जळगाव जिल्हा परिषदेचे संपूर्ण कामकाज डिजीटल बरोबरच गुणवत्तापूर्ण करण्याचा ध्यास जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे. ई-लर्निग, प्राथमिक शिक्षकांच्या हजेरीसाठी स्टॉर्म व्हाटस अप प्रणाली, पारदर्शी कामकाजासाठी मोबाईल ॲप ची निर्मिती करत त्या दिशेने आगेकूच देखील केली आहे. जळगाव जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या अनेक शाळा डिजीटल बरोबरच आयएसओ मानांकित झाल्या आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे देखील आयएसओ मानांकित झाली आहेत. आता पुढचे पाऊल म्हणून जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनीही आयएसओ मानांकन प्राप्त करुन डिजीटल होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव गट ग्रामपंचायतीस उत्कृष्ट काम आणि गुणवत्तेबद्दल आयएसओ 9001-2015 चे मानाकंन मिळाले असून आयएसओ मानांकन मिळवणारी चितेगाव ही जळगाव जिल्ह्यातील पहिली गट ग्रामपंचायत ठरली आहे.
सरपंच अमोल भोसले, ग्रामविस्तार अधिकारी सविता पांडे व सदस्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमामुळे हा बहुमान प्राप्त झाला असून सांघिक प्रयत्नांमुळे ग्रामपंचायतीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. या अगोदरही चितेगाव गट ग्रामपंचायतीला आदर्शवत कामकाजामुळे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. चितेगाव गट ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या गावातील एकूण लोकसंख्या 1635 असून 1961 मध्ये ह्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली. या ग्रामपंचायतीने सतत ग्रामहिताचे निर्णय घेतले असून गाव स्वच्छ व निर्मलतेला प्राधान्य दिले आहे. त्या कामाची दखल देश पातळीवर घेण्यात आली. त्यामुळे या ग्रामपंचायतीला सन 2007-08 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतीच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले होते.. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा स्तरीय पुरस्कारही मिळाला आहे. त्याचप्रमाणे 2010-11 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करुन ग्रामस्थांनी नवा आदर्श निर्माण केला. सौ.कुसुम गणेशराव भोसले ह्या महिला सरपंच म्हणून विराजमान झाल्या.
त्याच्या कार्यकाळात जनसुविधा योजनेंतर्गत नवीन ग्रामपंचायत कार्यालयासाठी सात लाखाच्या मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायतीची सुबक इमारत उभारण्यात आली. सन 2015-16 ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा ग्रामस्थांच्या सामंज्यस्याने बिनविरोध करत गावाचा आदर्श पायंडा कायम ठेवला. सरपंच म्हणून अमोल भोसले व उपसंरपच किरण जाधव ह्या तरुणांकडे गावाची धुरा सोपविण्यात आली. नवीन कार्यकारिणीने गावाचा कायापालट करण्याची खुणगाठ मनाशी बांधली. ग्रामविस्तार अधिकारी सविता पांडे यांच्यासह कार्यालयातील इतर कर्मचारी व ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घेत त्यांचा उत्साह वाढविला. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजमंदिर उभारण्यात आले आहे. गावात महिलांसाठी स्वतंत्र सुलभ शौचालय बांधलेले आहे. गावांतर्गत रस्ते, दलित वस्तीचे काँक्रीटीकरण करण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालयीन कामांसाठी 13 व्या व 14 व्या वित आयोग निधीतून कार्यालयाचे सुशोभिकरण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातील बहुतांशी कामकाजाचे संगणकीकरण झाले असून जन्म-मृत्यू दाखले, 7/12 उतारा, विवाह नोंदणी ही सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत. कार्यालयांतर्गत होत असलेले कामांचे नियोजन, कार्यवाही, स्वच्छता या बाबींची तपासणी करुन चितेगाव गट ग्रामपंचायत कार्यालयाला आयएसओ मानांकन बहाल करण्यात आल्याची माहिती संरपच अमोल भोसले यांनी दिली.
आयएसओ मानांकन मिळविणे हे सांघिक कार्य असून त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविस्तार अधिकारी सविता पांडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. ग्रामपंचायत कार्यालयाकडून नागरिकांना पुरविल्या जात असलेल्या योजनांबाबतची अचूक माहिती, नियमित पाणीपुरवठा, नियोजनात्मक कामामुळे ग्रामस्थांना विशिष्ट वेळेत ग्रामपंचायत कार्यालयाकडून सेवा मिळत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
आपल्या कामकाज पद्धतीमुळे चितेगाव गट ग्रामपंचायत संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श मॉडेल ठरले आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांशी बांधिल राहून कामकाजाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये निरंतर सुधारणा करण्यात येत असल्याची माहितीही सरपंच श्री.भोसले यांनी दिली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निरनिराळ्या विषयांवर कार्यवाही करण्यात येते. असंख्य फाईल्स त्यामुळे तयार होतात. त्या फाईलांचे प्रशासनीक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करून सूची तयार करण्यात आली आहे. यामुळे काम करणे सोपे झाले असून फाईलींचा निपटारा व कोणतेही काम हे वेळेच्या आत पारदर्शी पद्धतीने होत असल्याची माहिती श्रीमती पांडे यांनी दिली.
आयएसओ मानांकन प्राप्त झाल्यानंतर अनेक लोक ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देण्यासाठी येत असून ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामकाजाची आदर्श पद्धत पाहून आपल्याही ग्रामपंचायतीचे कामकाज हे चितेगाव प्रमाणे करण्याचा निश्चय करत आहेत. ग्रामस्थांच्या गरजा व अपेक्षा समजून घेऊन त्यांची पूर्तता करण्यात चितेगावला यश मिळाले असून त्यामुळेच चितेगावला जिल्ह्यातील पहिले आयएसओ मानाकंन प्राप्तीचा बहुमान मिळाला आहे.
लेखक - निलेश परदेशी
चाळीसगाव जि.जळगाव
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 8/11/2020
यावली ग्रामपंचायतीचे सर्व कामकाज संगणकावर असून सर्...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात स...
अर्थसंकल्प तयार करण्यास आणि ग्रामसभेकडून तो मान्य ...
ग्रामपंचायतींच्या रस्त्यांवर सौर ऊर्जा पथ दिवे उभा...