অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुटिया

भुटिया

भारतातील एक आदिम निमभटकी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे पश्चिम बंगाल व त्रिपुरा या राज्यांत आढळते. त्यांची लोकसंख्या १९७१ च्या शिरगणतीनुसार ३३,९१५ होती. हे लोक मंगोलियन वंशाचे असल्याने पिवळसर वर्णाचे, ठेंगणेच पण मजबूत बांध्याचे आहेत. उत्तम गिर्यारोहक म्हणून त्यांचा ख्याती आहे. भारत-तिबेट दरम्यान तंबाखू, डाळी, पितळ, तांबे, लोखंड आदी वस्तूंची देवाणघेवाण करून त्या पोहोचविण्याचा उद्योग करणे हाच यांचा मुख्य धंदा असून त्या वस्तूंच्या बदल्यात मीठ, बोरॅक्स, लोकर ते घेतात. लोकर कातणे व विणणे ही कामे अमुक्रमे पुरुष व स्त्रिया यांनीच करावयाची असतात. या कामांची अदलाबदल केल्यास निंदास्पद मानले जाते. लोकरीच्या शाली, रग, गालीचे इ. विणण्यात या जमातीतील स्त्रिया कुशल असतात. डोंगर-उतरणीवरची शेती (सोपान शेती) हा यांचा जोडधंदा.

यांच्यात अनेक बहिर्विवाही कुळी असून त्यांना रंथ म्हणतात. गावाबाहेरील मुलामुलींत लग्‍नसंबंध करतात. मुलगी लहान असतानाच मागणी घालून ती मोठी झाल्यावर लग्‍नसमारंभात होतो; पण अशा विवाहासाठी वधूमूल्य द्यावे लागते. त्यामुळे मुलगी पळवून लग्‍न करण्याचे-अपहरण विवाहाचे-प्रमाण जास्त आढळते. स्त्री-पुरुषांचे एकत्रित युवागृह 'रंग-भंग' या नावाने ओळखले जाते.

या जमातीचा बद्रीनाथ, जोशीमठ इत्यादींसारख्या क्षेत्र ठिकाणांशी संबंध येत राहिल्याने हिंदू चालीरीतींचा पगडा त्यांच्यावर बसत चालला आहे. त्यामुळे धार्मिक आचार-विचारांतही बदल होत आहे.

हिंदूंप्रमाणे ते मृताचे दहन करतात आणि मृताशौच दहा दिवस पाळतात.

संदर्भ : 1. Majumdar, D. N. Races and Cultures of India, Bombay. 1961.

2. Shrivastava, R. P. Marriage and Divorce Among the Eastern Bhotias: The Anthropologist, Vol. IV, No. 1 & 2. March & August 1957, Delhi.

3. Shrivastava, R. P. Rang-Bhang in the Changing BholiaLife : The Eastern Anthropologist, Vol. VI, September 1952 to August 1953, Lucknow.

लेखिका: सुमति कीर्तने

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate