অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डोणगावकर एक झाले

सन 1971 पासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मेहकर तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या डोणगावच्या (जि. बुलडाणा) ग्रामस्थांनी ही परिस्थिती बदलण्याचे ठरवले. सामूहिक प्रयत्नांतून नदी खोलीकरणाचा संकल्प केला. एवढेच नव्हे तर तब्बल तीन किलोमीटर नदीपात्र खोलीकरण व रुंदीकरणाचे काम त्यांनी करूनही दाखवले. ही लोकचळवळ राज्यातील विविध गावांसाठी प्रेरणावाट ठरली आहे.

मेहकर तालुक्‍यातील मुळा येथून उगम पावणारी कंचनगंगा नदी वाशीम जिल्ह्यातील मांगूळ (झनक) येथील पेण नदीत विलीन होते. सुमारे 25 किलोमीटरपर्यंत या नदीचे पात्र विस्तारले आहे. गावालगत नदी वाहत असतानाही गावाने मात्र अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्या. सन 1971 मध्ये गावात भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनाचा प्रश्‍न गंभीर झाला. पुढेही अनेकदा दुष्काळी परिस्थितीचा सामना ग्रामस्थांना करावा लागला. या वर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने डोणगावात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. शेतकऱ्यांच्या विहिरी तसेच काही ग्रामस्थांच्या बोअरवेल अधिग्रहीत करीत ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाकडून झाला. चार टॅंकर यंदा मंजूरही करण्यात आले; परंतु गावपातळीवर विहीर व बोअरवेल अधिग्रहण करण्यात आल्याने केवळ एका टॅंकरद्वारे गावात पाणीपुरवठा करण्यात आला. 

...आणि लोकचळवळ उभी राहिली


बुलडाणा जिल्ह्यातील अनेक गावांत "सकाळ' रिलीफ फंडाच्या माध्यमातून नदी खोलीकरणाच्या मोहिमेला वेग आला होता. याविषयी डोणगाववासीयांना माहिती मिळाली. त्याचा आधार घेत गावातही अशाप्रकारची लोकचळवळ उभी करण्याचा विचार ग्रामस्थांच्या मनात आला. जात, पात, पक्ष, भेद विसरून या कामात सर्वांनी सहकार्य करण्याचा निर्णय झाला. डोणगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असले तरी या भागातील शिवसेनेने उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. 

प्रशासनाचा रेटा


तहसीलदार निर्भय जैन यांच्यासमोर ग्रामस्थांनी नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या उपक्रमाची कल्पना मांडली. ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात आल्या. विविध पदाधिकाऱ्यांसह 17 ग्रामपंचायत सदस्य या बैठकांना उपस्थित राहत ग्रामस्थांचे प्रबोधन करीत होते. गाळ साचल्याच्या परिणामी नदीपात्राचे नाल्यासम रूपांतर झाले आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात गावाला पुराचा धोका संभवतो, तर नदीपात्रात पाणी राहत नसल्यामुळे गावाला भीषण पाणी समस्येचाही सामना करावा लागतो. जमिनीची धूप होण्याबरोबरच सिंचनाचाही प्रश्‍न गंभीर झाल्याचे प्रशासनिक अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना पटवून दिले. या प्रबोधनाचा अपेक्षित परिणाम होत ग्रामस्थांनी लोकसहभागातूनच नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्याचा निर्णय घेतला.

लोकसहभागातून झाले काम


शेतकऱ्यांनी नदीपात्रातील गाळ शेतजमिनीत नेण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता 70 रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे करावयाची अदायगी शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर केली. या माध्यमातून तब्बल 25 हजारांपेक्षा अधिक ट्रॉली गाळ उपसण्यात आला. या माध्यमातून नदीपात्राचे थोडेथोडके नव्हे तर पाच किलोमीटरपर्यंतचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात यश आले. विदर्भात लोकसहभागातून झालेले हे पहिलेच मोठे काम असावे. 

पाणी समस्येतून मुक्‍ती


  1. नदीपात्रातील गाळ उपसण्याचा या पॅटर्नचे फलित पहिल्याच पावसानंतर डोणगाववासी अनुभवत आहेत. सुमारे 30 हजार लोकवस्तीच्या या गावात भूगर्भातील पाणीसाठा सातत्याने कमी झाला होता. आता नदीपात्राचे रुंदीकरण झाल्याने पहिल्याच पावसानंतर आलेल्या पुराचे पाणी गावात शिरले नाही. गावाला पाणीपुरवठा करण्याकामी नदीकाठावरील विहिरीतील जलसाठ्यात वाढ झाली आहे. परिणामी, या वर्षी गाव टॅंकरमुक्त होईल असा विश्‍वास सरपंच संजय आखाडे यांनी व्यक्‍त केला.
  2. गावाला दरवर्षी पाणी समस्या भेडसावत असल्याने नदीपात्रात 70 फूट खोल रिचार्ज शाफ्ट घेण्यात आले. जोडीला भूमिगत बंधारा 14 फूट खोल तर जमिनीच्या वर तीन फूट बांधण्यात आला. शिवकालीन भूमिगत बंधारा, तसेच नदी पात्रात 80 फूट खोल दहा बोअरवेल घेण्यात आले.
  3. कंचनगंगा नदीबरोबरच ग्रामस्थांनी गावालगतच्या दोन एकरातील बोरतलाव नामक तलावातील गाळही उपसला. भारत निर्माण योजनेतून गावाला 13 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यातील चार कोटी रुपयांचा पहिला हप्ता नुकताच मंजूर झाला आहे. मादनी येथील नेतन्सा सिंचन प्रकल्पावरून गावांकरिता जलवाहिनी टाकत तहान भागविली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीपूर्वीच गावातील पाणीपुरवठाकामी असलेल्या विहिरीची पाणीपातळी वाढीस लागल्याचे समाधान ग्रामस्थांमध्ये आहे.

बोलक्‍या प्रतिक्रिया...


कराडवाडी शिवारात माझी साडेआठ एकर शेती आहे. पाऊस कमी झाल्याने जमिनीची धूप होत शिवारात चढ-उतार वाढीस लागला होता. आता 50 ट्रॉली गाळ शेतात टाकत जमीन सपाट करून घेतली. या वर्षी सोयाबीन घेतले आहे. 
अय्युब मुल्लाजी, मो. 9527567038
माझी डोणगाव भाग दोन शिवारात 33 एकर शेती आहे. कंचनगंगा नदीतून 300 ट्रॉली गाळाचा उपसा करीत आपल्या शेतात टाकला. सोयाबीन चांगले अंकुरले आहे. जमिनीचा पोत सुधारण्यास जमिनीतील गाळ पोषक ठरणार आहे. 
आनंद सावजी, मो. 9421396808
नदीपात्रातील गाळाचा उपसा करीत जमिनीची सुपीकता कायम ठेवण्याकरिता त्याच्या वापरण्यावर भर दिला आहे. 
300 ट्रॉली गाळ उपसण्यात आला. सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता असल्याने रासायनिक खतांचा वापर करीत नाही. बोरतलावाजवळ माझी 30 एकर शेती आहे. सोयाबीन व तुरीची लागवड या वर्षी केली असून उत्पादकता व पर्यायाने उत्पन्न दुपटीने वाढीची अपेक्षा आहे. 
संजय कळसकर, मो. 9423563858 

जमिनीचा पोत सुधारला


भाग क्रमांक एक या शिवारात माझी 40 एकर शेती आहे. मुरमाड जमीन असल्यामुळे या शेतीतून अपेक्षित उत्पादकता व उत्पन्न मिळत नव्हते. लोकसहभागातून राबविलेल्या उपक्रमांतर्गत 500 ट्रॉली गाळाचा उपसा करीत हा गाळ शेतात टाकण्यात आला. या वर्षी सोयाबीनची लागवड केली असून, गाळ टाकल्याचा निश्‍चित फायदा होईल. पाणी समस्या निवारणार्थदेखील हा प्रयोग महत्त्वाकांक्षी व दिशादर्शक ठरेल यात शंका नाही. 
गजानन पळसकर, मो. 9011413932
जादा लोकसंख्येच्या गावात लोकसहभागातून उपक्रम राबविणे जिकिरीचे काम असते. गटातटाच्या राजकारणातून अनेक योजना, उपक्रम राबविणे अडचणीचे असते. डोणगाव ग्रामस्थांनी मात्र दूरदृष्टी जपत हे कार्य तडीस नेले. त्यांच्या सहकार्याशिवाय ही मोहीम फळास गेली नसती हेच खरे ! 
निर्भय जैन, तहसीलदार मेहकर 9822235601 

संपर्क : संजय आखाडे, 9421396868 
सरपंच, डोणगाव

विनोद इंगोले

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate