लखलखती चांदी आणि चांदिचे दागिने यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं हुपरी. याच गावात सन 1940 पूर्वीपासून अस्तित्वात असणाऱ्या सूर्यतलावाला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद संपूर्ण देशाला घातली आणि त्याला प्रतिसाद देत गावातील तरुण वर्षानुवर्षे तलावात साचलेली ही घाण, गाळ काढून स्वच्छ करण्यासाठी पुढे सरसावले.
प्राचीन काळापासून हुपरीचे वैभव असणारा सूर्यतलाव गावाच्या मध्यभागी अगदी रस्त्यालगतच सुमारे पाच ते साडेपाच एकर जागेवर पसरलेला आहे. याच तलावात मनसोक्त डुंबक्याचा आनंद लुटल्याच्या आठवणी आजही येथील वृद्ध सांगतात. पण गावात आणि विशेषत: तलावाभोवती जस जशी वस्ती वाढत गेली तसतसे या तलावात कचरा टाकला जाऊ लागला. काळाच्या ओघात झाडेझुडपी वाढली, गाळ साचला जाऊन तलावाच्या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली. तलावाच्या नावावर घाणीचे साम्राज्य दिसू लागले आणि प्राचीन काळाचे वैभव म्हणून मिरवणारा हा तलाव अस्वच्छ झाला. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत येथील तरुणांसह अबाल वृद्धांनी कंबर कसली.
सुरुवातीला या तलावातले पाणी बाहेर काढण्यात आले. पाणी इतके दुषित झाले होते की ज्यांनी, ज्यांनी पाण्यात हात घातला त्यांच्या हाताला खाज उठू लागली. पण कोणीही डगमगले नाही. आपला उद्योग-व्यवसाय संभाळून हे तरुण जिद्दीने 90 दिवस स्वच्छतेची मोहीम राबवत होते. पाणी उपसा करताना तलावाच्या तळाला 13 ते 14 कासवे सापडली. त्यातील एक तर 40 किलो पेक्षाही जास्त वजनाचे होते. या कासवांची स्वच्छता करुन विहिरीत सोडण्यात आले. मरळही सापडल्या, त्याही विहिरीत सोडल्या.
पूर्वी कधीतरी लग्नाचे वऱ्हाड या तलावात गाढले गेल्याने या तलावास गाढेतलाव असे नाव पडले होते. पण काळाच्या ओघात अपभ्रंश होऊन त्याचे नाव गाढव तलाव असे झाले अशी आठवण गावातील जुण्या जाणत्यांनी सांगितली. पुढे या तलावाचे महत्त्व ओळखून स्व.य.रा.नाईक यांनी याचे नामकरण सूर्यतलाव असे केले आणि या तलावाच्या मध्यभागी सुर्यमंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. सुशोभिकरणासाठी त्यांनी कामही सुरु केले होते पण काही कारणांनी त्यामध्ये खंड पडला.
पण गत नोव्हेंबर महिन्यात गावातील तरुणांनी तलावाला गत वैभव प्राप्त करुन देण्याचे ठरविले संदीप पोवार, रावसाहेब ढेंगं, रवी कोलेकर, सचिन पोवार, संदीप सिद्धनुर्ले, योगीराज यादव, महेश इंग्रोळे, सुरज कदम, सुभाष एकांडे, विक्रमसिंह घाटगे, विनायक विभूते, राहूल नवले, विरकुमार शेंडुरे, महादेव आढवकर, राजू थोरात, निलेश डांगरा, अभय पाटील, सुभाष शेटके, शीतल हावळ, रवी रावळ, मंजुनाथ कुंभार, विशाल मातुकडे, संदीप वाईंगडे सत्यजित पवार, नीतीन यादव, शिवराज नाईक, नंदकिशोर पसारे, महेश बेडक्याळे यांनी स्वयंस्फूर्तीने तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली. तलावातून सुमारे 500 ते 600 ट्रॉली गाळ काढण्यात आला. अद्यापही काही गाळ शिल्लक आहे. ओला गाळ वाहतूक करताना रस्त्यावर पडून अपघात होत होते म्हणून हे तरुण रस्तेही स्वच्छ करीत. आता शिल्लक असणारा गाळ कोरडा झाला आहे. जेसीबीसाठीच्या खर्चासाठी निधीची आवश्यकता आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तरुणांनी स्वयंस्फुर्तीने सुरु केलेली ही मोहीम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगून आवश्यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही दिली आहे.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये कोट्यावधींचा निधी खर्च करुन हजारो कामे हाती घेण्यात आली आहेत. सरकारचा हा प्राधान्य क्रमाचा विषय आहे. पण शासकीय यंत्रणेला लोक इच्छेची आणि योगदानाची साथ मिळाल्यास गावागावातील पाण्याचे स्त्रोत पुन्हा जिवंत होतील. सजीवसृष्टीसाठी पाणी अनमोल असल्याचे ओळखून या तरुणांचा पुढाकार अनेकांना विचार आणि कृतीप्रवण करणारा आहे.तरुणांमधील उमेद हीच देशाची खरी ताकत आहे. ती विधायक कामात लागल्यास नंदनवन फुलविण्याची तिच्यात क्षमता आहे. आणि ती विध्वंसक झाल्यास नंदनवनही उजाड करेल. पण हुपरीतील या तरुणाईने सकारात्मक असा आदर्श घालून दिला आहे.
तलावाचा हा परिसर सुमारे साडेपाच एकराचा आहे आता या ठिकाणी प्रशासनाने वॉकिंग ट्रॅक बनवावे, सूर्यमंदिर बांधावे. तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करुन द्यावी आणि या ठिकाणाला कोल्हापूरचा रंकाळा, कागलाचा जयसिंग तलाव याप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी होत आहे. तरुणाईच्या पुढाकारातून स्वच्छ झालेला हा तलाव प्रशासनाच्या मदतीने सुंदर झाला तर यातून प्रेरणा घेऊन अनेक गावांमध्ये असे उपक्रम उत्साहाने हाती घेतले जातील.
लेखक - वर्षा पाटोळे
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर
स्त्रोत - महान्युज
अंतिम सुधारित : 7/11/2019
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत यांत्रिकीकरणावर ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
जर पुढीलप्रमाणे कोणताही अनुसूचित जातीचा कोणत्याही ...
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगातर्फे जागरुकता अभियान...