অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रॉबर्ट हॅरी लोई

रॉबर्ट हॅरी लोई

(१२ जून   १८८३−२१ सप्टेंबर १९५७). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ. त्याचा जन्म जर्मन आई व हंगेरियन वडील या दांपत्यापोटी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे झाला. तो दहा वर्षांचा असताना हे कुटुंब व्यवसायानिमित्त न्यूयॉर्कला स्थायिक झाले. तेथेच रॉबर्टने सिटी महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी घेतली (१९०१). त्यानंतर सु. तीन वर्षे एका पब्लिक स्कूलमध्ये त्याने अध्यापन कले आणि नंतर कोलंबिया विद्यापीठात (न्यूयॉर्क) उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतला. बोॲस फ्रँट्सच्या हाताखाली मानवशास्त्र विषयात त्याने पीएच्.डी. ही पदवी संपादन केली (१९०८). काही वर्षे अमेरिकन म्यूझीयम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेत त्याने क्लार्क विसलरच्या हाताखाली काम केले (१९०७−१७). विसलरच्या मार्गदर्शनाखाली त्याने लेमही, शोशोनी, क्रो या उत्तर अमेरिकेतील इंडियन जमातींचा क्षेत्र-अभ्यास केला आणि तत्संबंधी संशोधतात्मक व्याप्तिलेख प्रसिद्ध केले. क्रो इंडियन जमातीतील संस्कृती विशेषतः, तिचे भाषाविषयक ज्ञान, यांवर त्याने भर दिला आहे. उर्वरित बहुतेक सर्व जीवन त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) अध्यापनात व्यतीत केले (१९१७−५०). पुढे याच विद्यापीठात त्याला मानवशास्त्र विषयातील प्राध्यापकपद देण्यात आले. विद्यापीठात असतानाच ल्यूला कोल या महिलेशी तो विवाहबद्ध झाला (१९३३). कर्करोगाने त्याचे बर्कली येथे निधन झाले.

लोईने अमेरिकन इंडियन वसतिस्थाने असलेल्या विविध इंडियन जमातींचे विशेषतः क्रो इंडियन जमातीचे सर्वेक्षण व क्षेत्र- अभ्यास करून आपले संशोधन व सिद्धांत, स्फुटलेख, व्याप्तिलेख, ग्रंथ यांद्वारे प्रसिद्ध केले. त्याचे एकूण अठरा अभ्यासपूर्ण व्याप्तिलेख असून चौदा ग्रंथ आहेत. त्यांपैकी कल्चर अँड एथ्नॉलॉजी (१९१७), प्रिमिटिव्ह सोसायटी (१९२०), इंट्रोडक्शन टू कल्चरल अँथ्रपॉलॉजी (१९३४), द क्रो इंडियन्स (१९३५), हिस्टरी ऑफ एथ्नॉलॉजिकल थिअरी (१९३७), द जर्मन पीपल : ए सोशल पोट्रेंट टू १९१४ (१९४५), सोशल ऑर्गनायझेशन (१९४८), टोअर्ड अंडस्टँडिंग जर्मनी (१९५४) इ. ग्रंथ मान्यवर पावले असून प्रिमिटिव्ह सोसायटी व सोशल ऑर्गनायझेशन ह्या दोन अभिजात साहित्यकृती मानण्यात येतात. या ग्रंथांनी मानवशास्त्रज्ञांत वैचारिक मंथन घडवून आणले. त्यांचा प्रभाव विसाव्या शतकातील मानवशास्त्रज्ञाच्या अभ्यासावर पडला आहे. प्रिमिटिव्ह सोसायटी या ग्रंथात लोईने केलेल्या उपपत्तिविषयक मीमांसेत बोॲसच्या ऐतिहासिक प्रणालीचे प्रतिबिंब जाणवते; परंतु त्याबरोबरच एल्.एच्. मॉर्गनने सामाजिक संघटनेचा मांडलेला क्रमविकास लोई अमान्य करतो आणि अभिसरणाच्या वर्चस्वाचे जोरदार समर्थन करतो. ॲल्फ्रेड क्रोबर आणि लेस्ली व्हाइट या मानवशास्त्रज्ञांनी त्यावर टीका करूनही या ग्रंथात मांडलेली सामाजिक संघटनेची उपपत्ती प्रभावी असल्याचे मत तत्कालीन, मानवशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. जमातींचे आप्तसंबंध, न्याय, संपत्ती, शासनव्यवस्था इ. बहुविध विषयांची  या ग्रंथात सांगोपांग चर्चा आहे. तसेच आप्तसंबंधविषयक संज्ञांचे स्पष्टीकरण, कुल हा एक एकपक्षीय आप्तसंसबंधाधिष्टित समूह आहे, मानवजातिवर्णन हे शास्त्र आहे आणि त्यातील उपपत्त्यांना सबळ पुरावे नि साधने आहेत, वगैरे गोष्टी त्याने चर्चिलया आहेत. सोशल ऑर्गनायझेशन या ग्रंथात कुटुंब आणि विवाह यांच्या व्याख्या दिल्या असून ‘विवाहावर आधारित सामाजिक घटक म्हणजे कुटुंब असून त्यात माता, पिता आणि त्यांच संतती यांचा समावेश होतो’ असे मत मांडले आहे. स्त्रियांच्या दर्जाविषयी तो म्हणतो, ‘प्रत्यक्ष वर्तन, कायदेशीर दर्जा, कामाची संधी आणि त्याचे स्वरूप व व्याप्ती यांचा या संदर्भात विचार करावा’. लोईने आपल्या संशोधनपर लेखनात मानसशास्त्राला महत्त्व दिले असून त्याचे दाखले त्याच्या हिस्टरी ऑफ एथ्नॉलॉलिकल थिअरी या ग्रंथात आढळतात. सांस्कृतिक निवड हा स्वाभाविक निवडीचाच एक भाग आहे, असे सांगणारा लोई हा कदाचित पहिला मानवशास्त्रज्ञ असेल.

लोईला अनेक मानसन्मान मिळाले. अमेरिकन फोकलोअर सोसायटी (१९१६-१७), अमेकिरन एथ्नॉलॉलिकल सोसायटी (१९२०-२१) आणि अमेरिकन अँथ्रपॉलॉजिकल असोशिएशन (१९३५-३६) या मान्यवर संस्थांचा तो अध्यक्ष होता. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सिसवर सदस्य म्हणून त्याची निवड झाली (१९३१), तसेच शिकागो विद्यापीठाने त्याला सन्मान्य डॉक्टरेट पदवी बहाल केली (१९४१). याशिवाय प्रतिष्ठित व्हायकिंग पदक त्याला देण्यात आले (१९४८). अमेरिकन अँथ्रपॉलॉजिस्ट यानियतकालिकाचा संपादक म्हणून त्याने १९२४−३३ दरम्यान धुरा वाहिली.

संदर्भ :

  1. Du Bois, Cora, Selected Papers in Antropology, Berkeley, १९६०.
  2. Harris, Marvin, The Rise of Anthropological Theory, London, १९६८
  3. Lowie, R. H. Ethnologist, A Personal Record, Berkeley, १९५९
  4. Murphy, R. F. Robert H. Lowle : A Biography, New York, १९७२
  5. Stocking, George, Race, Culture and Evolution : Essays in th History of Anthropology, New York, 1968.
  6. लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate