অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोधा

लोधा

पश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात. तिची वस्ती प्रामुख्याने मिदनापूर व हुगळी याजिल्ह्यांत आढळते. सिंगभूम (बिहार) आणि मयूरभंज (ओरिसा) या जिल्ह्यांतूनही लोधांची तुरळक वस्ती आहे. ओरिसात ते सावरा जमातीत मिसळून गेलेले आढळतात. १९७१ च्या जनगणनेनुसार यांची लोकसंख्या ९७७ होती. ब्रिटिश काळात शासनाने जंगल कायदा करून त्यांचे उपजीविकेचे साधन हिरावून घेतल्यामुळे लोधांत गुन्हेगारी प्रवृत्ती बळावली. त्यामुळे बंगालमध्ये १९०५ मध्ये त्यांची गुन्हेगार जमातींत गणना झाली. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्र शासनाने त्यांचा पुन्हा अनुसूचित यादीत समावेश केला. त्यावेळेपासून त्यांची गणना आदिम जमातींत होऊ लागली. बंगालमध्ये त्यांच्या पुनर्वसनासाठी काही ठिकाणी प्रयत्न झाले असून त्यांच्या वसाहती स्थापन करण्यात आल्या आहेत.

वृद्ध लोधावृद्ध लोधालोधा हे प्रामुख्याने जंगलात वसती करणारे अर्धभटके लोक असून ते कुडाच्या झोपडीत राहतात. मध, मोहाची फुले, कंदमुळे, लाकूडफाटा गोळा करून त्यांच्या विक्रीतून येणाऱ्या पैशावर ते आपला उदरनिर्वाह करतात. काही थोड्या लोकांची स्वतःची शेतजमीन आहे. काहीजण शेतमजुरी करतात, तर काही रेशमाचे कोश जमा करतात. मासेमारी आणि शिकार हे व्यवसायही त्यांच्यात आढळतात. बंगाली, ओडिया व मुंडारी भाषांतील शब्दांची संमिश्र बोलीभाषा ते बोलतात. दारिद्र्यामुळे त्यांच्या अंगावर फारसे कपडे नसतात. लहान मुलेमुली उघडीनागडीच असतात. मोठे स्त्री-पुरुष जेमतेम जाडेभरडे कपडे वापरतात. तरुण मुली व स्त्रिया गळ्यांत काचेच्या मण्यांच्या माळा आणि हातांत बांगड्या घालतात. दंडांवर व छातीवर फुलांची नक्षी गोंदवून घेण्याची त्यांच्यात प्रथा आहे.

मुले-मुली वयात आल्यानंतर त्यांचे लग्न करतात. आते, मामे व मावस भावंडांत लग्न करत नाहीत. त्याचप्रमाणे एकाच कुळीत व एकच देवक असलेल्या कुटुंबात लग्नसंबंध निषिद्ध मानतात. मुलीसाठी देज देण्याची प्रथा आहे. सालमासा, चिर्का, आलू, चंद्र, चांदामासा, माणिक नामक पक्षी, वाघ अशी काही त्यांची प्रमुख देवके आहेत. देवकांना ते फार पवित्र मानतात. मंगळवार हो कोणत्याही शुभ कार्यासाठी, विशेषतःलग्नविधीसाठी, अत्यंत पवित्र दिवस मानतात. लग्नात वधूवर लाकडी मण्यांच्या माळा घालतात व कमरेला लाल करगोटा बांधतात. वधूवर परस्परांच्या कपाळी लाल टिळा लावतात आणि ‘वधूवर सुखी होवोत’ ही प्रार्थना करतात; मग अंतरपाट दूर करून लग्नसमारंभ संपतो. दुसरे दिवशी खारो पारनो नावाचा विधी करतात. यांचयात प्रेमविवाह व घटस्फोट रूढ आहेत; मात्र स्त्रीला घटस्फोट मागता येत नाही. विधवेच्या पुनर्विवाहाला सांगा म्हणतात. गरोदर  स्त्रीला अनेक बंधने असतात. सुखरूप प्रसूती व्हावी म्हणून ग्रामदेवतांना कोंबडा किंवा बकरा अर्पण करतात. हाडी जातीची स्त्री सुईणीचे काम करते. प्रसूतीनंतर नाळ कापून एका मडक्यात ठेवतात आणि ते झोपडीच्या नैर्ऋत्य दिशेला पुरतात. जननाशौच एकवीस दिवस पाळतात. सहाव्या महिन्यात जावळ व उष्टावन करतात.

ज्येष्ठांची प्रत्येक गावात पंचायत सभा असते आणि मुखियाच्या अध्यक्षतेखाली ती भरते. तीत व्यभिचार, चेटूक, जादूटोणा, रूढीभंग इ. अपराधांसाठी बहिष्काराची शिक्षा किंवा दंड करण्यात येतो. याशिवाय लग्नसंबंध जुळविणे, धार्मिक विधी, उत्सवादी समारंभ यांची चर्चा या सभेत होते आणि पंचायत सभेने दिलेले निर्णय अंतिम मानण्यात येतात. तेथील निर्णयांची अंमलबजावणी मुखिया, डाकुआ व परामानिक या तीन अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. धार्मिक विधी, मांत्रिक विधी आणि औषधोपचार यांकरिता काही खास लोक असतात. त्यांना देहेरी (पुराहित), तलिआ (सहाय्यक पुरोहित), हंतकार (बळी देणारा), गुंती (मांत्रिक व वैदू), व्यक्रा (भगत-शामन) ही नावे असून शमान व गुंती यांना समाजात फार मान असतो. लोधांवर वैष्णव मताचा प्रभाव असून ते स्वतःला  हिंदू समजतात. वसुमाता, धर्मदेवता, शितला, वराम, मनसा या देवतांना ते भजतात. शितला ही रोगराईची देवता असून तिचे छोटे मंदिर असते. वर्षातून अनेक वेळा या देवतांचे उत्सव साजरे करतात. त्यांना वांदना, तुसू, चैत्र संक्रांती वगैरे नावे आहेत. उत्सवात बळी आणि नंतर संगीतनृत्य व अखेर देवतेचे विसर्जन हे प्रमुख विधी असतात. चांगल व मांदळ या वाद्यांच्या साथीवर फक्त पुरुषच नृत्य करतात.

सर्वसाधारणतः  मृत व्यक्तीस जाळतात; पण अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे प्रेत जंगलात नेऊन ठेवतात. मृत व्यक्तीला एका चटईवर ठेवतात. भूतबाधा होऊ नये म्हणून प्रेताजवळ विळा ठेवतात. नंतर मोहरीच्या तेलात हळद कालवून ती मृतदेहाला लावतात व त्यावर एक जुने कापड पसरतात. दहा दिवस सुतक पाळतात. अकराव्या दिवशी मृताचे नातेवाईक वैष्णवाच्या हस्ते विस्तव पेटवून आंब्याच्या काटक्या व तूप यांचे हवन करतात. त्यानंतर नव्या मडक्यात अन्न शिजवून पितरांना अर्पण करतात व मग गावजेवण घालतात. बाराव्या दिवशी अर्पण केलेले अन्न ओढ्यात सोडतात.

संदर्भ : 1. Bhowmick, P. K. The Lodhas of West Bengal, Calcutta, 1963.

2. Chattopadhyay, Kamala Devi, Tribalism in India, New Delhi, 1978.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate