অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महामलसर

महामलसर

दक्षिण भारतातील एक अत्यंत मागासलेली व आर्थिक दृष्ट्या कमकुवत भटकी आदिम जमात. त्यांची वस्ती तमिळनाडू व केरळ राज्यांत तुरळक प्रमाणात आढळते. केरळ राज्यातील पालघाट जिल्ह्यात डोंगराळ भागातील जंगलातून ते आढळतात. अद्यापि ते भटक्या स्थितीत जीवन कंठित असून त्यांच्यावर नागरीकरणाचे संस्कार झालेले नाहीत. ते स्वतःस पश्चिमेकडील मूळ रहिवासी मानतात. त्यांची लोकसंख्या घटत असून १९७१ च्या जनगणनेनुसार ती ३७ होती.

काळा वर्ण, मध्यम उंची व कुरळे केस ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये होत. स्त्री-पुरूष दोघेही अर्धनग्न अवस्थेत जंगलात भटकत असतात. जंगलातील प्रस्तरालयांतून तसेच मोठ्या झाडांच्या बुंध्यातून ते तात्पुरते निवासस्थान (छला) करून राहतात. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून संरक्षण व्हावे, म्हणून त्यात विस्तव तेवत ठेवतात. अशा पाचसहा प्रस्तरालयांचा वा झोपड्यांचा समूह असतो.

ही जमात मांसाहारी असूनही म्हैस, बैल, गाय, कोंबडी व बदक यांचे मांस निषिद्ध मानते. जंगलातून मध, फळे, मुळे, सुरण इ. गोळा करून त्यांवर ते उपजीविका करतात; तथापि त्यांच्यातील काही लोक अलीकडे जंगल खात्यातील रोपवाटिकेत मजूर म्हणून काम करू लागले आहेत. ते तमिळ व मलयाळम् मिश्रित अपभ्रष्ठ मलसीर नावाची बोली बोलतात.

मुले−मुली वयात आल्यानंतर विवाह करतात. लग्न सामान्यतः सोमवारी करतात. विवाहविधी वधूच्या घरी साजरा होतो. ऐपतीप्रमाणे वधूमूल्य देतात. विवाह अंतर्विवाही कुळींतच होतात. अपहरण विवाह, सेवा विवाह इ. प्रकार रूढ असून घटस्फोट, परित्याग व पुनर्विवाह रूढ आहे. बहुपत्नीत्व मान्य असून पूर्वी बहुपतित्वही त्यांत रूढ होते. मुलीला पहिल्या ऋतूत पाच दिवस तर प्रसूतीनंतर स्त्रीस १५ दिवस स्वतंत्र झोपडीत ठेवतात आणि अशा स्त्रियांचे दर्शनही निषिद्ध मानतात. नामकरण पिता किंवा जमात प्रमुख करतो. पित्याच्या पश्चात मुलाकडे शिकारीची शस्त्रास्त्रे मालकी हक्काने जातात.

या जमातीत जमात प्रमुखाला पेरिया थांबी (मोठा भाऊ) म्हणतात. तो जमातीतील धार्मिक विधी, विवाह, घटस्फोट, अंत्यविधी इ. सर्व व्यवहारांत सल्ला देतो व प्रसंगी त्याची उपस्थिती आवश्यक असते. हे लोक जडप्राणवादी असून यांच्यात गणचिन्हे आहेत.क्वचित तिल्लिकल येथील अशचिन भगवती या मंदिरालाही ते भेट देतात.

मृतापुढे ते खूप शोक करतात. त्यांच्यांत दफन किंवा दहन हा विधी नसून ते मृतास पानांत किंवा चटईत गुंडाळून दाट जंगलात ठेवतात. तेथे पशुपक्षी प्रेत खातात. काही सुधारलेले लोक मृताचे दफन करतात. त्यांच्या अंत्यविधीसंबंधी तसेच आशौचासंबंधी फारशी माहिती ज्ञात नाही.

संदर्भ : Luiz, A. A. D. Tribes of Keral, New Delhi 1962.

लेखिका : रूक्साना शेख

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate