटात अंगठी घालणे एवढाच फक्त लग्नविधी असतो. बहुपत्नीत्व फारसे नाही. गरोदर स्त्रीला भूतपिशाच्च-बाधा आहे का, हे बघण्यासाठी चिंचेचे पाणी पाजून एक विशिष्ट विधी (पुलीकुटी) करतात. त्यास ‘गर्भकळी’ असेही म्हणतात. लग्नापूर्वी मुलगी गरोदर राहिल्यास संबंधित व्यक्तीला तिच्याशी लग्न करावेच लागते. विवाहित स्त्रीशी व्यभिचार करणाऱ्या व्यक्तीला जबर दंड द्यावा लागतो.

हे लोक जडप्राणवादी असून सूर्योपासनेला त्यांच्यात महत्त्व आहे. जादुटोण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे मुख्य देव परकुट्टी, कारिनकुट्टी, चाथन, मुनिआप्पा, भगवती-काली व पितरात्मे असून नांगरणीचा पहिला दिवस व संक्रांत-प्रसंगी देवांपुढे बोकड अथवा कोंबडे बळी देतात. इतर सण-समारंभप्रसंगी नाच-गाणी म्हणून उंच काठ्यांना लाकडी घोडे बाधून त्या नाचवितात.

जमातीचा प्रमुख वल्लोन किंवा वलियावन असून त्याचा मदतनीस कुरुप्पन हा सर्व घटनांची नोंद ठेवतो व वडिक्करण फौजदाराचे काम पाहतो. यांच्यात व्यभिचार, चोरी वगैरे गुन्ह्यांची चौकशी पंचायतीमार्फत केली जाते. विवाहित व्यभिचारी स्त्रीला शुद्ध करून घेण्यात येते व मगच तिचा नवरा तिचा पुन्हा स्वीकार करतो. दंड पंचायत ठरविते.

बहुतेक सर्व पुलयन मृताला कोऱ्या कापडात गुंडाळून पुरतात; त्या जागी मुखाचे बाजूस पानाचे २१ तुकडे ठेवून झाडाची फांदी रोवतात व त्यावर शहाळ्याचे पाणी ओततात. सूतक चौदा दिवस पाळतात. मृताचा मुलगा डोक्याचे केस वाढविणे ही दीक्षा वर्षभर पाळतो. चेरुमानांत मृताला पुरलेल्या जागी दगड उभारतात.

संदर्भ : 1. Iyer, A.K.; Iyer, L.K.The Cochin Tribes & Castes. 2. Vols., Madras,1909-1912.

2. Thurston, Edgar; Rangachari. K. Castes and Tribes of   Southern India. Vols.II and VII.New York, 1965.

लेखिका : सुमति कीर्तने

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate