অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भामटे

भामटे

महाराष्ट्रातील ही एक विमुक्त जात. या जातीचा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या विमुक्त जातींच्या यादीत क्रमांक तीनवर सामावेश केलेला आहे. विदर्भात ही जात प्रामुख्याने वर्धा, नागपूर, गढचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत तसेच पश्चिमेकडील पुणे, सातारा, धुळे, जळगाव व कोल्हापूर या जिल्ह्यांत आणि मराठवाडयात बीड, परभणी व उस्मानाबाद या जिल्ह्यांत आढळून येते. यांची लोकसंख्या वीस हजार होती (अंदाज १९८१). स्वातंत्र्यपूर्वी या जातीस गुन्हेगार जात म्हणून संबोधिले जात असे; कारण चोऱ्या करणे हाच त्यांचा त्या वेळी प्रमुख व्यवसाय होता. सध्या ते शेतातून ताग, अंबाडी व इतर पिके घेतात.

या जातीच्या छत्री भामटा व भामटी या दोन प्रमुख उपजाती होत. छत्री भामटा उपजाती राजपूत उपजातींची, उदा., बडगूजर, चौहान, भट्टी, गहलोत, कछवा इं नावे आढळून येतात. त्यांच्या शरीररचनेवरून व रंगावरून ते राजपूत कुळापासून आले असावेत तसेच हे लोक गुजरातमधून महाराष्ट्रात स्थलांतरित झाले असावेत; कारण त्यांच्या भाषेत हिंदी, मराठी व गुजराती शब्दांचे मिश्रण आहे. मराठी प्रदेशातील भामट्यांना भामटी या नावाने संबोधिले जाते. या उपजातीतील प्रमुख आडनाव गुडेकर, बेलखाडे, कावठी इ. होत. छत्री भामटा लोकांत उत्तरेकडील रीतीरिवाज आढळून येतात. सगोत्र अथवा एकाच आडनावाच्या समूहात विवाह होत नाही. वधूमूल्य म्हणून ५० रुपये मुलीच्या चुलत्यास आणि १०० ते २०० रु. आई-वडिलांना द्यावे लागतात. विधवाविवाह मान्य आहे. घटस्फोट देण्याची पद्धत रूढ आहे. सर्व धार्मिक विधी जमातीतील पुढाऱ्याकडून करवून घेतात.

भामटे लोक निरनिराळे वेष करतात. भामटा जातीत काही तथाकथित अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातींखेरीज, उच्च व मध्यम जातींतील हिंदूदेखील आढळून येतात. भामटा बनलेले लोक इतर जातीतील लोकांनादेखील आपल्या जातीत धार्मिक विधी करून समाविष्ट करून घेतात. प्रथम जातीची जमात करून सर्वांची परवानगी मिळवावी लागते. प्रवेश फी म्हणून १५ ते २५ रुपये द्यावे लागतात. नव्या इसमाला आंघोळ घालून नवा पोशाख देतात. वृद्ध भामटा पुरुष त्याच्या तोंडात हळद व साखर यांची चिमूट घालतो. सर्वांचे जेवण होते. यावेळी नवा पुरूष वृद्ध भामट्याच्या ताटातच जेवण घेतो. नव्या इसमाला आडनाव दिले जाते व दुसऱ्या आडनावाचा इसम आपली मुलगी देतो. अशा रीतीने नव्या इसमाचा भामटा जातीत समावेश करून घेतला जातो.

गिरणी वडुर, कामाटी, पाथरवट, टकारी व उचले हे या जातीस संबोधण्याचे तत्सम शब्द आहेत. त्यांची दैवते बहिरोबा, भवानी, खंडोबा, मरीआई, म्हसोबा, वेताळ व यल्लम्मा ही होत.

संदर्भ: 1. Enthoven, R. E. The Tribes and Castes of Bombay, Vol. I. Delhi, 1975.

2. Sherring, M. A. Hindu Tribes and Castes, Delhi, 1974.

३. अत्रे, त्रिंबक नारायण, गुन्हेगार जाती, पुणे, १९११.

लेखक : पु. र.सिरसाळकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate