অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेद्दा

वेद्दा

श्रीलंकेतील एक आदिम जमात. तिची वस्ती प्रामुख्याने श्रीलंकेच्या मध्यपूर्व बिंटिनी जंगलात व कॅंडीभागात विखुरलेली होती. त्यांची लोकसंख्या सु. ५,३०० (१९११) होती; पुढे ती घटत जाऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेद्दा इ. स. पू. सहाव्या शतकात स्थिरावले असावेत. त्यांची संस्कृती ही द्रविडपूर्व संस्कृती आहे, असे तज्ज्ञ मानतात. त्यांचा दक्षिणेकडील वंशप्रकार वेगळा असून तो दक्षिण अरबस्तानपासून पूर्वेला भारताच्या पलीकडे आग्नेय आशिया–इंडोनेशियापर्यंत पसरलेला आहे. श्रीलंकेतील वेद्दा हे वांशिकदृष्ट्या दक्षिण भारतातील दूरवरच्या दुर्गम प्रदेशात आढळणाऱ्या मालिद जमातीशी संबद्ध आहेत, असे एक मत आहे. तसेच दक्षिण भारतातील वेदन जमातीशीही त्यांचे साधर्म्य दर्शवले जाते. काळा वर्ण, कुरळे केस, रुंद वर्तुळाकार चेहरा, रुंद व बसके नाक, किंचित पुढे आलेला जबडा आणि माध्यम उंची ही द्रविडीयन शारीर–वैशिष्ट्ये वेद्दांमध्ये आढळतात.

मानवशास्त्रज्ञांनी त्यांची विभागणी तीन समूहांत केली आहे : गुहांमध्ये वा कडेकपारीत राहणारे, खेड्यापाड्यांत राहणारे आणि किनारपट्टीवरील. वेद्दा हे अन्नसंकलन करणारे असून पाने, फुले, फळे, कंदमुळे, मध इ. पदार्थ ते गोळा करतात. गुहांत राहणारे वेद्दा कधीकधी मोठ्या झाडांच्या ढोलीत आसरा घेतात. त्यांचा प्रमुख व्यवसाय शिकार हा असून त्याच्या जोडीने ते जंगलातून फुले, फळे, कंदमुळे, मध, लाकूडफाटा इ. गोळा करतात. खेड्यांतून राहणारे वेद्दा पाणथळ जागी पर्णकुटी करून राहतात. त्यांचाही मुख्य व्यवसाय शिकार हाच आहे. काही वेद्दा फिरती शेती करतात. पूर्व किनारपट्टीवरील वेद्दा मासेमारी व शिकार यांवरच उदरनिर्वाह करतात. कॅंडीतील लोकांशी यांचा संपर्क आल्यामुळे तेथील लोकांशी आंतरविवाह झाले व त्यांतून संकर संतती निर्माण झाली. सर्व वेद्दा हे अर्धनग्नच असतात. स्त्रिया एखादे वस्त्र किंवा पानांचा झगा घालतात. पुरुष लंगोटी व पानांचा अधोवस्त्रासाठी उपयोग करतात. ऋतुमानाप्रमाणे ते उन्हाळ्यात नदीच्या काठी झोपड्या बांधून व पावसाळ्यात उंचवट्याच्या ठिकाणी गुहेत किंवा डोंगरकपारीत वास्तव्य करतात. स्थिर व्यवसाय नसल्यामुळे वेद्दा हे कायम दरिद्री, अर्धपोटीच राहिलेले दिसतात.

वेद्दा स्त्रीवेद्दा स्त्रीयांच्यात पंचायत नाही, नायक नाही. कुटुंब हाच त्यांचा प्रमुख आधार असून कोणत्या समूहाने कोठे फिरावयाचे व शिकार करावयाची, यांबाबत त्यांच्यात परस्पर–सामंजस्य आहे. त्यांच्या नियोजित क्षेत्रात क्वचितच अतिक्रमण झालेले दिसून येते. त्यांची भाषा सिंहलीचीच बोलीभाषा असून तिचा जमातीपुरताच मर्यादित वापर आढळतो. त्यांच्यात लग्नाचा असा खास समारंभ अथवा विधी नसतो. वेद्दांच्या मध्ये‘वारुगे’ ऊर्फ कुळीची पद्धत आहे. त्यांच्या सर्व कुळी बहिर्विवाही आहेत. उना-पने, उरूवरूगे, नामदी या काही प्रमुख कुळी होत. मात्र त्यांच्यात गणचिन्हवाद नाही आणि मातृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ आहे. वयात आलेल्या मुलामुलींचे लग्न वडीलधारी माणसे ठरवितात. वधूपिता जावयाला धनुष्य देतो, तर वराचे वडील जंगलात त्यास कोठेही जाण्यास मुभा देतात. वर भावी पत्नीस कापड आणि दागिने देतो. त्यानंतर ती दोघे जंगलात जातात आणि त्यांचे पति- पत्नीचे नाते निश्चित होते. त्यांच्यात देज देण्याची पद्धत नाही. मात्र मुलीचे लग्न झाले, की जावई बहुधा सासऱ्याच्या घरी येऊन राहतो. सासऱ्याचा जमीन-जुमला त्याला मिळतो. त्यांच्यात एकपत्नीकत्व आहे.

वेद्दांच्या धर्मात पूर्वजपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे मृत्यू पावतात त्यांचे रूपांतर‘ना-यक्कू’ या देवतांत होते, असा त्यांचा समज आहे. ना-यक्कू याचा अर्थ आप्तसंबंधित देवता असा आहे. त्यांची पूजा केली नाही तर त्या कोपतात, असाही समज आहे. या देवतांचा नेता ‘कांडी-यका’ (गिरिधर) असून तो सहिष्णू व कल्याणकारी आहे. काही वेळा त्याची आराधना‘कांडी-वन्निय’ या नावाने केली जाते. याशिवाय ‘बंबूर-यका’, ‘इंडिगोळ्ळी–यका’, ‘इंडिगोळ्ळी–कि री अम्मा’ इ. देवदेवता त्यांच्यात आढळतात. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली अनेक वेद्दांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांच्यात मृतास जाळत वा पुरत नाहीत आणि अंत्यविधीही नसतो. ते मृताला पालापाचोळ्यात झाकून जंगलात ठेवतात.

संदर्भ : 1. Ferreira, J. V. Totemism in India, Oxford, 1965.

2. Hutchinson, H. N.; Gregory, J. W.; Lydekker, R. The Living Races of Mankind, Vol. I, Delhi, 1985.

3. Seligmann, C. G.; Seligmann, B. Z. The Veddas, Cambridge, 1911.

लेखक : सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate