অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्तगट २

रक्तगट २

पहिल्या महायुद्धाच्या वेळी यूरोपियन सैनिकांशिवाय आशियायी, आफ्रिकन, मध्यपूर्वेतील व स्लाव्हिक सैनिकांचे रक्तगट तपासण्याची संधी मिळाली. त्या वेळी वांशिक व जातिभिन्नतेनुरूप रक्तगटात फरक होतात, हे लक्षात आले. याच संदर्भात B रक्तगटाबद्दल पुढील माहिती उपलब्ध झाली : मध्य चीनमध्ये या रक्तगटाचे प्रमाण ३५% आहे. दक्षिणेस भारताकडे हे हळूहळू कमी होत गेले. पश्चिमेकडे सायबेरियात ते कमी कमी झाले. अलास्कातील रहिवाश्यांत ते १०% आणि उत्तर अमेरिकेतील इंडियन लोकांत हे प्रमाण शून्यावर आले आहे.

Rh रक्तगटाचे प्रमाण यूरोपियन गोऱ्या लोकांत ८५% धन आणि कृष्णवर्णीय व पौर्वात्य लोकांत ९८% ते १००% धन आढळले आहे. उत्तर स्पेनमध्ये २५% ते ३५% Rh — ऋण रक्तगट, तसेच चीनमध्ये ९९% Rh— धन रक्तगट आढळतो.

महत्त्व: पूर्वनियोजित किंवा तातडीच्या रक्ताधानापूर्वी दाता व ग्राहक यांच्या रक्तगटांची तपासणी करून ते अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरविणे आवश्यक असते. याविषयी अधिक माहिती ‘रक्ताधान’ या नोंदीत दिली आहे.

आ. १. नवजातातील रक्तविलयनजन्य रोगाचा विकासआ. १. नवजातातील रक्तविलयनजन्य रोगाचा विकास

आ. २. Rh घटकामुळे उद्‌भवणाऱ्या प्रतिक्रिया : (अ) Rh — ऋण रुग्ण : (१) ऊतक कोशिका, (२) Rh — ऋण तांबड्या कोशिका, (३) Rh — धन तांबड्या कोशिका, (४) प्रतिपिंड, (५) दुसरे Rh — धन रक्ताधान (अंतःक्षेपण सुई रक्तवाहिनीत); (आ) Rh — ऋण माता (गर्भवती) व Rh — धन गर्भ : (१) ऊतक कोशिका, (२) वार. आ. २. Rh घटकामुळे उद्‌भवणाऱ्या प्रतिक्रिया : (अ) Rh — ऋण रुग्ण : (१) ऊतक कोशिका, (२) Rh — ऋण तांबड्या कोशिका, (३) Rh — धन तांबड्या कोशिका, (४) प्रतिपिंड, (५) दुसरे Rh — धन रक्ताधान (अंतःक्षेपण सुई रक्तवाहिनीत); (आ) Rh — ऋण माता (गर्भवती) व Rh — धन गर्भ : (१) ऊतक कोशिका, (२) वार.

नवजात अर्भकातील रक्तविलयजन्य रोग गर्भिणी व गर्भ यांच्या रक्तगटांच्या असंयोज्यतेमुळे (संयोग होण्यास अयोग्य असल्यामुळे) उत्पन्न होतो.

Rh-धन रक्तगटाचे रक्त चुकून Rh-ऋण रक्तगट असलेल्या स्त्री रुग्णास रक्ताधानात दिले गेल्यास किंवा गर्भिणीच्या प्रथम गर्भारपणात पित्यापासून Rh-धन रक्तगट मिळालेल्या गर्भाचे अल्पसे रक्त मातेच्या रक्तात मिसळले, तर तिच्या रक्तात प्रतिरोधक प्रतिपिंड निर्मिती होते.

Rh-धन रक्तगटाचे रक्त त्याच स्त्रीला दुसऱ्या वेळी दिले गेल्यास किंवा तिच्या दुसऱ्या गर्भारपणी गर्भाचा रक्तगट Rh—धन असल्यास निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडाचे प्रमाण वाढते. हे प्रतिपिंड वारेतून गर्भाच्या रक्तात येऊन रक्तविलयनास कारणीभूत होतात.

कोष्टक क्र. ७. पितृत्व विवर्जन : ABO पद्धत

मातेचा

अपत्याचा

पित्याच्या

पित्याच्या

रक्तगट

रक्तगट

रक्तगटाचीशक्यता

रक्तगटाचीअशक्यता

O

O

O, A किंवा B

AB

O

A

A किंवा AB

O किंवा B

O

B

B किंवा AB

O किंवा A

A

O

O, A किंवा B

AB

A

A

कोणताही

A

B

B किंवा AB

O किंवा A

A

AB

B किंवा AB

O किंवा A

B

O

O, A किंवा B

AB

B

B

कोणताही

B

A

A किंवा AB

O किंवा B

B

AB

A किंवा AB

O किंवा B

AB

AB

A, B किंवा AB

O

Rh रक्तगटाच्या असंयोज्यतेमुळे सौम्य ते गंभीर विकृती नवजात अर्भकात निर्माण होते. तशीच परंतु अतिशय सौम्य ते सौम्य विकृती ABO रक्तगटांच्या असंयोज्यतेतून उद्‌भवते. माता बहुधा O रक्तगटाची असते व गर्भ A किंवा B रक्तगटाचा असतो. गर्भारपणात २०% तॆ २५% या प्रमाणात ABO असंयोज्यता आढळत असली, तरी फक्त १० पैकी एखाद्याच नवजातात रोग उद्‌भवतो.

विवाद्य पितृत्व ठरविण्याकरिता रक्तगट निश्चिती उपयुक्त ठरली आहे (उदा., पित्याच्या संपत्तीचा वाटा औरस अपत्याइतकाच अनौरस अपत्याला देण्याचा प्रश्न उद्‌भवतो तेव्हा अपत्याचे पितृत्व निर्धारित करणे आवश्यक असते). माता, अपत्य आणि लोक समजुतीप्रमाणे पिता असलेल्या व्यक्तीच्या रक्तगटांची तपासणी करून पितृत्व विवर्जन करता येते. अपत्यामध्ये माता किंवा पिता यांच्यापैकी एकाच्या रक्तगटाच्या कारक निश्चितच असतो. ABO व MN रक्तगट पद्धती वापरून अनुक्रमे कोष्टक क्र ७ व ८ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अनुमाने काढता येतात.

केवळ ABO पद्धत वापरल्यास पितृत्त्वाचा आरोप खोटा असल्याची फक्त सु. २०% प्रकरणांत निश्चिती मिळते. MN पद्धतीमुळे ती १८% मिळते. याकरिता आणखी काही रक्तगट पद्धतींचा वापर करून जवळ जवळ ६८% पुरुष पितृत्वाच्या खोट्या आरोपातून मुक्त होऊ शकतात.

कोष्टक क्र. ८. पितृत्व विवर्जन : MN पद्धत

अपत्याचा रक्तगट

मातेचारक्तगट

पित्याचाअशक्य रक्तगट

MN

M

M

MN

N

N

N

कोणताही

M

M

कोणताही

N

कधीकधी प्रसूतिगृहे किंवा बालकगृहे यांमध्ये मुलांची अदलाबदल झाल्यास मातृत्व ठरविण्याकरिता रक्तगट परीक्षा उपयुक्त ठरते.

जुळे, तिळे किंवा चतुष्क जन्मलेल्या अर्भकांतील फरक रक्तगट तपासणीने ठरवता येतात. ऑस्ट्रेलियात १९५० मध्ये जन्मलेल्या एका चतुष्काच्या तपासणीत चारही अर्भके एकमेकांपासून भिन्न असल्याचे व चार निरनिराळ्या अंड्यांपासून जन्मल्याचे आढळले होते.

मानवशास्त्राच्या अभ्यासात शरीरमापन, त्वचेचा रंग इत्यादींपेक्षा रक्तगट तपासणी अधिक उपयुक्त ठरली आहे. शरीरमापन व त्वचारंग यांतील व्यक्तिगत किंवा निरनिराळ्या जमातींतील बदल यांसंबंधीचे जीन निश्चित करणे अशक्य आहे. याउलट रक्तगटातील फरक एका जीन युग्मावर अवलंबून असून ते व्यक्तीत किंवा जनसमूहात ओळखता येतात.

काही जनसमूहांच्या अभ्यासानंतर काही रक्तगट प्रतिजन काही वंशांचे वैशिष्ट्य असल्याचे आढळले आहे.

कोष्टक क्र. ९. निरनिराळ्या वंशांतील विशेषता दर्शक रक्तगट प्रतिजन

जनसमूह (% प्रमाण)

रक्तगटपद्धत व प्रतिजनाचे नाव

कॉकेशियन

मंगोलियन

निग्रो

डिएगो, Dia

३६

डफी, Fy (a—b—)

६८ – ९०

केल, Jsa

२०

Rh, V

२७ – ४०

ABO पद्धतीशिवाय मानवशास्त्राच्या अभ्यासात MN पद्धतीचाही उपयोग करण्यात आला आहे. या पद्धतीतील काही क्वचित आढळणारे प्रतिजन फक्त निग्रो लोकांतच आढळले आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे S व s यांपैकी कोणतेही १% निग्रोंच्या रक्तातील तांबड्या कोशिकांवर नसते.

मानवी रक्तगटांच्या अभ्यासाव्यतिरिक्तनरवानरगणातील काही मानवेतर प्राण्यांच्या रक्तगटांचा अभ्यास करण्यात आला आहे. मानवी रक्तगट ठरविण्याकरिता जे विक्रियाकारक वापरतात तेच या प्राण्यांतील प्रतिजन ओळखण्याकरिता वापरता येतात. गोरिला वगळता इतर कपी ABO पद्धतीशी जुळतात. चिंपँझीमध्ये अधिक प्रमाणात A रक्तगट आढळतो, तर काही O रक्तगटाचेही असतात. ओरँगउटान बहुधा A व कधीकधी B किंवा AB गटाचे आढळतात. गिबन O शिवाय इतर कोणत्याही रक्तगटाचे असू शकतात. कपींच्या तांबड्या कोशिकांवर ‘M –सदृश’ व ‘N-सदृश’ प्रतिजन आढळले आहेत. मानवशास्त्रात मानव व मानवसदृशकपींचा अभ्यास अभिप्रेत असल्याने त्यांच्या रक्तगटांच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. [मानवशास्त्र].

रक्तगट निश्चित आनुवंशिकीय नियमांनुसारच तयार होतात. शिवाय ते ठरवणे सोपे असते त्यामुळे जननिक सहलग्नतेच्या अभ्यासाकरिता जननिक चिन्हक म्हणून त्यांचा उपयोग करतात. रक्तस्रावी रोग [रक्तक्लथन] हा लिंग-गुणसूत्राशी सहलग्न असल्यामुळे तो रक्तगटाशी निगडित असल्याचे समजते.

याशिवाय रक्तगटांचा आणि काही विकृतींचा संबंध असल्याचे आढळते. O रक्तगट असलेल्या व्यक्तींत पचनजव्रणांचे प्रमाण अधिक, तर A रक्तगट जठर कर्करोगाच्या व्यक्तींत अधिक आढळतो. HLA प्रतिजनांच्या अभ्यासावरून काही सांध्याच्या रोगांसंबधीची माहिती उपलब्ध झालेली आहे.

अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी दाता व ग्राहक यांचे रक्तगट योग्य असावे लागतात. अन्यथा प्रतिरोपित

अवयव अस्वीकृत होण्याची शक्यता असते. ABO पद्धतीतील प्रतिजन या बाबतीत शक्तिशाली आहेत.

संदर्भ : 1. Best, H. C.; Taylor, N. B. The Living Body, Bombay, 1961.

2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology. Tokyo, 1976.

3. Mourant, A. E. and others, The Distribution of HumanBloodGroups and other Polymorphisms, London, 1976.

4. Race, R. R.; Sanger, R. Blood Groups in Man, Philadelphia, 1962.

5. Shah, S. J. and others, Ed., A.P. I. Textbookof Medicine, Bombay, 1986.

6. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.

लेखक : य. त्र्यं.भालेराव,वि. श्री.कुलकर्णी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate