“डोंगरपायथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातलं माळीण गाव. दि. 30 जुलै, 2014 या दिवशी पहाटे कोसळलेल्या दरडीखाली गडप झालं. यात तब्बल 151 जण मृत्युमुखी पडले. या गावाला पुन्हा उभं करण्यासाठी शासनपातळीवर जलदगतीनं हालचाल झाली. त्यातूनच 67 नवीन घरं, जनावरांसाठी अद्ययावत गोठा, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, शाळा अशा प्रकारचं नवं रूप असलेलं माळीण उभं राहिलं. या नव्या माळीण गावाचं नुकतंच लोकार्पण झालं असून त्यानिमित्त नव्या माळीणचा घेतलेला हा वेध...”
माळीण... पुण्यापासून शंभर-सव्वाशे किलोमीटर अंतरावरचं गाव. 2014मध्ये गावावर दरड कोसळल्याने उद्ध्वस्त झालेल्या या गावाच्या पुनर्वसनाचं काम शासनाकडून नुकतंच पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री
मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 2 एप्रिल, 2017 या दिवशी गावातल्या 67 कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या देण्यात आल्या. माळीणच्या गावकर्यांसाठी आमडे या त्यांच्याच ग्रूप ग्रामपंचायतीच्या गावाच्या हद्दीमध्ये आठ एकर जागेत गावाच्या पुनर्वसनासाठी 67 घरे, शाळा, अंगणवाडी, वीस जनावरांची क्षमता असलेला गोठा, सुसज्ज असे ग्रामपंचायत कार्यालय, समाजमंदिर आणि शहरापासून दूर असलेल्या या गावासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तयार करण्यात आलं आहे. सध्याचं माळीण म्हणजे चित्रपटात शोभून दिसावं असं गाव तयार करण्यात आलं आहे. या गावाच्या पुनर्वसन प्रकल्पाचं लोकार्पण होण्याच्या काही दिवस आधी एका पत्रकार मित्रासोबत मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्यादरम्यान जे डोळ्याला दिसलं, ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
डिंभे आणि बोरघरपासून थोडं पुढं गेल्यानंतर कच्च्या रस्त्याने माळीण फाट्यापर्यंत पोहोचलो. मुख्यमंत्री येणार म्हणून फाट्यापासून जुन्या माळीणपर्यंत आणि पुनर्वसनाच्या माळीणपर्यंत डांबरीकरण करण्यात येत होतं. पूर्वीचं माळीण गाव जिथं होतं, त्या जागेवर एक स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. या स्मृतिस्तंभावर माळीण दुर्घटनेत मृत पावलेल्या 151 जणांची नावं कोरलेली आहेत. महाराष्ट्र वन विभागाकडून या स्मृतिस्तंभाच्या चोहोबाजूंनी 151 झाडं लावण्यात येत आहेत. प्रत्येक झाडाला त्यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात येणार आहे. त्याचसोबत या परिसरात वन खात्याकडून एक हजारांपेक्षा अधिक झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये आंबा, जांभूळ, फणस, बांबू, बकूळ, जारूळ, सीताअशोक, सोनचाफा, सप्तपर्णी, पिंपळ, वड, लिंब, कांचन, करंज, उंबर ही आणि इतर शोभिवंत झाडं लावण्यात येणार आहेत. ढासळलेल्या डोंगरावरच्या परिसरात प्लॉटिंग करण्यात आलं आहे. या झाडांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी ठिबकसिंचनाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
जुन्या माळीण गावातले राजू झांजरे या वेळी आम्हांला भेटले. ते स्मृतिस्तंभाच्या प्रवेशद्वाराचं रंगकाम करत होते. आम्ही त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली; तेव्हा ते म्हणाले, “आमची काही दहा ते बारा कुटुंबांची घरं वाचली; पण सर्व नातेवाईक, भावकीचे लोक अपघातामध्ये गेले. नवीन घरांसाठी दहा हजार रुपये भरले आहेत; पण आमचं कुटुंब मोठं असल्यानं शासनानं बांधलेली घरं आम्हांला अपुरी पडणार आहेत. त्याचबरोबर आमची जनावरं खूप आहेत. त्यांना घेऊन दुसरीकडे राहता येणार नाही. त्यामुळे आम्ही जुन्याच घरी राहण्याचा निर्णय घेतलाय. जुन्या घरी स्वतःच्याच जबाबदारीवर राहणार असल्याचं लिहून घेण्यात आलं आहे.”
जुन्या माळीणमध्ये सध्या शाळा, ग्रामपंचायत आणि काही घरं शिल्लक राहिली आहेत. पुनर्वसनाच्या अगोदर ग्रामपंचायत आणि मुलांची शाळा माळीण फाट्यावर तात्पुरती सुरू करण्यात आली होती. स्मृतिस्तंभाकडून पुनर्वसनाच्या माळीणकडे निघालो असता खालून दरीतून कुणीतरी घोंगडी पांघरून येत होतं. मी त्यांना हटकलं, “तुम्ही माळीणचे का?” ते मानेनंच “हो.” म्हणाले. जालिंदर झांजरे नाव असलेल्या त्या गृहस्थांनी जुन्या माळीणमध्ये राहत असल्याचं सांगितलं. जालिंदर सांगत होते, “आमची भातशेती आहे. आत्ता भातासाठी सध्या रान भाजण्याचं काम सुरू आहे. गावापासून जवळच डिंभे धरण आहे. या भागात पाऊसही भरपूर पडतो, पण उन्हाळ्यात आम्हांला पिण्यासाठीसुद्धा पाणी राहत नाही. आजच्या घडीला आम्हांला आडविरे, असाणे या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमधून पाणी आणावं लागतं.”
जुन्या माळीणपासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर पुनर्वसन करण्यात येत असलेल्या नव्या माळीणमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा तिथली नवीन शाळा दृष्टिपथात आली. बच्चे कंपनी शाळेच्या भिंती रंगवत होती, दोन शिक्षक उंच ठिकाणी रंग देण्यात गुंग होते; तर एक बाई सावलीत बसून कागदावर पेन्सिलने रेघा मारत होत्या. शिरूरमधल्या कर्डेलवाडी शाळेतले दत्तात्रय सकट, बेबीनंदा सकट, राजाराम सकट आणि आशा सकट यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्यानं शाळा रंगवण्याचं काम हाती घेतलं आहे. दर शनिवारी आणि रविवारी माळीणला येऊन शाळा रंगवण्याचं काम विनामूल्य स्वरूपात करत आहेत.
माळीणमधल्या नव्याने बांधलेल्या घरांची माहिती पुनवर्सन प्रकल्पात काम केलेल्या श्री. गणेश काळे यांनी सांगितली. साधारण दीड गुंठ्यामध्ये दोन घरं तयार करण्यात आली आहेत. डोंगराच्या पायथ्याला तीन टप्प्यांत 67 घरं बांधली आहेत आणि इतर बांधकामं करण्यात आली आहेत. बैठकीची खोली, स्वयंपाकघर, झोपण्याची खोली आणि पाठीमागच्या बाजूला शौचालय आणि स्नानगृह. एका प्लॉटमध्ये दोन घरं अशी रचना करण्यात आली आहे. शिवाय घराची उंची जमिनीपासून दोन फूट वर असेल अशा पद्धतीनं कठडा तयार करण्यात आलाआहे, ज्यामुळे सापासारखे सरपटणारे प्राणी घरात येण्यास पायबंद बसू शकेल असे गणेश यांनी सांगितले.
संपूर्ण गावासाठी वीस जनावरांची क्षमता असलेला गोठा पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये जनावरांसाठी दावण तसेच मलमूत्र वाहून जाण्याची सुविधा करण्यात आली आहे. डोंगरावरचं पावसाचं सगळं पाणी वाहून जाण्यासाठी एक भला मोठा चर तयार करण्यात आला आहे आणि या चराच्या वरच्या बाजूला वन विभागाकडून झाडं लावण्यात येत आहेत. याच झाडांच्या परिसरात बावीस हजार लीटर क्षमता असलेली सिमेंटची टाकी गावकर्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आली आहे. तसंच झाडांना पाणी देण्यासाठी दोन हजार लीटरच्या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगराच्या पायथ्याला विहीर खोदण्यात आली असून विहिरीवरून पाणी आणण्यासाठी पाईपलाइन केल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलं; मात्र सध्या टँकरनंच पाणीपुरवठा होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक गणेश राजगुरू भेटले. 2009पासून राजगुरू या गावचे ग्रामसेवक आहेत. गावच्या सध्याच्या सरपंच हौसाबाई असवले आहेत, तर तुकाराम चिमटे हे उपसरपंच आहेत. सरपंचांची आणि उपसरपंचांची भेट झाली नाही. राजगुरू यांनी सांगितलं की, गेल्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 939 होती. आता त्यातून 151 वजा करावी लागली. माळीण, आमडे आणि पोटेवाडी, किंचवाडी, उंडेवाडी, पसारवाडी, लेंभेवाडी, कोकणेवाडी आणि झांजरेवाडी या सात वाड्या मिळून ग्रूप ग्रामपंचायत आहे. उद्ध्वस्त झालेल्या माळीण गावाच्या उभारणीसाठी आमडे गावाच्या हद्दीतली आठ एकर जागा शासनाने बत्तीस लाख रुपयांमध्ये खरेदी केली. साधारण डिसेंबर 2015पासून या जागेवरच्या घरांच्या आणि इतर इमारतींच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पावसाळ्यात काही महिने हे काम बंद होतं. माळीण गावाच्या पुनर्वसन कामामध्ये जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे.
माळीण फाट्याजवळच्या दुर्घटनेनंतर तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याच्या शेडमधले निवारे उभारण्यात आले होते. तिथं आम्हांला सखाराम बाबू झांजरे भेटले. माळीण दुर्घटनेविषयी सांगताना ते म्हणाले की, ‘माळीण दुर्घटनेत बायको आणि मुलगी गेली, तर दोन मुलं आणि मी असे तीन जण वाचलो. त्यानंतर थोरल्या मुलाचं लग्न केलं. आम्ही नवीनच घर बांधलं होतं. त्याची नोंद झाली होती. त्यामुळे आम्हांला घर मिळालं. मी शेतीच करतो; परंतु सध्या शेतामध्ये फार कामं नाहीत.’ पत्राशेडच्या पडवीमध्ये प्रत्येक घराबाहेर लहान मुलांचे पाळणे दिसत होते. ज्या घरातल्या कर्त्या स्त्रीचा मृत्यू झाला आहे, त्या घरातल्या थोरल्या मुलांची लग्नं उरकण्यात आलेली होती. गावामधल्या साधारण नऊ मुलांची लग्नं झाल्याचं तिथल्या महिलांनी सांगितलं.
पुढे मोतीराम मारुती लेंभे हे ग्रामस्थ आम्हांला भेटले. ते आम्हांला प्रत्येकाकडे घेऊन जात होते. शेजारीच दोन महिला गोधडी तयार करत होत्या. त्यांनी एक बचत गट सुरू केला आहे. शांता गणेश झांजरे आणि भामाबाई हरिश्चंद्र झांजरे. पुण्यातले कुलकर्णी काका त्यांना गोधडी तयार करण्यासाठी कच्चा माल आणून देतात आणि त्या शिवून देण्याचं काम या महिला करतात. गोधडीच्या आकारानुसार त्यांना साधारण 500 ते 1000 रुपये मिळतात. पुढे त्यांनी असंही सांगितलं की, ग्रामपंचायतीमध्ये ज्यांच्या घरांची नोंद आहे; त्यांनाच घरं मिळाली आहेत. दहा वर्षांपासून वेगवेगळे राहणारे भाऊ या लहानलहान घरांमध्ये एकत्र कसे राहतील? शासनानं जी घरं दिली आहेत; ती आकारानं खूप लहान आहेत. मोठ्या कुटुंबाला त्या घरामध्ये राहता येणार नाही. मोठ्या भावांच्या नावावर घरं असल्यानं लहान भावांना घरं मिळाली नाहीत. अशी सुमारे तेरा कुटुंबं असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांना पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन माळीण सोडलं.
आता बहुतांश माळीणकरांना हक्काची घरं मिळाली आहेत. दुर्घटनेनंतर शासनानं जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर माळीणकरांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. त्यातून मिळालेली घरं मोठा कुटुंबकबिला असलेल्या माळीणमधल्या शेतकर्यांना पुरतीलच असं नाही, तरीही या पुनर्वसनातून शक्य तितकं उपलब्ध करून देऊन माळीणचं पुनर्वसन करण्यात आलं. मात्र आजची खरी गरज आहे, ती माळीणसारख्या दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी काळजी घेणं. त्यासाठी सर्वांत फायदेशीर ठरणार आहे ते निसर्गाची जपणूक करणं आणि डोंगरावरच्या झाडांची तोड थांबवून जास्तीतजास्त वृक्षलागवड करणं. त्यासाठी शासनानी आणि सर्व नागरिकांनी आपापल्या परीनं सक्रिय असणं आवश्यक आहे.
लेखक: नरेंद्र साठे, पुणे (संपर्क: 9011702261)
माहिती स्रोत: वनराई
अंतिम सुधारित : 2/3/2020
एखाद्या गावाचा इतिहास त्या गावाच्या स्मृतिपटलाच्या...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...
नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभि...
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्य...