অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विटोलिआ

विटोलिआ

गुडरात राज्यातील एक आदिवासी जमात. विटोलिआंची वस्ती मुख्यत्त्वे सुरत जिल्ह्यातील बार्डोली, बांसडा व धरमपूर ह्या तालुक्यात आढळते. याशिवाय महाराष्ट्र राज्यातील खानदेशात त्यांची वस्ती आहे. राजस्थान व कर्नाटक राज्यांतही ते तुरळक प्रमाणात आढळतात. विटोलिआ-कोटविलिया यांची एकूण लोकसंख्या १७,७५९ (१९८१) होती, त्यात बोरोडिया अंतर्भूत आहेत. विटोलाना, विटोरिया, वंसफोडा, पलवाडा इ. नावांनी प्रदेशपरत्वे या लोकांचा उल्लेख करतात. गुजराती भाषेशी साधर्म्य दर्शविणारी यांची स्वतंत्र ठसकेबाज बोलीभाषा आहे. त्यांच्या भाषेत भिल्ली, मराठी, मावची आणि गुजराती भाषांचे मिश्रण आढळते. भिल्ली ही मात्र त्यांची सर्वश्रुत मातृभाषा समजली जाते. विटोलिआंचा मुख्य व्यवसाय बांबूच्या टोपल्या, चट्या व सुपे, चिकाचे पडदे इ. बनविणे हा असून जंगलात वा इतरत्र जेथे बांबू सहज उपलब्ध होईल, अशा ठिकाणी ते वस्ती करतात. एकूण कामकरी विटोलिआंपैकी सु. ८३ टक्के लोक या पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असून उर्वरित लोक शेती, मोलमजुरी, शिवणकाम, पशुपालन, जंगलतोड, मासेमारी इ. व्यवसाय करतात. बुरूड व्यवसायामुळेच आजुबाजुचे लोक त्यांना ‘वंसफोडा’ म्हणून ओळखतात. ‘वतल्वो’ आणि ‘वंसफोडा’ या शब्दांचा अर्थ 'बांबूंच्या चोया काढणे' असा आहे. त्यावरूनही हे नाव त्यांना पडले असावे. नागरी जीवनाशी संपर्क येऊनही त्यांच्यात साक्षरता अल्पप्रमाणात आढळते (१७.१९ टक्के १९८१ च्या जनगणनेनुसार). विटोलिआंच्या स्त्रियांचा विशिष्ट पेहराव आणि त्यांच्या अंगावरचे चितरिया व वाळा दागिने यांमुळे त्या स्त्रिया वेगळ्या ओळखू येतात. या जमातीत बालविवाह प्रथा नाही. विटोलिआ बहिर्विवाही असून सदरी, देसाई, चौधरी ही त्यांची काही कुळे आहेत. चोधरा, दुबळा, गामित इ. जमातींशी त्यांचे बरोबरीचे सामजिक संबंध आहेत. त्यांच्यात आत पंचायत असून तीत वडीलधारे लोक सदस्य असतात आणि ‘कारमारी’ हा तिचा प्रमुख असतो. शनिवार व रविवार हे दिवस वगळून इतर कोणतेही दिवस विवाहासाठी शुभ मानले जातात, विशेषतः सोमवारास प्राधान्य दिले जाते. मुले-मुली वयात आल्यानंतर मुलाकडून मुलीस मागणी घातली जाते. लग्नसमारंभ मुलीच्या घरी होतो. वधूवर एकमोकांशेजारी बसून चहाच्या पेल्यांची अदलाबदल करतात. मग त्यांच्या वस्त्रांची गाठ मारून त्यांना खांद्यावर घेऊन दोन व्यक्ती मंडपाला पाच प्रदक्षिणा घालतात. नंतर वधूवर एका झोपडीत जाऊन वस्त्रगाठ सोडतात व नृत्यात सहभागी होतात. दोन्ही बाजूंच्या चार पिढ्यांमध्ये विवाहसंबंध निषिद्ध आहे. आतेमामे भावंडांच्या विवाहास अग्रक्रम असतो. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीला लहान मेहूणीशी विवाह करता येतो. त्यांच्यात बहुपत्नीकत्व मान्य आहे. वधूमूल्याची वा देजाची प्रथा आहे. ते देता आले नाही, तर 'खंडालिया' प्रथेनुसार लग्नानंतर मुलाला पाच वर्षे सासऱ्याच्या घरी सेवा करावी लागते. घटस्फोट, विधविवाह व पुनर्विवाह यांना मान्यता आहे. विधवेला जर मुले असेतील आणि तिचा दीर अविवाहित व तिच्यापेक्षा वयाने लहान असेल, तर तिला त्या दिराशी विवाह करणे बंधनकारक असते. अन्यथा ती आपल्यापतीच्या कुटुंबातील तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अन्य व्यक्तीशी विवाह करू शकते. दंड भरून कोणालाही घटस्फोट घेता येतो. पुनर्विवाह सामान्यपणे बुधवारी केला जातो व त्यात विधिसंस्कार नसतात. विटोलिआ हिंदूधर्मीय आहेत. त्यानुसार वारसाहक्क मुलांकडे जातो. मूल जन्माला आल्यावर त्याची नाळ बोरूंनी कापण्याची प्रथा असून, ती नाळ झोपडीबाहेर जाळून त्यावर दगड ठेवतात. पाचव्या दिवशी पाच धान्ये ठेवून या दगडाची पूजाही केली जाते. मूल मोठे झाल्यावर त्याचे जावळ मामाच्या हस्ते अथवा चुलत्याने काढण्याची यांच्यात प्रथा आहे. कापलेले जावळ बोरीच्या झुडपांत टाकले जाते.

जमातीत पितृपूजा रूढ असून जादूटोणा, जारण-मारण, चेटूक इत्यादींवर त्यांचा विश्वास आहे. पितरांच्या मातीच्या मूर्ती करून त्यांना शेंदूर फासून त्यांची पूजा करतात व त्यांच्या पताका उभ्या करतात. त्यामुळे ते गणचिन्हवादी आहेत. सोनगढची देवाली, पंडरदेव, हिवानो, सिमिदिओ, चापडमाता, गोवलदेव, शितळामाता व काकाबलिया हे त्यांचे देव असून देवालीं ही देवी व पंडरदेव ही प्रमुख दैवते होत. पितरांना व या देवींना नवस बोलणे, नारळ वाढविणे, दारू अर्पण करणे, कोंबड्या-बकऱ्यांचा बळी देणे इ. प्रथा त्यांच्यात प्रचलित आहेत. त्यासाठी रविवार व मंगळवार हे दिवस महत्त्वाचे मानले जातात. पंडरदेवाला मातीचा घोडा करून वाहण्याचीही प्रथा आहे. निसर्गातील चैतन्यशक्तींनाही (उदा., चंद्रसूर्य, वृक्षवेली, नदी, भूमाता इ.) ते देव मानतात. दिवाळी, होळी हे हिंदूंचे सण व ‘बलेव’ हा सण सर्वजण साजरा करतात. तारपा, गरबा, लगन हे त्यांचे प्रमुख नृत्यप्रकार होत.

विटोविआंमध्ये मृतांना जाळण्याच्या आणि पुरण्याच्या अशा दोन्ही प्रथा आहेत. लहान मुलांना तसेच पटकी, देवी, कुष्ठरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांनी मृत्यू आलेल्या व्यक्तींना पुरतात, इतरांना जाळतात. मृत्यूनंतर दुसऱ्या व तिसऱ्या मृताला पुरलेल्या वा दहन केलेल्या ठिकाणी डाळभाताचा नैवेद्य करून तो तेथे ठेवण्यात येतो; नंतर सर्वांना भोजन दिले जात. मरणोत्तर संस्कार झाल्यानंतर तेथल्याच एका दगडाला शेंदूर फासून एखाद्या झाडाखाली मृत व्यक्तीची आठवण म्हणून तो ठेवण्यात येतो. त्याला ‘खत्रन्न’ असे म्हणतात.

संदर्भ : 1. Enthoven, R. B. Tribes and Castes of Bombay, Vol. lll, Bombay, 1920-22.

2. Government of Gujarat State, Gazetteer of India, Gujarat State Gazetteers: Surat District, Ahmedabad, 1962.

3. The Maharashtra Consus Office, Census of India, 1961-Vol. X-Maharashtra-Scheduled Tribes In Maharashtra: Ethnographic Notes, Bombay, 1972.

लेखिका : शीला दि. मिस्त्री

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate